- नि का ल प त्र -
( दि.10-07-2018)
द्वारा : मा. श्री. शशांक श. क्षीरसागर, सदस्य.
1) तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे 'हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीन (14 इंच) खरेदी व्यवहारापोटी सामनेवाला यांना दिलेल्या एकूण रक्कम रु. 52,537/- बाबत सामनेवाला यांनी सदोष सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे-
तक्रारदार यास स्वतःचा नवीन उदयोग सुरु करण्यासाठी 'हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग(14 इंच) मशीन'ची गरज होती. तक्रारदार यांना इंडिया मार्टच्या संकेतस्थळावर सामनेवाला यांच्या पेपर प्लेट बनविण्याच्या मशिनची जाहिरात दिसुन आली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीन (14 इंच) ची मागणी नोंदविली. सामनेवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील मशिनची किंमत रक्कम रु.35,000/-होती. सामनेवाला यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराने मशीन बुकींगसाठी दि. 21-05-2015 रोजी रक्कम रु.15,000/- सामनेवाला यांनी कळविले खाते क्र. 20247043761 मध्ये जमा केली. त्यानंतर सामनेवाला यांच्या मागणीनुसार सदर मशिनच्या किंमतीपोटी रक्कम रु.37,537/-(अक्षरी सदतीस हजार पाचशे सदतीस फक्त) आय.एन.जी. वैश्य बॅंक खाते नं.610011018509 मध्ये दि.04-06-2015 रोजी आर.टी.जी.एस.व्दारे जमा केली. अशा प्रकारे तक्रारदाराने सामनेवालेस एकूण रक्कम रुपये रु.52,537/- (अक्षरी बावन हजार पाचशे सदतीस फक्त) दिलेली असून देखील मशिन देण्यास सामनेवाला टाळाटाळ करीत आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नाते आहे. रक्कमा स्वीकारुन देखील मशीन देण्यास टाळाटाळ केल्याने सामनेवालांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
3) दि.01-07-2015 रोजी सामनेवाला यांचेकडून तक्रारदारांना एक सेमी पेपर मेकींग मशीन डेमो करिता पाठविले त्याकरिता तक्रारदाराने रक्कम रु.2,200/- चार्जेस भरलेले आहे. सदरची डेमो मशीन ही तक्रारदारांनी मागणी केलेल्या मशिनच्या ऑर्डरप्रमाणे मिळती जुळती देखील नाही. तसेच त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेशी वारंवार ई-मेल व्दारे पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदाराने दि.20-10-2015 रोजी सामनेवालास मागणी नोटीस पाठविली. तथापि सामनेवालेनी तक्रारदारास मागणीप्रमाणे पुर्ण रक्कम देवुनदेखील मशीन न दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार रक्कम रु. 52,537/- द. सा. द. शे.12 % व्याजाने तसेच नुकसानीबद्दल मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.1,00,000/-, अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावेत म्हणून दाखल केलेली आहे.
4) सामनेवाला यांनी मंचामार्फत नोटीसा पाठविल्या परंतु त्या न बजावता परत आल्या आहेत. तदनंतर नि.22 वर तक्रारदारातर्फे सामनेवालेस ई-मेल व्दारे समन्स बजावणीबाबत अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे तक्रारदार तर्फे सामनेवाले यांना पाठविलेल्या ई-मेल नोटीसची यादी दाखल करुन घेवून इ-मेल व्दारे पाठविलेली नोटीस पोहच झाल्याचे ग्राहय धरुन नि.23 वर सामनेवाला यांच्याविरुध्द या मंचाने 'एकतर्फा' आदेश पारीत केला.
5) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत नि.6 वर सामनेवाला यांना वकिलांमार्फत दि.11-09-2015 व 20-10-2015 रोजी पाठवलेली नोटीस व पोस्टाच्या पावत्या, सामनेवाला यांना नोटीस न बजावता परत आलेला लखोटा, दि.11-03-2015 व 29-05-2015 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेल्या ई-मेलच्या प्रती, सामनेवाला कंपनीतर्फे राजीवकुमार यांचे खात्यात दि.21-05-2015 रोजी रक्कम रु.15,000/-तक्रारदाराने भरल्याची स्टेट बॅंक ऑफ इंडियाची पावती, मशीनचे कोटेशन, इंडिया मार्ट बायर्स यांना पाठवलेल्या ई-मेलच्या प्रती, दि.04-06-2015 रोजी सामनेवाला यांना तक्रारदारांनी रक्कम रु. 37,537.50 ट्रान्सफर केल्याची एन. ई.एफ.टी. प्रत, डेमो करिता भरलेले चार्जेसची प्रत, अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.25 वर तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. नि.26 वर तक्रारदाराचा पुरावा संपल्याची पुरसीस दाखल केली आहे. तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद नि. 28 वर दाखल करण्यात आलेला आहे.
6) तक्रारीचा आशय, पुरावा यांचे अवालोकन करता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत का? | होय |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली असलेचे तक्रारदार शाबीत करतात का ? | होय. |
3. | आदेश काय ? | अंतिम आदेशप्रमाणे. |
- का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1 व 2 -
7) तक्रारदार यांना नवीन व्यवसायासाठी हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीन (14 इंच) मशिनची खरेदीकरिता तक्रारदार यांनी बुकींगसाठी दि.21-05-2015 रोजी रक्कम रु.15,000/- तसेच दि.04-06-2015 रोजी एन. ई. एफ. टी. व्दारे रक्कम रु. 37,537/- सामनेवाला यांना दिलेले आहेत. नि.6/6 व 6/16 वर दाखल पावतीच्या झेरॉक्सचे अवलोकन करता ही बाब निदर्शनास येते. नि.6/14 वर दाखल कागदपत्राचे अवलोकन करता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी बुकींगसाठी भरलेली रक्कम रु.15,000/- हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीन (14 इंच) साठी सामनेवाला यांना मिळाल्याचे दिसते तसेच उर्वरीत रक्कम रु. 37,537.50 ची मागणी सामनेवाला यांनी केली. त्याप्रमाणे रक्कम रु. 37,537.50 सामनेवाला यांना मिळाल्याचे सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्ये झालेल्या ई-मेल संभाषणाव्दारे दिसून येते. या मंचासमोर आलेला एकंदरीत पुरावा पाहता तक्रारदारांनी सामनेवालाकडे मशीन खरेदीसाठी रकमा जमा केल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 बाबत हे मंच होकारार्थी निष्कर्षाप्रत येत आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेले नि.6/8 सोबतचे कागदपत्र पाहता सामनेवाला यांनी दि.29-05-2015 रोजी तक्रारदार यांस फुली अॅटोमेटीक हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीनचे कोटेशन रक्कम रु. 1,50,000/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) चे दिलेले दिसते. वास्तविक पाहता तक्रारदाराची मागणी हायड्रॉलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकिंग मशीन (14 इंच) ची होती. सदर मागणी पोटी बुकींग रक्कम सामनेवाला यांनी स्वीकारल्याचे नि.6/11 वरुन दिसून येते.
सामनेवाला यांनी तक्रारदारास मशीनचा डेमो दाखविण्याकरिता रक्कम रु. 2,200/- तसेच नि. 6/19 वरील दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, सदरचे डोना पेपर मेकींग मशीन(डेमो मशीन) डेमो करिता पाठविल्याचे दिसून येते. सदर कागदपत्रांवरुन डेमो मशीन विक्री किंवा पुर्नःविक्री करिता दिलेले नाही असा स्पष्ट उल्लेख सामनेवाला यांनी केलेला आहे. सदरची डेमो मशीन डेमो तक्रारदारास दाखवुन परत घेवून जाण्याची जबाबदारी ही सामनेवालेची असून देखील सदर मशीन परत घेवून न जाता तक्रारदार यांच्याकडे आजपर्यंत ठेवली आहे. सदरची डेमो मशीन ही तक्रारदार यांनी मागणी केलेली मशीन नसून दुसरीच मशीन असल्याचे नि. 6/19 वरुन स्पष्टपणे दिसून येते.
तक्रारदार यांनी नि. 28 वर त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला तसेच तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदार यांचे म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी मागणीनुसार मशीनचे कोटेशन दिले नाही. सदर कोटेशन ही फुली अॅटोमेटीक हायड्रोलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकींग मशीनचे आहे. वास्तविक पाहता तक्रारदारास हायड्रोलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकींग मशीनचे (14 इंच) कोटेशन पाहिजे होते. तक्रारदार यांना पाहिजे असलेले मशीनची किंमत रु. 35,000/- असताना रु. 15,000/- बुकींगपोटी जमा झाल्यावर उर्वरीत रक्कम रु.37,537.50 ची मागणी सामनेवाला यांनी केली. आणि त्याप्रमाणे दि.4-06-2015 रोजी तक्रारदार यांनी एन.ई.एफ.टी. मार्फत सदर रक्कम रु. 37,537/- सामनेवाला यांना पाठविली. अशा प्रकारे सदर मशीनची एकूण किंमत रक्कम रु. 52,537/- तक्रारदार यांच्याकडून सामनेवाला यांनी जमा करुन घेतली हे नि.6/6 व 6/16 दाखल केलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट दिसून येते व सदरची मशीन तक्रारदारास पाठवण्यास टाळाटाळ केली. कोटेशनवरील पत्त्यावर वकीलांतर्फे नोटीस पाठविल्यावर पत्ता अपुरा, अभावी परत शेरा मारुन पोस्टाने परत आली यावरुन असे निदर्शनास येते की, कोटेशनवरील सामनेवालाचा पत्ता हा मुद्दाम चुकीचा देवून तक्रारदाराची फसवणूक केली असा तक्रारदारांचा युक्तीवाद आहे. डेमो मशीनकरिता तक्रारदार याने चार्जस भरले असता डेमो मशीन ही तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे नसल्याचा तक्रारदाराने युक्तीवाद केला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून हायड्रोलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकींग मशीनच्या(14 इंच) खरेदीबाबत रकमा स्वीकारुन देखील सदर मशीनचा पुरवठा केला नाही. तसेच तक्रारदारांनी मागणी करुन देखील त्याच्याकडून स्वीकारले त्या रकमा परत दिल्या नाहीत हे या मंचासमोर आलेल्या पुराव्यावरुन सिध्द होते. तसेच तक्रारदाराने युक्तीवादामध्ये सामनेवाला यांनी त्यांना दिलेली डेमो मशीन आजअखेर तक्रारदाराकडे असल्याचे मान्य केले आहे. सदरचे मशीन तक्रारदाराने सामनेवाला यांना परत करणे योग्य व न्यायाचे होणार आहे. कारण तक्रारदार हे त्यांनी सामनेवाला यांचेकडे जमा केलेली रक्कम परत मागत आहे. सदरची रक्कम सामनेवाला यांनी दिलेनंतर तक्रारदाराकडे असलेली डेमो मशीन सामनेवाला यांना देणे बंधनकारक आहे. सदर डेमो मशीन पाठविण्यासाठी येणारा खर्च रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदाराला दयावी. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर मशीन विक्रीबाबत सदोष सेवा देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.3 -
वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनानुसार सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केलेचे सिध्द झाल्याने तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु. 52,537/- (रुपये बावन्न हजार पाचशे सदतीस फक्त) व त्यावर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. व तक्रारदाराने त्यास दिलेली डेमो मशीन सामनेवाला यांना परत करावी. तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी व दोष सेवेबाबत रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व तक्रार खर्च रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
1) तक्रारदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराने त्यांचेकडे 'हायड्रोलिक पेपर प्लेट सिंगल डाय मेकींग मशीन (14 इंच)' खरेदीपोटी जमा केलेली रक्कम रु. 52,537/- (रुपये बावन्न हजार पाचशे सदतीस फक्त) व त्यावर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 % टक्के व्याजासह अदा करावी. व तक्रारदाराने त्यास दिलेली डेमो मशीन सामनेवाला यांना परत करावी. डेमो मशीन परत नेणेचा खर्च सामनेवाला यांनी करावा.
3) सामनेवाला यांनी तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी व सदोष सेवेबाबत नुकसान भरपाई रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-(रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावी.
4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी 45 दिवसांत करावी तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागु शकेल.
5) या निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य देण्यात
/पाठविण्यात याव्यात.