अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
************************************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपीडीएफ/232/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 07/02/2006
तक्रार निकाल दिनांक : 14/11/2011
श्री. आदम युसूफ शेख, ..)
रा. घर नं. 401, जुनीपेठ, ..)
पंढरपूर. ..)... तक्रारदार
विरुध्द
रुबी टूर्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड, ..)
7/8, तळमजला, 2421, ईस्ट स्ट्रीट, गॅलेरीया, ..)
ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, ..)
पुणे – 411 001. ..)... जाबदार
************************************************************
तक्रारदार :- स्वत:
जाबदार :- एकतर्फा
************************************************************
द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत
// निकालपत्र //
(1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/46/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/200/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांनी रक्कम स्विकारुन प्रवासाला नेले नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(3) तक्रारदार श्री. ए.वाय्. शेख हे पंढरपूर येथील रहिवासी असून मक्का-मदीना येथे जाणेसाठी त्यांनी जाबदारांशी संपर्क साधला होता. जाबदारांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी दि. 29/09/2005 रोजी रक्कम रु.7,500/- मात्र जाबदारांकडे रोख भरले होते. या रकमेची जाबदारांनी तक्रारदारांना पावती देऊन सहलीची तारीख दि.12/10/2005 असल्याचे सांगितले. सहलीच्या वेळेस उर्वरित रक्कम रु.2,500/- मात्र तक्रारदारांनी जाबदारांना अदा करण्याचे होते. ठरल्याप्रमाणे प्रवासाच्या तारखेच्या आधी तक्रारदार पुणे येथे आले. त्यांनी प्रवासाच्या तपशिलासाठी जाबदारांशी संपर्क साधला असता, जाबदारांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.2,500/- च्या ऐवजी रु.7,500/- ची मागणी केली. तक्रारदारांकडे एवढया पैशाची व्यवस्था नसल्यामुळे तसेच प्रवासाचे बुकींग करताना रु.2,500/- जादा दयावे लागतील असे जाबदारांनी सांगितले असल्याने तक्रारदारांनी ही रक्कम देण्यास नकार दर्शविला. धार्मिक तिर्थक्षेत्राला जाणेसाठी अशाप्रकारे अडवणूक करण्यात येऊ नये अशीही तक्रारदारांनी जाबदारांना विनंती केली. मात्र जाबदारांनी सकारात्मक प्रतिसाद न देता जादा रक्कम घेऊन तक्रारदारांऐवजी अन्य प्रवाशाला तिर्थयात्रेसाठी पाठविेले अशी तक्रारदारांची तक्रार आहे. यानंतर तक्रारदारांनी वकीलांमार्फत नोटीस पाठवून अदा केलेल्या रकमांची जाबदारांकडून मागणी केली. मात्र जाबदारांनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. जाबदारांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे आपली समाजामध्ये मानहानी झाली तसेच आपल्याला त्रास झाला याचा विचार करुन आपण जाबदारांना अदा केलेली रक्कम व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 3 अन्वये एकूण 3 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
(4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांना काढलेली पहिली नोटीस “Not at given address” या शे-यासह परत आली होती. सबब तक्रारदारांनी जाबदारांच्या पावतीमध्ये नमुद अन्य पत्त्यावरती त्यांना नोटीस काढण्यात यावी असा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करुन जाबदारांना नवीन पत्त्यावर नोटीस काढली असता मंचाच्या नोटीसीची बजावणी झाल्याची पोहोच पावती निशाणी 12/अ अन्वये याकामी दाखल आहे. मात्र नोटीस प्राप्त होऊनसुध्दा जाबदार मंचापुढे हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला व तक्रारदारांच्या विनंतीनुसार सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारीचे अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, त्यांनी दि.29/09/2005 रोजी रक्कम रु.7,500/- मात्र जाबदारांना अदा केले होते ही बाब सिध्द होते. जाबदारांनी आपल्याकडून ऐनवेळी जादा रकमेची मागणी केली व ही रक्कम दिली नाही म्हणून आपल्याला प्रवासासाठी नेले नाही ही तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत शपथेवर केलेली तक्रार जाबदारांनी हजर होऊन नाकारलेली नाही. सबब याअनुषंगे त्यांचेविरुध्द प्रतिकुल निष्कर्ष निघतो. अशाप्रकारे तोंडी करारामध्ये ठरलेल्या रकमेपेक्षा जादा रकमेची मागणी करुन प्रवाशांची अडवणूक करणे व रक्कम अदा न केल्यामुळे त्यांना प्रवासाला न नेणे ही बाब जाबदारांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. जाबदारांनी प्रवासाला न नेल्यामुळे पंढरपूरला परत आल्यानंतर तक्रारदारांनी त्यांना विधिज्ञांमार्फत नोटीस बजावली व आपल्या रकमेची मागणी केली. ही नोटीस जाबदारांना प्राप्त झाल्याची पोहोच पावती तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. मात्र प्रस्तूत जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम परत केली नाही, मंचाची नोटीस प्राप्त होऊनसुध्दा रक्कम परत न करण्याचे कोणतेही समर्थनीय व कायदेशीर कारण जाबदारांनी मंचापुढे सादर केलेले नाही. सबब तक्रारदारांनी जाबदारांना अदा केलेली रक्कम रु.7,500/- मात्र त्यांनी रक्कम अदा केल्यातारखेपासून म्हणजे दि.29/9/2005 पासून 9% व्याजासह परत करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. तसेच या सर्व प्रकरणामध्ये तक्रारदारांना जो शारीरिक व मानसिक त्रास झाला तसेच पंढरपूरवरुन येऊन पुण्याला तक्रारदारांना अर्ज दाखल करावा लागला याचा विचार करुन तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून एकत्रितपणे रु.7,000/- मात्र मंजूर करण्यात येत आहेत.
(6) वर सर्व नमुद निष्कर्ष व विवेचनांच्या आधारे प्रस्तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
// आदेश //
(1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु.7,500/- (रक्कम रु. सात हजार पाचशे मात्र) दि.29/9/2005 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावेत.
(3) यातील जाबदार यांनी शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून तसेच सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून एकत्रित रक्कम रु.7,000/- (रक्कम रु. सात हजार मात्र) तक्रारदारांना अदा करावेत.
(4) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्दाच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
(5) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –14/11/2011