जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :11/03/2010 आदेश पारित दिनांक :19/10/2010 तक्रार क्रमांक :- 164/2010 तक्रारकर्ता :– किशोर, काशिनाथ ढुमने, वय अंदाजेः 39 वर्षे, व्यवसायः नोकरी, राह. क्वॉर्टर नं.बी/81/2, डब्ल्यू.सी.एल., शक्तीनगर, दुर्गापूर, तज. व जि. नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. व्यवस्थापक, रॉयल सुंदरम अलीयन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कॉरपोरेट केल्म्स डिपार्टमेंट सुंदरम टॉवर, 45 व 46, व्हाईट रोड, चेन्न्ई-60014. 2. शाखा व्यवस्थापक, रॉयल सुंदरम अलीयन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शंकरनगर, नागपूर-10. 3. रॉयल सुंदरम अलीयन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, दुसरा माळा, रचना टेड इस्टेट, एस.एन.डी.टी., क्रॉसिंग, प्लॉट नं.64, लॉ कॉलेज रोड, पुणे. तक्रारकर्त्याचे वकील :– कु. रंजना व्ही. किनारकर. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. ए.जे. पोफळी. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 19/10/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 11.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे त्याच्या मारोती कार क्र.एम.एच.-28/सी-3225 विमाकृत केले होते. सदर वाहनाचे विमाकृत मुल्य रु.1,00,000/- होतेय व त्याचा पॉलिसी क्रमांक व्हीपी.24741700100 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दि.28.03.2009 ते 27.03.2010 पर्यंतचा होता. तक्रारकर्त्याचे वाहनाला दि.28.06.2009 रोजी संध्याकाळी 6 वाजता चाक भ्रष्ट झाल्यामुळे अपघात झाला व वाहनाचे नुकसान झाले. या बाबतची माहिती तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे चंद्रपूर येथील पर्यवेक्षक श्री. के.के. पोतदार यांना दिली, व त्यांनी घटनास्थळावर येऊन सदर वाहनाची तपासणी केल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले आहे की, त्यांनी वाहनाची दुरुस्ती श्री साई सर्व्हिस पॉईंट, चंद्रपूर यांचेकडून करुन घेतली. त्याचे लेबर चार्जेस व इतर सुटया भागांचे सर्व बिल गैरअर्जदार विमा कंपनीच्या पर्यवेक्षकाने प्रमाणित केले. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे रु.34,931/- चा विमा दावा दाखल केला, सदर विमा दावा दि.20.11.2009 रोजी गैरअर्जदारांनी नाकारला. त्यानंतर त्यांनी दि.17.12.2009 रोजी गैरअर्जदारांना नोटीस दिली त्याला सुध्दा त्यांनी उत्तर दिले नाही व कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे लेखी उत्तरः- गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने घेतलेल्या विमा पॉलिसीचा क्रमांक व्हीपी 002474170001000 हा होता व वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.-28/सी-3225 असुन पॉलिसीचा कालावधी दि.28.03.2009 ते 27.03.2010 पर्यंतचा होता ही बाब मान्य केली आहे. तसेच गैरअर्जदारांनी पॉलिसीच्या अटी व शर्ती निशाणी क्र.1 व 2 वर दाखल असल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी त्यांचे सर्व्हेअरने केलेल्या रिपोर्ट नुसार त्यांनी विमाकृत केलेली गाही ही अपघात ग्रस्त गाडी नसल्याचे नमुद केले आहे. तसेच विमाकृत वाहनाचा इंजिन व चेसिस नंबर अनुक्रमे 41852 व 32369 असे होते व ज्या वाहनाचा दावा केला आहे त्या वाहनाचा इंजिन व चेसिस नंबर अनुक्रमे ई 3083629 व बी-3076565 असा असुन सर्व्हेअरने दिलेल्या अहवालानुसार तक्रारकर्ता हा दुस-या वाहनाचा दावा करीत असल्याचे गैरअर्जदारांनी नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने सदर दावा खोटया तथ्यावर आधारीत व खोटा असुन पैसे मिळण्याच्या उद्देशाने दाखल करुन मंचाची दिशाभूल केलेली आहे. तसेच त्यांची सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे नमुद केले असुन सदर तक्रार खारिज करण्याची विनंती केली आहे. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.11.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याकडे मारोती आल्टो वाहन क्र. एम.एच.-28/सी-3225, सन 2004 चे मॉडेल होते ते गैरअर्जदाराकडे विमाकृत होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1-अ वरुन स्पष्ट होते. तसेच सदर विमा पॉलिसी क्रमांक व्हीपी 00247417000100 होता ही बाब सुध्दा दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा दि.20.11.2009 रोजीचे पत्रान्वये नाकारलेला असुन आम्ही त्या पत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमा पॉलिसीचा क्रमांक व्हीपी 00247417000100 आहे व वाहनाचा क्रमांक एम.एच.-28/सी-3225 असा आहे. तर अपघाताचा दि.28.06.2009 हा आहे यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्याचे स्पष्ट होते. तसेच विमा दावा नाकारीत असतांना गैरअर्जदारांनी सदर वाहन पूर्वी क्षतिग्रस्त होते असे कारण सदर पत्रात नमुद केले आहे. तसेच सदर तक्रारीला उत्तर देत असतांना गैरअर्जदारांनी नमुद केले आहे की, पॉलिसी घेते वेळेस इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक अनुक्रमे 41852 व 32369 असा होता व ज्या वाहनासाठी विमा दावा केला आहे. त्या वाहनाचा इंजिन व चेसिस क्रमांक ई 3083629 व बी-3076565 असा आहे. त्यामुळे आम्ही तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या श्री. के.के. पोद्दार, सर्व्हेअर यांचा निरीक्षण अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.-28/सी-3225 दर्शविला असुन चेसिस क्रमांक MA3EYD8K500332369 आहे व इंजिन क्रमांक F8DN4041852 आहे म्हणजेच पॉलिसीमध्ये दर्शविलेले इंजिन क्रमांक 41852 व चेसिस क्र. 32369 हा निरीक्षण अहवालातील चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक ह्या पॉलिसीतील चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकाशी जुळत आहे कारण पॉलिसीतील चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक लिहीत असतांना विमा कंपनीने फक्त शेवटचे आकडे घेतलेले आहे जे निरीक्षण अहवालाशी जुळलेले आहे. तसेच निरीक्षण अहवालात कोठेही गैरअर्जदारांनी उत्तरामध्ये दिलेला वाहनाचा चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक बदललेला आहे असे जे म्हटले आहे, ते आढळत नाही. तसेच विमा दावा नाकारन्याच्या पत्रात गैरअर्जदारांनी कुठेही सदर बाबीचा उल्लेख केलेला नाही फक्त वाहनाला पुर्वीच क्षती झाली होती असे म्हटले आहे. त्यामुळे विमा दावा नाकारीत असतांना दिलेले कारण व तक्रारीचे उत्तर दाखल करीत असतांना दिलेले कारण यामध्ये तफावत आढळून येते व त्यामुळे गैरअर्जदारांनी घेतलेला बचावात्मक मुद्दा मान्य करता येत नाही. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीतील सदर वाहनाचे दुरुस्तीचा एकूण खर्च रु.34,931/- आल्याचे त्यांने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदारांच्या निरीक्षण अहवालावरुन तक्रारकर्त्याला रु.17,866/- नुकसान झाल्याचे दर्शविते. मा. राष्ट्रीय आयोग व मा. राज्य आयोगांच्या न्याय निवाडयांचा आधार घेतला असता वाहनाचे दुरुस्तीकरता प्रत्यक्ष खर्च आला असेल त्याकरीता तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता त्याला प्रत्यक्षात आलेला रु.34,931/- वाहन दुरुस्तीचा खर्च मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी अवास्तव असुन न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास विमा दाव्यापोटी वाहन दुरुस्तीचा खर्च रु.34,931/- विमा दावा नाकारल्याचा दिनांक 20.11.2009 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत अदा करावे. सदर रक्कम आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसांत न दिल्यास व्याज द.सा.द.शे.9% ऐवजी द.सा.द.शे.12% देय राहील. 4. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी वैयक्तिक किेंवा संयुक्तिकरित्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |