तक्रारदाराच्या विलंब माफीच्या अर्जावर आदेश
तक्रारदाराने सदरची तक्रार सामनेवाले विमा कंपनीने अंशतःच विमा दावा मंजूर केल्याने दाखल केली आहे. सदरची तक्रार दाखल करणेकामी 23 दिवसांचा विलंब झाल्याने विलंबमाफीचा अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदाराचा विलंबमाफीचा अर्ज व त्यावरील युक्तिवाद ऐकण्यात आला.
सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा दिनांक 30/03/2022 रोजी नामंजूर केला. सबब तक्रारदारांनी विमा लोकपालाकडे तक्रार दाखल केली. सदर विमा लोकपालाने तक्रारदाराची तक्रार मंजूर करून दिनांक 16/06/2023 रोजी तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला. सदर आदेशान्वये सामनेवाले विमा कंपनीने रक्कम रुपये 82,060/- चा दिनांक 25/07/2023 रोजीचा धनादेश तक्रारदारास दिनांक 27/07/2023 रोजी पोस्टाने पाठवला. सदरचा धनादेश तक्रारदाराने वटविणेकामे त्यांच्या बँकेत सादर केला नाही.
तक्रारदाराचे कथना व युक्तिवादानुसार ते ज्येष्ठ नागरिक असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने विमा लोकपालाच्या आदेशाविरुद्ध तक्रार दाखल करणेकामी मार्च 2024 मध्ये वकील राकेश जैन यांना भेटले; परंतु जे वकील ग्राहक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याचे काम करतात त्या वकीलांना भेटण्याचा सल्ला सदर वकिलांनी दिला.
सबब तक्रारदारास ते जेष्ठ नागरिक असल्याने व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने तसेच वकिलांनी तक्रार दाखल करण्यास घेतलेल्या वेळेमुळे ते वेळेत तक्रार दाखल करू शकले नाही त्यामुळे झालेला 23 दिवसांचा विलंब माफ होऊन मिळणेकामी सदर अर्ज दाखल केला आहे.
वास्तविक विमा लोकपालाच्या दिनांक 16/06/2023 च्या आदेशान्वये विमा दाव्याची रक्कम अंशतः देण्याच्या आदेशाविरुद्ध सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब 16/06/2023 पासून ते 16/06/2025 पावेतो तक्रारदार तक्रार दाखल करू शकतात. तक्रारदाराने सदरची तक्रार ही दिनांक 23/04/2024 रोजी दाखल केली. सबब निश्चितच तक्रारदाराने सदरची तक्रार मुदतीत दाखल केली असल्याचे स्पष्ट होते.
तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा हा 30/03/2022 रोजी नाकारला असल्याने दिनांक 30/03/2024 पासून विमा लोकपाल यांचे कडील दिनांक 16/06/2023 रोजीच्या आदेशापर्यंतचा कालावधी हा विमा लोकपाल यांचे पुढील सुनावणीकामी लागला असल्याच्या कारणास्तव देखील तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही मुदतीत असल्याचे स्पष्ट होते. सबब सदरचा विलंब माफीचा अर्ज विनाखर्च मंजूर करण्यात येतो.
अंतिम आदेश
- तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज MA NO.16/2024 मंजूर करण्यात येतो .
- खर्चबाबत आदेश नाही.