अॅड राजेश रास्ते तक्रारदारांकरिता
अॅड आरती सोमण [जोशी] जाबदेणार क्र.1 करिता
अॅड किन्नरकर जाबदेणार क्र. 2 करिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 15/सप्टेंबर/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी त्यांच्या मारुती कार – ओम्नी साठी जाबदेणार क्र.1 यांच्याकडून दिनांक 24/8/2010 ते 23/8/2011 या कालावधीसाठी पॉलिसी घेतली होती. तक्रारदारांनी गाडीला अधिकृतपणे सी.एन.जी किट बसविला होता. त्यासाठी ARTO ने देखील आदेश दिला होता. रजिस्ट्रेशन सर्टिफिकीट वर गाडीचे इंधन म्हणून पेट सी.एन.जी असे नमूद केले होते. तक्रारदारांच्या गाडीमध्ये हेड लाईटची समस्या निर्माण झाल्यामुळे दिनांक 12/3/2011 रोजी साधारण 2.15 वा. हेड लाईट दुरुस्तीसाठी राहूल मोटार्स गॅरेजमध्ये नेली. ज्यावेळी गाडी गॅरेज मध्ये नेली त्यावेळी सर्व कामगारांचा लंच अवर सुरु होता. म्हणून तक्रारदारांनी गाडी पब्लिक पार्किंग प्लेस मध्ये – जीत सोसायटी रस्त्यावर लावली आणि गाडीच्या किल्ल्या राहूल मोटार्सच्या मेकॅनिक कडे देऊन तक्रारदार तेथून निघून गेले. साधारण 2.45 वा. तक्रारदारांना राहूल मोटार्स मधून दुरध्वनी आला आणि तक्रारदारांच्या गाडीच्या बोनेटला आग लागून धूर येऊ लागल्याची माहिती राहूल मोटार्सनी तक्रारदारांना दिली. तक्रारदार धावत गाडीकडे आले तोपर्यन्त गाडीच्या समोरचा भाग व सिटला आग लागली होती, अग्निशमन दलाच्या माणसांनी आग विझवली. परंतु तक्रारदारांची गाडी पूर्णपणे जळून नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी गाडीच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याचवेळी आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे नमूद केले. त्यानंतर तक्रारदारांनी कोथरुड पोलिस स्टेशन मध्ये दिनांक 29/4/2011 रोजी तक्रार नोंदविली. पोलिसांनी राहूल मोटार्सचे श्री. राहूल अनंद हंगणे यांचा जबाब नोंदवून घेतला. पंचनामा केला. तक्रारदारांनी घटनेची माहिती जाबदेणार क्र 1 यांना दिली व रुपये 3,50,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. क्लेम सोबत तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे, पंचनामा, जबाब, अग्निशमन दलाचा दिनांक 16/5/2011 चा अहवाल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकीटही जोडले. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 14/6/2011 रोजी तक्रारदारास पत्र पाठवून तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार क्र.1 यांनी त्यांना सर्व्हेअरचा अहवाल पाठवून दिला नव्हता. म्हणजेच जाबदेणार क्र.1 यांनी योग्य प्रकारे सर्व्हे केलेला नव्हता म्हणून नुकसानीचे मुल्यमापन करण्यासाठी योग्य सर्व्हेअरची नियुक्ती करावी असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 3,50,000/- क्लेम दिनांकापासून 12 टक्के द.सा.द.शे व्याजासह मिळावेत अशी मागणी करतात. नुकसान भरपाई पोटी रुपये 75,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- एकूण रुपये 4,45,000/- ची मागणी करतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार 1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्या गाडीचे हेड लाईट मध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे राहूल मोटार्स यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिली होती आणि तिथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. गाडी राहूल मोटार्स यांच्या ताब्यात होती, आणि तिथेच इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीचे जे नुकसान झाले ते देण्याची जबाबदारी राहूल मोटार्स यांची आहे, जाबदेणार क्र.2 यांची नाही. इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 नुसार राहूल मोटार्स हे बेली [Bailee] म्हणून तर तक्रारदार हे बेलर [Bailor] संबोधण्यात येतात. तक्रारदारांनी – बेलर यांनी राहूल मोटार्स – बेली यांच्याकडे सेफ कस्टडी मध्ये ठेवलेली असल्यामुळे तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास जाबदेणार जबाबदार नाही, नुकसान भरपाईची रक्कम राहूल मोटार्स यांनी दयावी असे जाबदेणार क्र.1 नमूद करतात. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार इलेक्ट्रिकल ब्रेक डाऊन, फेल्युअर, ब्रेकेजेस मुळे काही नुकसान झाले असल्यास ते वगळण्यात येते. पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये
“ The company shall not be liable to make any payment in respect of –
(a) Consequential loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failure or breakages.”
असे नमूद करण्यात आलेले आहे.
वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात.
3. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.2 यांनी तक्रारदारांच्या सर्व मागण्या खोडल्या व शपथपत्र दाखल केले.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांची गाडी मारुती ओम्नी मध्ये हेडलाईट समस्या निर्माण झाल्यामुळे दुरुस्तीसाठी राहूल मोटार्स यांच्याकडे नेली असता लंच अवर सुरु असल्यामुळे गाडी गॅरेज समोर लावली. गाडीच्या किल्ल्या राहूल मोटार्सच्या मेकॅनिक कडे दिल्या. त्यानंतर गाडीस आग लागली व गाडीचे नुकसान झाले. जाबदेणार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार गाडीच्या हेड लाईट दुरुस्तीसाठी गाडी राहूल मोटार्स यांच्याकडे नेली असता इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झाल्यामुळे, ब्रेक डाऊन झाल्यामुळे गाडीचे नुकसान झाले तर क्लेम देण्याची जबाबदारी जाबदेणार यांची नाही असे पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसारच तक्रारदारांचा क्लेम नामंजुर करण्यात आला होता. तक्रारदारांनी राहूल मोटार्स यांच्या कस्टडीमध्ये दुरुस्तीसाठी उभी केली असता इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे आग लागली व नुकसान झाले त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास राहूल मोटार्स जबाबदार ठरतात असे जाबदेणार क्र.1 यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी अग्निशमन दलाच्या घटनास्थळाच्या पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये आगीचे अंदाजे कारण – इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे” असे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यामध्ये “ सर्जेराव वधे रा. वडगांव धायरी, पुणे यांची मारुती व्हॅन नं एमएच/12/एफ के/8325 ही वायरींगचे कामासाठी लावून कामगारांचे कडे चावी देवून निघुन गेले. कामगार जेवण करुन हात धुणेसाठी बाहेर आले असता गाडीतून धुर निघालेचे दिसलेने गाडीचा दरवाजा उघडला असता वायरिंग पेटून गॅस टाकीने पेट घेतला” असे नमूद करण्यात आले आहे. तसेच गॅरेज मालक श्री. राहूल अनंद हंगणे यांनी जबाबामध्ये तक्रारदारांनी गाडी दुरुस्तीसाठी आणून ठेवली व कामगार जेवत असल्याने त्यांनी गाडी पार्क करुन चावी कामगारांकडे आणून दिली. कामगार जेवण करुन हात धुणे साठी आले असता त्यांना गाडीतून धुर येत असतांना दिसला तेव्हा त्यांनी पुढील सिट उचलले असता सिट खालील वायरिंग जळाले व अचानक पेट घेतला म्हणून फायर ब्रिगेड बोलावले असे नमूद केले आहे.
जाबदेणार क्र. 1 यांनी केवळ पोलिस पंचनामा, अग्निशमन दलाचा पंचनामा व जाब जबाब यावरुन तक्रारदारांची गाडी वायरिंग मुळे पेट घेतली असा अर्थ लावून व पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या आधारे तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला. वास्तविक जाबदेणार क्र.1 – विमा कंपनी यांनी इन्व्हेस्टिगेटर नियुक्त करावयास हवा होता. इन्व्हेस्टिगेटरच्या अहवालावरुन गाडी जळण्याचे कारण कळू शकले असते. परंतु पोलिस पंचनाम्यावर अवलंबून राहून जाबदेणार यांनी क्लेम नामंजुर केला. तक्रारदारांनी त्यांची गाडी चालवत आणून व्यवस्थित राहूल मोटार्स समोर लावली असता आगीमुळे गाडीचे नुकसान झाले याचे संयुक्तिक कारण लेखी जबाबामध्ये व क्लेम नामंजुरीच्या पत्रामध्ये नमुद करण्यात आलेले नाही. केवळ बेलमेंट, बेलर व बेली, पोलिस पंचनामा नुसार क्लेम नामंजुर करणे हे चुकीचे आहे. जाबदेणार क्र. 1 यांनी केवळ सर्व्हेअरची नियुक्ती केली परंतु इन्व्हेस्टिगेटरची नियुक्ती केली नाही ही जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. सर्व्हेअर – श्री. कैलास के. वणवे यांचा दिनांक 24/3/2011 चा अहवाल मंचासमोर दाखल करण्यात आला आहे. सदर अहवालामध्ये गाडीचे नुकसानीचे मुल्यांकन रुपये 2,38,000/- दाखविण्यात आलेले आहे. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला परंतु नामंजुर करतांना योग्य प्रोसिजर अवलंबली नाही, इन्व्हेस्टिगेटरची नियुक्ती केली नाही, ही जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून सर्व्हेअरच्या अहवालानुसार जाबदेणार क्र.1 गाडीच्या नुकसान भरपाई पोटी रुपये 2,38,000/- क्लेम नामंजुरीच्या दिनांकापासून 9 टक्के व्याजासह देण्यास जबाबदार ठरतात.
जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाबामध्ये काहीच नमुद केलेले नसल्यामुळे व जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेत वर नमुद केल्याप्रमाणे त्रुटी असल्यामुळे जाबदेणार क्र.2 यांच्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: जाबदेणार क्र.1 यांच्या विरुध्द मान्य करण्यात येते.
[2] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 2,38,000/- दिनांक 14/6/2011 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 2,000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.