निकाल (घोषित द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य ) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिने गैरअर्जदार रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत विमा उतरविला होता. विमा कालावधीमध्येच हायपर टेंशनचा त्रास होऊ लागला व तिला अस्वस्थ वाटू लागले म्हणून तिने रॉयल हॅस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम सिडको औरंगाबाद येथे दिनांक 21/5/2009 ते 15/6/2009 या कालावधीत उपचार घेतले. उपचारासाठी तिला रु 88,317/- खर्च करावे लागले म्हणून तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला आणि त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दिनांक 11/7/2009 व दिनांक 18/7/2009 रोजी विमा कंपनीकडे दाखल केली. परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने तिने लबाडीने विमा दावा दाखल केला या चुकीच्या कारणावरुन फेटाळला व तिला त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदार विमा कंपनीकडून उपचाराच्या खर्चाची रक्कम रु 88,317/- व्याज व नुकसान भरपाईसह देण्यात यावी. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदराने तिचा मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत विमा उतरविला होता आणि तिने विमा दावा सादर केला होता हे मान्य केले आहे. तक्रारदाराने विमा दावा सादर केल्यानंतर विमा कंपनीने विमा दाव्याची तपासणी करण्यासाठी चौकशी अधिका-याची नेमणूक केली आणि त्यांना असे आढळून आले की, तक्रारदाराने हायपरटेंशन व अँजेनिया या आजारासाठी रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटरनिटी होम येथे उपचार घेतले ते हॉस्पिटल दिलेल्या पत्यावर अस्तित्वात नाही. तक्रारदाराने विमा रक्कम मिळावी म्हणून खोटे दस्तऐवज तयार करुन लबाडीने विमा दावा दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला असून तिने घेतलेली विमा पॉलिसी रद्द केलेली आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. तक्रारदार आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड पी.आर.अडकिणे आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड अविनाश देशपांडे यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत विमा उतरविला होता याविषयी वाद नाही. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार विमा कालावधीमध्येच तिला हायपरटेंशनचा त्रास झाला आणि रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम सिडको औरंगाबाद येथे उपचार घ्यावे लागले आणि तिला उपचारासाठी रु 88,317/- खर्च करावे लागले म्हणून तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला.परंतु चुकीच्या कारणावरुन विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिली. या संदर्भात विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने विमा दावा सादर केल्यानंतर विमा दाव्याची तपासणी करण्यासाठी चौकशी अधिका-याची नेमणूक केली आणि त्यांना असे आढळून आले की, तक्रारदाराने उपचार घेतलेले रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम हे नमूद पत्त्यावर नाही. परंतु तेथे रॉयल हाऊसिंग सोसायटी आहे. विमा कंपनीने त्यांच्या हया म्हणण्याच्या पुष्ठयर्थ डॉ खेमचंद गोविंदराम टेकचंदानी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. विमा कंपनीचे हे म्हणणे खोडून काढण्यासाठी तक्रारदाराने रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम हे व्हाईट हाऊस, प्लॉट क्र 11 रॉयल कॉलनी, एन 8, सिडको औरंगाबाद येथेच आहे हे दर्शविण्यासाठी आरोग्य विभाग महानगरपालिका, औरंगाबाद यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये हॉस्पिटलचे नावामध्ये खाडाखोड केल्याचे आणि हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता न देता फक्त एन 8, सिडको एवढेच नमूद केलेले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. परंतु रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम हे नमूद केलेल्या पत्त्यावरच आहे हे दाखवण्यासाठी तक्रारदाराने इतर कोणताही पुरावा दाखल केला नाही.तक्रारदाराला रॉयल हॉस्पीटल अस्तित्वात असल्याचे दर्शविण्यासाठी संबंधित हॉस्पीटलच्या डॉक्टरची साक्ष नोंदविता आली असती परंतु तिने कोणताही पुरावा दिला नाही व जो पुरावा दिला तो संशयास्पद आहे. विमा कंपनीने दाखल केलेल्या डॉ.टेकचंदानी यांनी शपथपत्रामध्ये रॉयल हाऊसिंग सोसायटी आढळून आली परंतु रॉयल हॉस्पिटल अन्ड मॅटर्निटी होम नमूद केलेल्या पत्त्यावर आढळून आले नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि विमा कंपनीच्या या म्हणण्यावर अविश्वास दाखविण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळला असून तक्रारदाराची विमा पॉलिसी रद्द केली आहे यामध्ये कोणतीही चुक केलेली नाही आणि विमा कंपनीच्या सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी दिसून येत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |