जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 819/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 04/07/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 24/07/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
श्री.नारायण वसंतमल मंगलानी,
उ.व.45 वर्षे, धंदाः व्यापार,
रा.31/2, गुरुकुल हाऊसिंग सोसायटी,
पटेल रोडवेजचे मागे, जळगांव, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. रॉयल सुंदरम अलायंस इंन्शुरन्स कंपनी लि,
सुंदरम टॉवर, 46, व्हाईटस रोड,
रोया पेठ, चेन्नई 600 014.
2. शाखा कार्यालय,
2.रॉयल सुंदरम अलायंस इंन्शुरन्स कंपनी लि,
2.मानराज मोटर्स प्रा.लि.,
2.अजंठा रोड, एम.आय.डी.सी.जळगांव.
3. मानराज मोटर्स प्रा.लि.,
3.अजंठा रोड, एम.आय.डी.सी.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री संतोषकुमार पी.चोपडा वकील हजर
सामनेवाला क्र.1 तर्फे श्री.ए.एस.चौगुले वकील हजर.
सामनेवाला क्र.3 तर्फे हेमंत अ.भंगाळे वकील हजर.
सामनेवाला क्र. 2 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार यांनी त्यांचे स्वतःचे मालकीचे मारुती कंपनीचे अल्टो रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.19/ अ ई 6804 या चारचाकी वाहनाचा सामनेवाला क्रमांक 1 यांचे कडे सामनेवाला क्र. 2 तर्फे विमा पॉलीसी क्रमांक एम.पी.30088016 अन्वये दि.20/08/2007 ते दि.19/08/2008 या कालावधीकरिता विमा हप्ता रक्कम रु.7,683/- भरणा करुन विमा उतरवला होता. तक्रारदाराचे भाऊ श्री.प्रकाश वसंतलाल मंगलानी हे दि.1/2/2008 रोजी उपरोक्त वाहनाने जात असतांना सदर वाहनास अकोट, जि.अकोला येथे झाडास ठोस लागुन अपघात झाला. सदर अपघातात वाहनाचे अतोनात नुकसान झाले. अपघाताचे घटनेबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना त्वरीत सुचना देऊन सामनेवाला कंपनीचे अधिकृत सर्व्हेअर श्री.एल.एस.मालपाणी यांनी त्वरीत येऊन सर्व्हे केला व त्याचा अहवाल दि.14/2/2008 रोजी सामनेवाला कंपनीकडे सादर केला. अपघातात तक्रारदाराचे विमाकृत वाहनाचे सुमारे रक्कम रु.1,62,387.10 चे नुकसान झाले. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही तसेच सामनेवाला क्र. 3 यांनी दिलेल्या कोटेशन व बिल प्रमाणे रक्कम रु.1,31,504/- ची रक्कम तक्रारदारास अदा न करुन सदोष सेवा प्रदान केली आहे. तक्रारदारास वाहन ताब्यात घेतांना रक्कम रु.24,740/- जादा रक्कम अदा करावी लागली होती व त्याबाबत सामनेवाला क्र. 3 यांनी पावती नंबर आर.सी.पी.08000008 दि.2/4/2008 अन्वये दिलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम देण्यास टाळाटाळ करुन तक्रारदारास त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सबब तक्रारदारास विमा पॉलीसी प्रमाणे बिलाप्रमाणे जास्त भरावी लागलेली रक्कम रु.24,740/- तसेच त्यावरील व्याज व नोटीस खर्च रु.1,500/- सामनेवाला यांचेकडुन मिळावा, सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास वेळेवर कार दुरुस्त करुन न दिल्यामुळे दुस-या कारचे भाडे रु.20,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- अशी एकुण रक्कम रु.40,000/- मिळावी, तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडुन तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- मिळावेत व या तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
2. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुत तक्रारीकामी तक्रारदाराचा क्लेम रक्कम रु.1,14,468/- इतक्या रक्कमेस मंजुर करण्यात येऊन सदरची रक्कम मानराज मोटर्स लि.यांना अदा करण्यात आलेली असुन तक्रारदाराने उर्वरीत रक्कमेची केलेली मागणी ही या मंचासमोर चालण्यास पात्र नाही. तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करणारे तथाकथीत श्री.मालपाणी हे सामनेवाला यांचे अधिकृत सर्व्हेअर नसुन ते शासनातर्फे नियुक्त अधिकृत सर्व्हेअर आहेत. सर्व्हेअरने अपघातग्रस्त वाहनाचा विमा रक्कम रु.1,14,468.67 इतक्या रक्कमेस एकदा निश्चित केल्यानंतर त्यात तक्रारदाराचे कथनानुसार वाढीव रक्कम अदा करता येणार नाही. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम पुर्ण व अंतीमरित्या मंजुर केलेला आहे. अशा परिस्थितीत प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला यांचे सेवेत कोणतीही सेवा त्रृटी झालेली नाही. प्रस्तुत कामी तक्रारदार हे स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. त्यांनी ब-याच बाबी मंचापासुन लपवुन ठेवलेल्या आहेत. सामनेवाला क्र. 3 यांचेकडुन जर काही सेवा त्रृटी झाली असेल तर त्यास या सामनेवाला यास जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाला हे तक्रारदारास कोणतीही रक्कम अगर नुकसानी देण्यास जबाबदार नाहीत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
3. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 3 यांचा तक्रारदार हा ग्राहक नाही. सामनेवाला क्र. 3 हे मारुती सुझूकीचे अधिकृत सर्व्हीस स्टेशन व विक्रेता असुन तक्रारदार यांचे वाहन सामनेवाला क्र. 3 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिलेले होते. तक्रारदाराचे वाहनास दि.1/2/2008 रोजी अपघात झाला याबाबत सामनेवाला क्र. 3 यांना काहीएक माहिती नाही. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास रु.24,740/- ची पावती दिली हा मजकुर सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी सदर रक्कम भरण्यास कारण घडलेले आहे. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारास त्याचे वाहन दि.16/2/2008 पर्यंत ताब्यात देण्याचे आश्वासन दिलेले नव्हते. तसेच तक्रारदार यांनी कार दुरुस्त करणेबाबत विनंतीही केली नव्हती त्यामुळे तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रश्न येत नाही. तक्रारदाराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तक्रारदाराचे नुकसान भरपाई देण्यास सामनेवाला क्र. 3 जबाबदार नाही. सामनेवाला यांचे नियमाप्रमाणे जोपावेतो कोणत्याही वाहनाचे असेसमेंट रिपोर्ट पुर्ण होत नाही तो पावेतो वाहनाचे कुठलेही काम होत नाही. सदरील वाहनाचा असेसमेंट रिपोर्ट दि.14/02/2008 रोजी झालेला असुन त्याप्रमाणे असेसमेंट केल्यानंतर इंन्शुरन्स फरकाची रक्कम काढली ती सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदार यांचेकडुन दि.2/4/2008 रोजी रु.24,740/- घेऊन त्याची रितसर पावती देऊन वसुल केली आहे. तक्रारदाराकडुन योग्य रक्कम कायदेशीररित्या घेतलेली आहे. सामनेवाला क्र. 3 यांनी घेतलेली रक्कम ही इंन्शुरन्स फरकाची रक्कम असुन त्याची रितसर पावती दिलेली आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जापुर्वी सदर रक्कमेबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही अथवा हरकत घेतलेली नाही. सामनेवाला क्र. 3 यांना त्रास देण्याचे हेतुने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे. सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र. 3 विरुध्द खर्चासह रद्य करण्यात यावा व ग्राहक संरक्षण कायदा कलम 26 नुसार रक्कम रु.10,000/- नुकसान भरपाई तक्रारदाराकडुन मिळावी व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- सामनेवाला क्र. 3 यांना मिळावा अशी विनंती सामनेवाला क्र. 3 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 2 यांना या मंचातर्फे पाठविण्यात आलेली रजिस्ट्रर नोटीस प्राप्त होऊन देखील त्यांनी प्रस्तुत प्रकरणी त्यांचे म्हणणे सादर न केल्याने व हजर न राहील्याने सामनेवाला क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 1 व 3 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... नाही
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केल्याप्रमाणे त्यांचे गाडीस अपघात झाला असता सदरील वाहन दुरुस्तीसाठी ते सामनेवाला क्रं. 3 यांचेकडे घेऊन आले असता. सदरील वाहनास दुरुस्तीसाठी एकूण रक्कम रुपये 1,31,504/- इतका खर्च येईल याबाबतचे त्यांनी तक्रारदार यांना इनव्हाईस दिलेले आहे. परंतु सामनेवाला क्रं. 1 इंशुरन्स कंपनी यांनी तक्रारदार यांचा क्लेम इतक्या रक्कमेचा मंजूर न करता सामनेवाला विमा कंपनीने कमी रक्कमेचा तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला त्यामुळे राहीलेल्या फरकाची रक्कम रुपये 24,740/- सामनेवाला क्रं. 3 यांनी तक्रारदार यांचेकडून घेऊन तक्रारदार यांना रितसर पावती दिलेली आहे. तक्रारदार यांचा क्लेम सेटल झाले नंतर सामनेवाला विमा कंपनीने त्यांना विमा क्लेमचे रक्कमेबाबत जो चेक दिलेला आहे तो तक्रारदार यांनी विनातक्रार स्विकारलेला आहे. तक्रारदार यांना सदरील रक्कम कमी वाटत होती तर त्यांनी सदरील चेक त्यांचा हक्क कायम ठेऊन सदरील चेक स्विकारावयास पाहिजे होता परंतु त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे सदरील तक्रारीस काही एक कारण घडलेले नाही असे मंचाचे मत आहे. अपघातग्रस्त गाडीचे दुरुस्तीपोटी येणा-या खर्चापेक्षा कमी रक्कमेचा चेक सामनेवाला विमा कंपनीने दिल्यामुळे सामनेवाला क्रं. 3 यांनी घेतलेली रक्कम ही इंशुरन्स फरकाची रक्कम घेतलेली असून त्याबाबत तक्रारदार यांना रितसर पावती दिलेली आहे व तक्रारदार यांनी त्यावेळी कोणतीच हरकत घेतलेली नाही. सबब सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम योग्य रित्या मंजूर केलेला व इंशुरन्सच्या फरकाची रक्कम सामनेवाला क्रं. 3 यांनी तक्रारदार यांचेकडून घेतली आहे ती योग्य आहे असे मंचाचे मत असल्याने मंच पुढील त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या पारीत करीत आहे. आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज नामंजूर करण्यात येतो.
( ब ) उभयपक्षकारांच्या इतर प्रार्थनेबाबत कोणतेही आदेश नाहीत.
( क ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव