(घोषित दि. 30.09.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार अशी की, तक्रारदारांकडे एच.पी.कंपनीचे गॅस कनेक्शन आहे व दोन गॅस सिलेंडर आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ही गॅस कंपनीची वितरक आहे तर गैरअर्जदार क्रमांक 2 ही गैरअर्जदार क्रमांक 1 ची विमा कंपनी आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे नावे LPG GAS Dealer package policy दिलेली आहे. पॉलीसीचा क्रमांक 23/202/46/09/22/00000149 असा आहे तर तिचा वैधता कलावधी दिनांक 11.10.2009 ते 10.10.2010 असा आहे. सदरच्या विमा पॉलीसीत Public liability चा अंतर्भाव आहे.
दिनांक 03.10.2010 रोजी 12.30 वाजता अचानक गॅस गळती मुळे तक्रारदारांच्या स्वयंपाक घरात आग लागली आणि त्यांच्या घरातील वॉशिंग मशीन, टी.व्ही, फ्रीज, इन्व्हर्टर, विजेची इतर सर्व उपकरणे, स्वयंपाक घराचे फर्निचर, किराणा सामान, चांदीची देवाची मूर्ती यांचे संपूर्ण नुकसान झाले. एकूण तक्रारदारांचे रुपये 7,16,700/- रुपयांचे नुकसान झाले. फायर ब्रिगेडच्या लोकांनी शेवटी आग विझवली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अगोदर तपासणी न करता गॅस सिलेंडर दिल्यामुळे प्रस्तुतचा अपघात झाला. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना दूरध्वनीने अपघाताची माहिती दिली. त्यानंतर सर्वेअरने येवून नुकसानीची पाहणी केली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या नोकराने निष्काळजीपणाने पूर्व तपासणी न करता गॅस सिलेंडर दिल्यामुळेच प्रस्तुतचा अपघात झाला.
तक्रारदारांनी विमा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 च्या सांगण्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे दिला. परंतू प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत घटनेची माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनला दिली. त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारदारांना त्यांचे घराचे नुकसान झाल्यामुळे अनेक दिवस मुलीच्या घरी राहायला जावे लागले. त्यांना नविन गॅस रेग्युलेटर व वीज जोडणी घ्यावी लागली. वरील सर्व घटनांमुळे शरिरिक व मानसिक त्रास झाला तसेच आर्थिक नुकसान सोसावे लागले.
गैरअर्जदारांनी विम्याची रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदारांनी त्यांना दिनांक 27.07.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली त्याला गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्तर दिले.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे संयुक्तरित्या तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मुदतीत निकाली न काढून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडून खालील रकमेची मागणी करतात.
अ.क्रं. | तपशील | रक्कम रुपये |
1. | संपत्तीच्या नुकसाना बद्दल | 7,16,700.00 |
2. | शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल | 4,50,000.00 |
3. | सेवेतील त्रुटीबाबत | 3,00,000.00 |
| एकूण | 14,66,700.00 |
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत त्यांच्या घराच्या फर्निचरच्या दुरुस्तीची तसेच विविध वीजेच्या उपकरणांच्या दुरुस्तीचे estimate, फिर्याद व घटनास्थळ पंचनामा यांची झेरॉक्स प्रत, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, गैरअर्जदारांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, त्याला गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी जबाबात म्हणतात की तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होता. त्यांच्या घरी अपघात घडला व त्याची माहिती गैरअर्जदार क्रमांक 1 यांना मिळाली. तक्रारदारांच्या नुकसानी बाबत सर्वे करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांची गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे विमा पॉलीसी काढलेली होती या गोष्टी त्यांना मान्य आहेत. परंतु तक्रारदारांना सेवा देताना त्यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. जरी तक्रारदार नुकसान भरपाईस पात्र ठरला तरी ती देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 यांची आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ना नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी म्हणण्याप्रमाणे त्यांना देखील विमा पॉलिसी व तिचा कालावधी मान्य आहे. परंतु ते म्हणतात की सर्वेअरने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, गॅस सिलेंडर चांगल्या अवस्थेत होते फक्त रबरी नळी व रेग्युलेटर जळाले होते त्यावरुन गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला नाही केवळ रबरी नळी व रेग्युलेटर मधून गॅस गळती झाल्यामुळे अपघात झाला आहे. त्यामुळे तक्रारदार कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाईस पात्र नाही. सर्वेअरने तक्रारदारांचे नुकसान केवळ रुपये 3,58,579/- इतकेच दाखवले आहे. त्यामुळे तक्रारदार मागत आलेली रुपये 14,66,700/- इतकी नुकसान भरपाई अवाजवी आहे. गैरअर्जदार 2 यांनी निष्काळजीपणा अथवा सेवेत त्रुटी केली आहे ही गोष्ट तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. तक्रारदार मंचा समोर प्रामाणिकपणे आलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 2 नी आपल्या जबाबासोबत सर्वे रिपोर्ट दाखल केला आहे.
तक्रारदारांतर्फे विद्वान वकील श्री.रहेमत अली, गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे विद्वान वकील श्री.एच.ए.नवाब व गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
मुद्दा निष्कर्ष
1.तक्रारदारांनी ते गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 होय अंतिम आदेशात
यांचेकडून नुकसान भरपाई पोटी विम्याची रक्कम म्हटलेल्या रक्कमेस
मिळण्यास पात्र आहेत हे सिध्द केले आहे का ? पात्र आहेत.
2.तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2
यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेत कसूर केली
हे सिध्द केले आहे का ? होय
3.काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2 साठी –गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे LPG GAS Dealer package policy घेतलेली होती. तिचा क्रमांक 23/202/46/09/22/00000149 असा होता व तिचा वैधता कालावधी दिनांक 11.10.2009 ते 10.10.2010 असा होता. या पॉलीसी अंतर्गत रुपये 1,00,000/- इतक्या रकमे पर्यंतचा Public liability चा अंतर्भाव आहे. या गोष्टी तक्रारदारांनी दाखल केलेल्या पॉलीसीच्या प्रतीवरुन सिध्द होतात व त्या उभयपक्षी मान्य आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पॉलीसीच्या प्रतीच्या शेडयूलच्या क्रमांक 6 मध्ये रुपये 10,00,000/- पर्यंतच्या Public liability चा उल्लेख केलेला आहे.
त्यात PUBLIC LIABILITY – The company will indemnify the insured (or in the event of the death of the insured his legal representative) against all sums which the insured shall become legally liable to pay in the event of
(b) Accidental damage to property (not being property of or belonging or in the custody or under the control of the insured’ or any person in the services of the insured or upon which the insured or any such person is or has been working if that damage results directly from such work) happening during the period of insurance specified in the schedule in connection with the Trade/Business as described in the schedule. असे नमूद केले आहे.
दिनांक 03.10.2010 रोजी दुपारी तक्रारदारांच्या घरात गॅस गळतीमुळे अपघात झाला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यात असे म्हटले आहे की तेथे गॅस सिलेंडर जळालेल्या व त्याचे रबरी पाईप व रेग्युलेटर जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. स्वयंपाकाच्या ओटयाला तडे गेले आहेत. दरवाजे जळाले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या सर्वे रिपोर्ट प्रमाणे देखील घराच्या तीन खोल्यांचे नुकसान झालेले दिसते आहे. ओटयाला तडे गेले आहेत. सर्वे रिपोर्ट मध्ये पुढे नमूद केले आहे की गॅस सिलेंडर चांगल्या अवस्थेत होते परंतू रबरी पाईप व रेग्युलेटर जळालेल्या अवस्थेत होते व त्यावरुन सर्वेअरने हा गॅसचा स्फोट नसून रेग्युलेटर व रबरी पाईप मधून गळती लागल्याने अपघात झाला असे म्हटले आहे. परंतु घटनास्थळ पंचनामा व सर्वे रिपोर्टमध्ये नमूद केलेले नुकसान बघता ते मोठया प्रमाणावरील गॅस गळतीमुळे झाले दिसते.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या निष्काळजीपणाने अपघात झाला आहे गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला नाही रेग्युलेटर व पाइप मधून गॅस गळती झालेली आहे तर गैरअर्जदार क्रमांक 1 म्हणतात की त्यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. जरी तक्रारदार नुकसान भरपाईस पात्र ठरला तरी ती देण्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनीची आहे. परंतु प्रस्तुतचा अपघात तक्रारदारांच्या निष्काळजीपणाने झाला आहे असा कोणताही पुरावा गैरअर्जदारांनी मंचापुढे आणलेला नाही. गॅस सिलेंडर, पाईप व रेग्युलेटर देखील पूर्व तपासणी करुनच ग्राहकांना पुरवणे व त्याची वेळोवेळी तपासणी करणे ही गैरअर्जदार क्रमांक 1 ची जबाबदारी होती.
मा.सर्वोच्च न्यायालयाने ‘res ipsa loquitur’ याMaxim बद्दल बोलताना म्हटले आहे की, “In practice there are many cases where res ipsa loquitur is properly invoked in which defendant is unable to explain the accident or show affirmatively either that he took reasonable precaution to avoid injury or the particular cause of injury is not associated with negligence on his part.”
प्रस्तुत तक्रारीत देखील गैरअर्जदार ही गोष्ट सिध्द करु शकलेले नाहीत. तक्रारदारांनी मात्र गॅस गळती झाली व त्यामुळे अपघात झाला ही गोष्ट सिध्द केलेली आहे व ती गैरअर्जदार देखील नाकारत नाहीत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गळतीबाबत पूर्व तपासणी न करता दोषास्पद गॅस सिलेंडरचा पुरवठा केला व त्यामुळे तक्रारदारांच्या घराचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाईच्या रकमेस पात्र आहेत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दिला. दिनांक 27.01.2011 रोजी दोनही गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीसही पाठवली. तक्रारदारांचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवावयास हवा होता व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तो निकाली करुन तक्रारदारांना नुकसान भरपाई द्यायला हवी होती ते त्यांनी केली नाही ही गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी केलेली सेवेतील कमतरता आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
नुकसान भरपाईच्या रकमेचा विचार– गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 10.02.2011 रोजी त्यांचे सर्वेअर यांनी तयार केलेला सर्वे रिपोर्ट नि.21/1 वर दाखल केला आहे. त्यांच्या रिपोर्ट मध्ये म्हटल्या प्रमाणे त्यांनी तक्रारदारांना वस्तु विकत घेतल्याची बिले व इतर दुरुस्तीचे कोटेशन दाखल करण्यास सांगितले तेव्हा तक्रारदारांनी त्यांना estimate व quotation दिले आणि वस्तु खरेदीची सर्व बिले अपघातात नष्ट झाल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांनी वरील गोष्टींच्या बाजारभावाची चौकशी केली व त्याप्रमाणे नुकसानीचा अंदाज (assessment) केला. त्यांनी त्यांच्या रिपोर्ट बरोबर त्याचे सविस्तर विवरण देखील दिले आहे. त्यांनी तक्रारदारांचे एकूण नुकसान 3,58,579/- रुपये एवढे दाखवले आहे.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी सोबत अनेक कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु ती सर्व कागदपत्रे म्हणजे वेगवेगळया दुकानांची केवळ quotation आहेत. त्यात कोणत्याही वस्तु खरेदीची प्रत्यक्ष बिले नाहीत.
तक्रारदारांच्या वकीलांनी सर्वे रिपोर्ट म्हणजे शेवटचा शब्द नाही. सर्वेअर हा इन्शुरन्स कंपनीचा नोकर असतो. त्यामुळे त्यांच्या रिपोर्टवर पूर्ण विश्वास ठेवू नये असे सांगणारे I (1992)CPJ 121 (NC) Rajkamal V/s United Insurance Co. आणि IV (2009) ACC 356 (SC) New India Insurance Co. V/s Pradeep Kumar हे दोन निकाल दाखल केले. परंतु त्यापैकी New India Insurance V/s Pradeep kumar या खटल्यात मा.न्यायालय म्हणते की “Surveyor’s report not last and final word Complainant’s claim accepted by for a as duly supported by original vouchers, bills & receipts”.
वरील निकालात तक्रारदारांनी मूळ बिल दाखल केली होती त्यामुळे तक्रारदारांचा संपूर्ण दावा मंचाने मान्य केला. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारांनी बिले दाखल केलेली नाहीत. त्यामुळे वरील निकाल या तक्रारीस लागू पडत नाही.
तर Rajkamal V/s United Insurance या खटल्यात मा.न्यायालय म्हणते की, “If Surveyor Choose to submit wrong report & Insurance Co. repudiates the claim without applying mind, then the repudiation not justified. It has to be remembered that Surveyors bread comes from their employers.” या निकालात तक्रारदारांनी त्यांच्या व्यापारा संबंधात Statement of account, sale returns , assessment orders यांच्या साक्षांकीत प्रती सर्वेअरला दिल्या होत्या ती सर्व कागदपत्रे अपघाताच्या आधीची होती तरी देखील त्यांचा विचार न करता सर्वेअरने चुकीचा अहवाल दाखल केला होता व त्यावर विसंबून कंपनीने विमा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला होता त्यामुळे वरील निकाल लागू पडत नाही. प्रस्तुत तक्रारीत सर्वेअरने तक्रारदारांनी दिलेल्या कोटेशन मधील बाजार भावांची चौकशी केली. अहवालात त्यांचे सविस्तर विवरण दिलेले आहे. त्यामुळे मंच सर्वेअरचे तक्रारदारांच्या झालेल्या नुकसानी बद्दलचे assessment ग्राहय घरत आहे.
अशा परिस्थितीत तक्रारदारांना सर्वेअरच्या अहवालात नमूद केलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये 3,58,579/- दिनांक तक्रार दाखल केलेल्या दिवसापासून 6 टक्के व्याजदराने देणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते. त्याच प्रमाणे प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- देणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तपणे तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रुपये 3,58,579/- (अक्षरी तिन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकोणऐंशी फक्त.) दिनांक 30.12.2011 पासुन तक्रारदारास रक्कम प्राप्त होईपर्यंत 6 टक्के व्याज दाराने द्यावी.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तपणे तक्रारदारांना प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (अक्षरी दोन हजार पाचशे फक्त) इतका द्यावा.