तक्रारदार : गैर हजर.
सामनेवाले क्र.1 : यांचे विरुध्द प्रकरण रद्द.
सामनेवाले क्र.2 : प्रतिनिधी श्री.आशिष उपाध्याय हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाली ही आपल्या ग्राहकांना पर्यटनाचे ठिकाणी निवासस्थानाची सेवा सुविधा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 10.4.2005 रोजी रु.1,30,000/- जमा केले व सा.वाले यांचे सदस्यत्व स्विकारले. त्या सदस्यत्वाच्यापोटी सा.वाले यांनी तक्रारदारांना पुढील 25 वर्षामध्ये वेगवेगळया पर्यटनाचे ठिकाणी निवासस्थानाची सोय उपलब्ध करुन देण्याचे कबुल केले. तसेच विदेशातील पर्यटन स्थळावर देखील निवासस्थानाची सोय उपलब्ध करुन देण्याचे कबुल केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले यांचेकडे रु.1,30,000/- जमा केल्यानंतर व दिनांक 10.4.2005 रोजी सदस्यत्व स्विकारल्या नंतर तक्रारदारांनी मे,2005 मध्ये सा.वाले यांना गोवा येथील पर्यटन स्थळावर निवासस्थानाची सोय करण्याचे कळविले होते. परंतु सा.वाले यांनी ती उपलब्ध करुन दिली नाही. त्यानंतर दिवाळी 2005 च्या सुट्टीमध्ये देखील तक्रारदारांनी गोवा येथील पर्यटन स्थळावर निवासाची सुविधा करण्याची विनंती केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांच्या विनंतीप्रमाणे कार्यवाही केली नाही. या प्रकारे तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रु.1,30,000/-सदस्यत्वाकामी वसुल केले परंतु तक्रारदारांना कुठलीही सवलत किंवा निवासाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना सदस्यत्व रद्द करण्याचे ठरविले व सा.वाले यांना वकीलामार्फत नोटीस देऊन सदस्यत्वाचे शुल्क रु.1,30,000/- परत मागीतले. सा.वाले यांनी त्या नोटीसीला दिनांक 18.7.2006 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा दिनांक 29.5.2007 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली व सदस्यत्वाचे शुल्क परत मागीतले. त्या नोटीसीला देखील सा.वाले यांनी दाद दिली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 6.8.2008 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना सदस्यत्वाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व सदस्यत्व शुल्क रु.1,30,000/- व नुकसान भरपाई रु.2,30,000/- सा.वाले यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये कराराप्रमाणे सदस्यत्व रद्द करता येत नाही व सदस्यत्वाचे शुल्क परत मागता येत नाही असे कथन केले. पर्यटनस्थळी निवासाची व्यवस्था उपलब्धतेवर अवलंबून असते व पर्यटनस्थळी विशिष्ट मुदतीत जागा उपलब्ध नसेल तर सदस्यास सामाऊन घेतले जात नाही असे कथन केले. मुळातच तक्रारदारांनी आस्थापना शुल्क जमा केलेले नसल्याने तक्रारदारांनी कराराचा भंग केलेला आहे असा आरोप केला व तक्रारदारांनी तक्रारीत मागीतलेली दाद मिळण्यास पात्र नाहीत असे ही कथन केले.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तर सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत वेग वेगळी कागदपत्रे दाखल केली. तर तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. त्या व्यतिरिक्त सा.वाले यांचे प्रतिनिधी यांनी न्याय निर्णयाच्या प्रति दाखल केल्या. तक्राराराने सा.वाले क्र.1 यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली नाही. सबब दिनांक 9 डिसेंबर,2011 च्या आदेशाप्रमाणे सा.वाले क्र.1 यांचे विरध्द तक्रार रद्द करण्यात येते.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे व कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या सदस्यत्वाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून सदस्यत्व शुल्क व नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे सदस्यत्व प्राप्त होणकामी रु.1,30,000/- जमा केले व सा.वाले यांनी तक्रारदारांना सदस्य म्हणून स्विकारले यामध्ये उभय पक्षामध्ये वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या शपथपत्रासोबत करारनाम्याची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये उभयपक्षी शर्ती व अटी नोंदविलेल्या आहेत. तक्रारदारांचे असे कथन आहे की, त्यांनी कराराप्रमाणे सा.वाले यांना गोवा येथील पर्यटन स्थळावर निवासस्थानाची व्यवस्था करणेकामी दोन वेळेस विनंती करुनही सा.वाले यांनी तक्रारदारांना सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. व त्यावरुन तक्रारदारांनी सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. तक्रारदारांनी सा.वाले यांना दिलेल्या पहिल्या नोटीसीची प्रत तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत हजर केलेली आहे. तसेच सा.वाले यांनी दिनांक 18.7.2006 रोजी दिलेल्या उत्तराची प्रत देखील तक्रारदारांनी तक्रारी सोबत हजर केलेली आहे. त्यामध्ये सा.वाले यांनी असा खुलासा केला की, मे,2005 नंतर तक्रारदार हे केवळ सदस्यत्वाचे शुल्क परत मागत होते व कुठल्याही पर्यटन स्थळावर निवासस्थान आरक्षित करण्यात यावे अशी विनंती करण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे सा.वाले यांनी असा खुलासा केला की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे आस्थापना शुल्क जमा केलेले नव्हते. या संबंधात तक्रारदारांनी सा.वाले यांना गोवा येथील पर्यटन स्थळावर निवासाची व्यवस्था करण्याबद्दल पाठविलेल्या विनंती पत्राची प्रत हजर केलेली नाही. त्यावरुन तक्रारदारांनी सा.वाले यांना गोवा येथील पर्यटन स्थाळावर निवासाची व्यवस्था करणेकामी दोन वेळेस विनंती केली होती व सा.वाले यांनी त्या विनंती प्रमाणे कार्यवाही केलेली नाही असा निष्कर्ष काढता येत नाही.
7. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 29.5.2007 रोजी दुसरी नोटीस दिली. ज्याची प्रत तक्रारीसोबत दाखल आहे. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांना पाठविलेल्या विनंती पत्राच्या प्रती बाबतचा तपशिल दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे आस्थापना शुल्क जमा केल्याबद्दल पुरावा दाखल केलेला नाही. कराराचे शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे आस्थापना शुल्क वेळेवर जमा करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे करारातील शर्ती व अटी प्रमाणे विशिष्ट मुदतीमध्ये विशिष्ट पर्यटन स्थळावर निवासाची सुविधा मागण्याचा हक्क सदस्यांना रहात नाही व उपलब्धतेनुसार ती सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे करारामध्ये नमुद केलले आहे. त्याच प्रमाणे सदस्य करारातील तरतुदीप्रमाणे सदस्यांनी जमा केलेले सदस्य शुल्क सदस्यांस परत मागता येणार नाही. मुळातच करारातील कलम 13 प्रमाणे करार हा रद्द होण्यासारखा नसून तो उभय पक्षास बंधनकारक आहे. याच मुद्यावर प्रस्तुत मंचाने सा.वाले व त्यांचे इतर सदस्य यांचे दरम्यान दाखल झालेल्या व प्रस्तुत मंचाने निकाली केलेल्या तक्रारीतील न्याय निर्णयाच्या प्रती हजर केलेल्या आहेत. त्यातील अभिप्राय देखील सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देतात.
8. सा.वाले यांनी विशिष्ट मुदतीमध्ये विशिष्ट पर्यटन स्थळावर तक्रारदारांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही, केवळ या मुद्यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 428/2008 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.