(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून मानसिक, शारिरीक, आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत तसेच कर्ज खाते संपल्याबद्दलचे स्टेटमेंट व दाखला मिळावा, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांना प्रस्तुत तक्रार अर्जाची नोटीस रजि.ए.डी.पोष्टाने पाठवण्यात आलेली होती. ती नोटीस पान क्र.11 चे पोस्टाचे दाखल्यानुसार सामनेवाला यांना दि.21/04/2011 रोजी मिळालेली आहे. परंतु यानंतरही सामनेवाला हे या कामी गैरहजर राहीलेले आहेत यामुळे सामनेवाला यांचेविरुध्द दि.27/07/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेले आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय 4) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार यांनी पान क्र.15 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेले नाही. पान क्र.3, पान क्र.7 व पान क्र.14 लगतची सामनेवाला यांची नोटीस, अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन याचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून क्रेडीट कार्डची सुविधा घेतली होती हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 2 व 3 मध्ये “क्रेडीट कार्डाचे वापराबद्दल देय असणारी रक्कम रु.864 पैसे 81 पोटी चेक क्र.615937 दि.20/08/2008 रोजी रु.865/- जमा केले. तसेच क्रेडीट कार्डवर घेतलेल्या कर्जाचे हप्त्यापोटी चेक क्र.615936 अन्वये दि.20/08/2008 रोजी रु.3564/- चा चेक असे दोन चेक जमा केले होते, परंतु रक्कम रु.865/- चा चेक सामनेवाला यांचे ताब्यात असूनही तो त्यांनी वटवण्यासाठी जमा केला नाही, फक्त कर्जाऊ रकमेचा चेक जमा केला. रु.865 चा चेक जमा न झाल्यामुळे सामनेवाला यांनी या रकमेवर दंडव्याज, व्याज चार्जेस इत्यादी रकमेची एकूण आकारणी रु.4678/- इतकी केली. या बाबत विचारणा केली असता रक्कम रु.865/- चा चेक गहाळ झालेला आहे. त्यामुळे क्रेडीट कार्डाचे रकमेचे वापरापोटी दंडव्याज भरा असे सामनेवाला यांनी सांगितले. त्यांनतर अर्जदार यांनी सामनेवालाकडे क्रेडीट कार्ड वापरापोटी देणे असलेली रक्कम रु.800/- दि.23/03/2009 रोजी रोख जमा केलेली आहे. परंतु त्यानंतरही सामनेवाला हे अर्जदार यांचेकडून दंडव्याज चार्जेसची बेकायदेशीर आकारणी करीत आहेत. यानंतर अर्जदार यांनी सामनेवाला यांना वकिलांचे मार्फत नोटीस पाठवली त्यास सामनेवाला यांनी दि.28/10/2010 रोजी उत्तर पाठवून रक्कम रु.865/- चा चेक सामनेवाला यांचेकडेच ठेवलेला होता ही बाब मान्य केली व म्हणून अर्जदार यांनी दि.23/03/2009 रोजी रक्कम रु.800/- रोख सामनेवाला यांचेकडे जमा केलेले आहेत. असे असूनही पुन्हा सामनेवाला हे बेकायदेशीरपणे व्याज, दंडव्याज, लेट फी, फायनान्स चार्जेस इत्यादी आकारणी करुन अर्जदार यांचा छळ करीत आहेत.” असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांचा तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन स्पष्टपणे नाकारलेले नाही. अर्जदार यांनी पान क्र.3 लगत सामनेवाला यांची दि.28/10/2010 ची नोटीस दाखल केलेली आहे. या नोटीसमधील पान क्र.3 वरती अ.क्र.3 मध्ये “अर्जदार यांचेकडून रु.800/- दि.23/03/2009 रोजी जमा झालेले आहेत व या रकमेची वजावट केलेली आहे.” ही गोष्ट मान्य केलेली आहे. तसेच पान क्र.18 चे सामनेवाला यांचे स्टेटमेंटनुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.23/03/2009 रोजी रु.800/- जमा केलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी पान क्र.1 नुसार सामनेवाला यांना अँड.के.बी.चांदवडकर यांचेमार्फत दि.20/09/2010 रोजी नोटीस पाठवली आहे ती नोटीस सामनेवाला यांना पान क्र.2 चे पोस्टाचे पावतीप्रमाणे मिळालेली आहे. या नोटीशीस सामनेवाला यांनी दि.28/10/2010 रोजी पान क्र.3 प्रमाणे उत्तर देवून अर्जदार यांचा रक्कम रु.865/- चा चेक पान क्र.4 प्रमाणे अर्जदार यांना परत पाठवलेला आहे. परंतु त्यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडे पान क्र.7 चे दि.17/05/2010 रोजीचे नोटीसीप्रमाणे रक्कम रु.4677/- इतक्या रकमेची मागणी केलेली आहे. तसेच पान क्र.14 प्रमाणे दि.10/06/2011 रोजी लेखी पत्र पाठवून अद्यापही अर्जदार यांचेकडून रक्कम रु.2059 पैसे 67 इतकी रक्कम येणे आहे असे कळवले आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडे ज्या रकमेची मागणी केलेली आहे त्यामध्ये अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.23/03/2009 रोजी जी रक्कम रु.800/- जमा केलेली आहे त्या रकमेवरही दंडव्याज आकारणी सामनेवाला करीत आहेत व रक्कम रु.800/- वजावटही येणे रकमेमधून केलेली नाही हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज विनंती कलम 11 अ मध्ये शारिरीक, मानसिक, आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत व विनंती कलम 11 ब मध्ये कर्ज खाते संपल्याबद्दलचे स्टेटमेंट व दाखला मिळावा अशीही मागणी केलेली आहे. परंतु अर्जदार यांनीच दाखल केलेले सामनेवाला यांचे पान क्र.3 चे दि.28/10/10 चे पत्र, पान क्र.7 चे दि.17/05/10 चे पत्र व त्यामधील मजकूर याचा विचार होता रक्कम रु.800/- ही रक्कम वगळता अर्जदार यांनी सामनेवाला यांचे क्रेडीट कार्डावरुन अन्य व्यवहारही रु.74,184 पैसे 56 करीता केलेले आहेत व क्रेडीट कार्ड कर्ज खात्यापोटी अद्यापही सामनेवाला यांना अर्जदार हे रक्कम देणे लागत आहेत हे स्पष्ट होत आहे. याचा विचार होता अर्जदार यांची तक्रार अर्ज विनंती कलम 11 ब मधील “कर्ज संपल्याचा दाखला मिळावा.” ही मागणी मान्य करता येत नाही. अर्जदार हे फक्त रक्कम रु.800/- व त्यावरील दंड व्याज याबाबतीतच वजावट मागु शकतात असेही या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.800/- वजावट झालेली नाही. या कारणामुळे अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांचे कर्ज खाते क्र.7777777772958483 व क्रेडीट कार्ड क्र.5425051751074849 या खात्यावर दि.23/03/2009 रोजी अर्जदार यांनी जमा केलेली रक्कम रु.800/- ची वजावट करावी. 3) सामनेवाला यांनी अर्जदार यांचे कर्ज खाते क्र.7777777772958483 व क्रेडीट कार्ड क्र.5425051751074849 या खात्यावर दि.23/03/2009 नंतर रक्कम रु.800/- या रकमेवर व्याज, दंडव्याज व अन्य कोणतेही चार्जेस आकारणी करुन नयेत. 4) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रु.500/- द्यावेत., 5) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना अर्जाचे खर्चापोटी रु.500/- द्यावेत. |