निकाल
(घोषित दि. 13.04.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तक्रारदार याने दि.08.04.2015 रोजी सॅमसंग कंपनीचा मोबाईल सामनेवाला क्र.3 यांचेकडून रु.18,500/- ला खरेदी केला. सदर मोबाईल हॅण्डसेट गॅरंटीचा कालावधी असताना त्याचा स्पीकर खराब झाला. सामनेवाला क्र.1 हे सॅमसंग कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र आहे. सामनेवाला क्र.1 यांचेकडे सदर मोबाईल हॅण्डसेट दि.14.03.2016 रोजी दुरुस्तीकरता देण्यात आला, त्यावेळी मोबाईलचे स्क्रीनवर एक डाग दिसत होता. सामनेवाला क्र.1 यांना याबाबत माहिती दिली तेव्हा त्यांनी तोंडी सांगितले की, सदर डागामुळे काहीही त्रास नाही. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी सदर मोबाईल तक्रारदार यास परत केला त्यावेळी त्याची फसवणूक करुन काही कागदावर त्याच्या सहया घेतल्या. सदर मोबाईल हॅण्डसेटच्या स्क्रीनवर जो डाग होता तो सामनेवाला क्र.1 यांच्या चुकीमुळे आला होता, तो डाग पुढे वाढत गेला व संपूर्ण स्क्रीन खराब झाला. तक्रारदार याने याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे तक्रार केली. सामनेवाला क्र.2 हे मोबाईल हॅण्डसेटचे उत्पादक आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यास सामनेवाला क्र.1 यांचेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 यांचेकडे गेला परंतू सामनेवाला क्र.1 यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. परंतू त्याने सामनेवाला क्र.2 यांच्या अधिका-यांना मात्र खोटीच माहिती दिली की, तक्रारदार त्यांचेकडे आला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी असा सल्ला दिला की, तक्रारदार याने सामनेवाला क्र.1 यांच्या दुकानातील दि.14.03.2016 चे सी.सी.टी.व्ही.कॅमे-याचे फुटेज पाहावे. परंतू सामनेवाला क्र.1 यांनी सदर विनंतीला प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार याने दि.24.06.2016 रोजी वकीलामार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविली परंतू सामनेवाला क्र.1 यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास इ-मेल पाठवून त्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे असे तक्रारदारास कळविले परंतू आजपर्यंतही तक्रारदार याच्या मोबाईल हॅण्डसेटची दुरुस्ती करुन देण्यात आली नाही. त्यामुळे सदर मोबाईल हॅण्डसेट तक्रारदारास वापरता येत नाही. वरील कारणास्तव तक्रारदार यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार याने विनंतीकेली आहे की, त्याला SM-E7 हा सॅमसंग कंपनीचा नवा मोबाईल हॅण्डसेट द्यावा. तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- आणि तक्रार दाखल करण्याचा खर्च रु.10,000/- देण्यात यावा.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत मोबाईल हॅण्डसेट विकत घेतला त्यावेळी मिळालेल्या पावतीची झेरॉक्स प्रत, अॅड.धन्नावत यांचे मार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत, इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांचे तर्फे वकील हजर झाले. त्यांनी त्यांचे पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार याने विकत घेतलेल्या मोबाईल हॅण्डसेटमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द केलेले नाही. त्याचप्रमाणे सामनेवाला यांनी पुरविलेल्या सेवेत त्रुटी असल्याचेही सिध्द केलेले नाही. वरील कारणास्तव तक्रारदाराची तक्रार खारीज होणेस पात्र आहे. नियमाप्रमाणे वॉरंटीच्या कालावधीत विक्री केलेल्या वस्तूत जर उत्पादकीय दोष निष्पन्न झाला तर सदर दोषांचे निर्मुलन सदोष सुटा भाग बदलून किंवा आवश्यक दुरुस्ती करुन देण्यात येतो. मोबाईल हॅण्डसेट विकत घेतल्यानंतर 11 महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर मोबाईल हॅण्डसेटच्या स्पीकरमध्ये असलेल्या दोषाबाबत तक्रारदार याने तक्रार केली. तक्रारदाराची तक्रार आल्यानंतर त्याचे निर्मुलन सामनेवाला क्र.1 यांनी योग्यरितीने केले. स्पीकरमधील दोषांचे निर्मुलन केले. पण त्याचवेळी तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे मोबाईलचे स्क्रीनवर छोटा डाग दिसला हे म्हणणे खोटे आहे. प्रत्यक्षात तक्रारदार यास त्याचा मोबाईल हॅण्डसेट दुरुस्त करुन दिला, त्यावेळी त्याचे स्क्रीनवर कोणताही डाग नव्हता. सामनेवाला क्र.1 यांनी काही कागदावर दिशाभूल करुन तक्रारदाराच्या सहया घेतल्या हे म्हणणे चुक आहे. जुन महिन्याच्या दुस-या आठवडयात दुस-या वेळी तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचेकडे आला त्यावेळी तक्रारदाराच्या मोबाईलची तपासणी तंत्रज्ञानी केली, तेव्हा तंत्रज्ञाने असे मत व्यक्त केले की, बाहयशक्तीचा उपयोग झाल्यामुळे सदर मोबाईल हॅण्डसेटचा स्क्रीन खराब झाला आणि तो बदलणे आवश्यक आहे. अशाप्रकारे मोबाईल हॅण्डसेटचा स्क्रीन नादुरुस्त झाल्यास त्याला उत्पादकीय दोष म्हणता येणार नाही. त्यामुळे वॉरंटीच्या अटी व शर्ती नुसार अशी दुरुस्ती विनामुल्य करुन देता येत नाही. शिवाय जुन 2016 मध्ये जेव्हा तक्रारदार त्याचा मोबाईल हॅण्डसेट घेऊन सामनेवाला क्र.1 यांचेकडे आला, त्यावेळी वॉरंटीचा एक वर्षाचा कालावधी संपलेला होता. त्यामुळे तक्रारदार हा सदर मोबाईल हॅण्डसेट विनामुल्य दुरुस्त करुन घेण्यास पात्र नव्हता. तक्रारदार यांनी नोटीसमध्ये केलेले सर्व आरोप सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अमान्य केलेले आहेत. अशा परिस्थितीत तक्रारदार हा सदोष मोबाईलच्या बदली नवा हॅण्डसेट मिळणेस पात्र नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 व 2 यांनी केलेली आहे.
सामनेवाला क्र.3 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्दचे प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज काळजीपूर्वक वाचला. त्याचप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांच्यातर्फे दाखल केलेल्या पुराव्याकामी शपथपत्राचे काळजीपूर्वक परीक्षण केले. तसेच तक्रारदार याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे परीक्षण केले. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने सामनेवाला यांचेकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट रक्कम रु.18,500/- देऊन दि.08.04.2015 रोजी विकत घेतला ही बाब उभयपक्षी मान्य आहे. सदर मोबाईल हॅण्डसेटच्या स्पीकरमध्ये दि.14.03.2016 रोजी दोष उत्पन्न झाला, सदर दोष वॉरंटीच्या कालावधीत उत्पन्न झाल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी त्याचे निर्मुलन वॉरंटीच्या अटी व शर्तीनुसार करुन दिले.
सदर मोबाईल हॅण्डसेट तक्रारदार याने दि.08.04.2015 रोजी विकत घेतला. त्यानंतर सर्वप्रथम दि.14.03.2016 रोजी त्याचे स्पीकरमधील दोषांचे निर्मुलन वॉरंटी अंतर्गत सामनेवाला क्र.1 यांचेकडून करुन घेण्यात आले. मोबाईल हॅण्डसेट खरेदीची तारीख व त्याच्या स्पीकरच्या दुरुस्तीची तारीख काळजीपूर्वक पाहिल्यावर असे दिसून येते की, दि.14.03.2016 च्या नंतर तक्रारदारास फक्त उर्वरीत 17 दिवसांचा वॉरंटीचा कालावधी विनामुल्य सेवा मिळविण्याकरता उपलब्ध होता. तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे सदर मोबाईल हॅण्डसेटच्या स्पीकरची दुरुस्ती करुन सामनेवाला क्र.1 यांनी दिली त्यावेळी तक्रारदार यास मोबाईलच्या स्क्रीनवर एक टिंब/डाग दिसला. तक्रारदार याने सदर डागाबाबत सामनेवाला क्र.1 यांना विचारले परंतू सामनेवाला क्र.1 यांनी त्याचेकडे दुर्लक्ष केले. आमच्या मताने हा मुददा तक्रारदार याने योग्यरितीने सिध्द केला नाही. जर तक्रारदार याचा मोबाईल हॅण्डसेट वॉरंटी अंतर्गत दुरुस्ती करण्याकरता परत सेवा केंद्रात टाकला असता तर सदर सेवा केंद्रातून तो दुरुस्त करुन मिळेपर्यंत सदर मोबाईल बाबतची जिम्मेदारी सेवा केंद्राची राहीली असती. त्याबाबत एक जॉबशीटही बनविण्यात येते. त्या जॉबशीटवर मोबाईल हॅण्डसेटचे नाव, मोबाईल नंबर, खरेदीची तारीख, वॉरंटीचा कालावधी, खरेदीदाराचे नाव व तक्रारदार याने केलेल्या तक्रारीची सविस्तर माहिती इत्यादी माहिती असते. जर खरोखरच सदर मोबाईल हॅण्डसेट स्पीकरच्या दुरुस्तीनंतर त्याचे स्क्रीनवर तक्रारदार यास टिंब/डाग असल्याचे निष्पन्न झाले होते तर, त्याचवेळी तक्रारदार याने सदर मोबाईल हॅण्डसेट परत सेवा केंद्रात त्या डागाचे निर्मुलनाकरता का टाकला नाही व डोळे झाकून सामनेवाला क्र.1 म्हणतील त्या कागदावर का सहया करुन दिल्या हा प्रश्न उदभवतो.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यास असे सुचविले होते की, त्याने दि.14.03.2016रोजी त्याच्या मोबाईल हॅण्डसेटची डिलेव्हरी स्पीकर दुरुस्तीनंतर सेवा केंद्रातून घेतली त्यावेळी सेवा केंद्रातील सी.सी.टी.व्ही. चे फुटेज काळजीपूर्वक पाहावे. जर सदर फुटेजमध्ये तक्रारदाराच्या मोबाईल हॅण्डसेटच्या स्क्रीनवर टिंब/डाग दिसला. तक्रारदार याचे म्हणणे खरे आहे असे गृहीत धरता येईल परंतू सदर सी.सी.टि.व्ही.च्या दि.14.03.2016 च्या फुटेजबाबत कोणतीही कार्यवाही तक्रारदार याने केलेली दिसून येत नाही.
सामनेवाला क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार याच्या मोबाईल हॅण्डसेटवर बाहयशक्तीचा प्रयोग झाल्यामुळे त्याचे स्क्रीनमध्ये दोष उत्पन्न झालेला आहे. वॉरंटीच्या अटी व शर्तीनुसार जर मोबाईल हॅण्डसेटवर बाहयशक्तीचा प्रयोग झाला तर उदभवणा-या दोषांचे निर्मुलन विनामुल्य करण्याची जबाबदारी कंपनीवर राहात नाही. आमच्या मताने या संपूर्ण केसमधील महत्वाच्या आरोपावर तक्रारदार याने पुरेसा पुरावा दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या आरोपाप्रमाणे दि.14.03.2016 रोजी मोबाईलच्या स्क्रीनवर टिंब/डाग होते यावर आम्हास विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे सेवेतील त्रुटीचा प्रश्नच उदभवत नाही.
वरील परिस्थितीत तक्रारदार हा त्याची केस योग्यरितीने सिध्द करु शकलेला नाही. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना