निकाल
पारीत दिनांकः- 31/03/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार दि. 3/10/2011 रोजी दु. 12. 00 वा. जाबदेणार यांच्या स्लिमिंग आणि ब्युटी क्लिनिकमध्ये वजन कमी करण्याच्या प्रोग्रामविषयी विचारणा करण्यासाठी गेले असता, तेथील प्रतिनिधींनी 15 दिवसांत 4 किलो वजन कमी करण्याकरीता रक्कम रु. 2244/- चे पॅकेज त्यांना सागितले. त्याचवेळेस तक्रारदारांनी त्यांच्या बँक ऑफ पतियाळाचे कार्ड स्वॅप करुन सदरची रक्कम जाबदेणार यांच्या खात्यामध्ये जमा केली. तक्रारदारांचा वेट लॉस प्रोग्राम दुसर्या दिवशी, म्हणजे दि. 4/10/2011 पासून चालू होणार होता. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते घरी आल्यानंतर त्यांच्या पालकांना व मित्रांना याबद्दल माहिती दिली. त्या सर्वांनी तसेच टी.व्ही. वरील ‘जागो ग्राहक जागो’ च्या माहितीवरुन, अशा प्रकारच्या वेट लॉस प्रोग्राममुळे वजन कमी होत नाही, हे त्यांना कळाले. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच दिवशी म्हणजे दि. 3/10/2011 रोजी संध्याकाळी जाबदेणार यांच्याकडे जाऊन तेथील कु. पुजा यांना त्यांचा प्रवेश रद्द करण्याची विनंती केली व त्यांनी भरलेली रक्कम परत मागितली. परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर तक्रारदार औंध पोलिस स्टेशनमध्ये गेले असता त्यांनी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्याकडे जाण्यास सांगितले. तक्रारदारांनी व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जाबदेणारांना पत्र लिहून रक्कम परत मागितली, परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही किंवा रक्कमही परत केली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून त्यांनी भरलेले रक्कम रु. 2244/- 18% व्याजासह, टेलीफोन व इतर चार्जेसपोटी रक्कम रु. 500/- तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु. 2000/- आणि इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीबरोबर शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] मंचाने जाबदेणारांना नोटीस पाठविली असता नोटीस मिळूनही ते मंचात गैरहजर राहिले, म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 3/10/2011 रोजी जाबदेणारांकडे वजन कमी करण्यासाठी पॅकेज (Weight Loss Program) घेतले होते. सदरच्या पॅकेजमध्ये 15 दिवसांत 4 किलो वजन कमी होणार होते व त्याकरीता त्यांनी जाबदेणारांकडे त्यांच्या बँकेच्या कार्डच्या सहाय्याने रक्कम रु. 2244/- भरले होते. परंतु तक्रारदार घरी आल्यानंतर, त्यांच्या पालकांनी व मित्रांनी अशाप्रकारे वजन कमी होत नाही असे सांगितले, तसेच टी.व्ही. वरील ‘जागो ग्राहक जागो’ च्या जाहीरातीमुळे त्यांना असे कळून आले की, वजन कमी करण्याच्या सर्व जाहीराती खोट्या व फसव्या आहेत, म्हणून ते त्याच दिवशी म्हणजे दि. 3/10/2011 रोजी संध्याकाळी जाबदेणार यांच्या मॅनेजर पुजा यांना भेटले व त्यांचा प्रवेश रद्द करुन त्यांना भरलेली रक्कम परत करावी अशी विनंती केली, परंतु त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. वास्तविक पाहता, जाबदेणारांनी कोणतीही सेवा न देता तक्रारदारांची रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली व मागितल्यानंतर ती परत करण्यास नकार दिला, ही जाबदेणारांची अनुचित व्यापार पद्धती ठरते. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी वेळ न दवडता ज्या दिवशी रक्कम भरली त्याच दिवशी परत मागितली. यामध्ये जाबदेणारांचे काहीही नुकसान झालेले नाही, म्हणजे तक्रारदारांमुळे त्याची एक जागा अडविली गेली किंवा त्यांची एखादा ट्रेनर अडकून राहीला, अशा प्रकारचे कुठलेही नुकसान जाबदेणारांचे झालेले नाही, तरीही जाबदेणारांनी तक्रारदारांची रक्कम कोणत्याही कारणाशिवाय स्वत:जवळ ठेवून घेतली. यावरुन जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार त्यांची रक्कम परत व नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास हक्कदार ठरतात. म्हणून मंच जाबदेणारास असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदारास त्यांना भरलेली रक्कम रु. 2244/- व रक्कम रु. 2,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून द्यावी.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 2244/-
(रु. दोन हजार दोनशे चव्वेचाळीस फक्त) व
रक्कम रु. 2,000/-(रु. दोन ह्जार फक्त)
नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून
आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावे.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.