// श्रीमती. भारती कैलास कुमार ठाकर (Bharati Kailaskumar Thaker) यांनी दाखल केलेल्या विलंब माफीचा अर्जावर आदेश//
दि. 05/10/2020
(द्वारा – अध्यक्षा श्रीमती. स्नेहा एस. म्हात्रे)
तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक आहेत. सदर प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी कथन केल्याप्रमाणे, तक्रारदार व त्यांचे पती कैलासकुमार यांनी सामनेवाला रोहन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी दिनांक 03/09/2013 रोजी पर्यायी जागेचा करारनामा स्वाक्षरीत केला. दिनांक 11/02/2014 रोजी तक्रारदाराच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सामनेवाले यांनी दिनांक 12/10/2017 रोजी श्रीमती. भारती कैलासकुमार ठाकर यांना सदर करारनाम्यानुसार फ्लॅट नंबर 702, 7 वा मजला Mirage को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड (वेस्ट), मुंबई - 16 हिचा ताबा दिल्याचे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. परंतु वर नमूद करारानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना कॉर्पस फंडस् (Corpus funds) बाबतची देय असलेली रक्कम रुपये 4,00,000/- व ट्रांझिट रेंटच्या भाडयाची फरकाची रक्कम रुपये 83,520/- अदयाप दिली नसल्याने तक्रारदारांनी सामनेवाला विरुद्ध तक्रारीत नमूद मागण्यांबाबत प्रस्तुत तक्रार विलंब माफीच्या अर्जासह दाखल केली असून, तक्रारदार म्हणतात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिनांक 10/08/2019 रोजी ट्रांझिट रेंटची रक्कम रुपये 2,08,800/- दिली. परंतु कॉर्पस फंड व ट्रांझिट रेंटच्या भाड्याच्या फरकाची रक्कम अद्याप दिली नसल्याने तक्रारीचे कारण अद्याप कायम आहे. परंतु सदर तक्रार दाखल करण्यास कोव्हिड-19 च्या लॉकडाऊन मुळे काही विलंब झाला असल्यास तो माफ करण्यात यावा व तक्रारदाराची प्रस्तुत तक्रार दाखल करून घ्यावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
सामनेवाले यांचे वकील श्री मिलिंद नर यांनी सदर विलंब माफीच्या अर्जावर त्यांचे म्हणणे (Opposite Party filed written argument on delay Condonation Application) लेखी युक्तिवाद दाखल करून प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास सामनेवाला विरुद्ध काहीच कारण घडलेले नाही. प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचासमक्ष दाखल करणे योग्य नाही व किती दिवसांचा विलंब आहे याबद्दल तक्रारदार यांनी सदर अर्जात उल्लेख केला नसल्याचे नमूद करून तक्रारदाराची प्रस्तुत तक्रार सदर अर्जासह फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद केला आहे. तक्रारदारांनी त्यावर दिनांक 05/10/2020 रोजी त्यांचे प्रतिउत्तर (Rejoinder to reply of Opposite Party on Delay condonation Application) दाखल केले. सदर अर्जावर सामनेवाला यांचे वकीलांनी दिलेला लेखी युक्तिवाद हाच त्यांचा तोंडी युक्तिवाद समजावा असे लेखी निवेदन सदर लेखी युक्तिवादाच्या प्रतीवर दिले. सबब तक्रारदाराचा युक्तिवाद सदर विलंब माफीच्या अर्जावर ऐकण्यात आला.
तक्रारीतील कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिनांक 12/10/2017 रोजी सदर सदनिकेचा ताबा दिला. तसेच दिनांक 10/08/2019 रोजी सामनेवाला यांचेकडून तक्रारदारांना ट्रांझिट रेंटच्या रकमेपोटी धनादेशाद्वारे रक्कम रुपये 2,08,800/- देण्यात आले याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार त्यांना सामनेवाले यांनी दिनांक 03/09/2013 रोजीच्या करारानुसार अद्याप कॉर्पस फंडस व ट्रांझिट रेंटच्या भाड्याच्या फरकाची रक्कम दिली नसल्याचे नमूद करून तक्रारदारांनी सामनेवाला विरुद्ध सेवेतील त्रुटी बाबत दाखल केली आहे. दिनांक 10/08/2019 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना ट्रांझिट रेंटबाबतची रक्कम अदा करताना सदर करारनाम्यानुसार भाडयाच्या फरकाची रक्कम व कॉर्पस फंडची रक्कम अदा न केल्याने वादाचे कारण 10/08/2019 पासून उद्भवले असे मानले तरी प्रस्तूत तक्रार त्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत दाखल केली असल्याने ती विहित मुदतीत दाखल करण्यात आली आहे. सामनेवाला यांनी उपस्थित केलेले अन्य मुद्दे हे तक्रार गुणवत्तेवर निकाली काढताना विचारात घेणे संयुक्तिक आहे. तसेच प्रस्तुत तक्रारीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवेमध्ये त्रुटी दिल्याचे नमूद असल्याने ही दाखल करून घेण्यास मंचास कार्यक्षेत्र आहे. सबब तक्रारीचे कारण अद्याप कायम असल्याने तक्रारदारांनी दिलेला प्रस्तुत विलंब माफीचा अर्ज मंजूर करून तक्रार दाखल करून घेण्यात येते. सामनेवाला यांना कैफियत दाखल करणेकामी नोटीस पाठविणे विलंबमाफीचा अर्ज निकाली.
सबब खालीप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
// आदेश //
- विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येतो. तक्रार दाखल करुन घेण्यात येते.
- सामनेवाला यांना कैफियत दाखल करणेकामी नोटीस काढण्यात यावी.