श्री.स.वं.कलाल, मा.सदस्य यांच्याव्दारे
1) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार क्र.1 व 2 यांचे आपसात पिता-पुत्र या प्रकारचे नाते आहे. तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर मुलुंड, मुंबई येथे राहतात तर सामनेवाले हे हॉटेल संबंधी सेवा पुरवणारी खाजगी कंपनी आहे. त्यांचे कार्यालय खार मुंबई येथे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आहे.
2) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातंर्गत सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापार प्रथेचा अवलंब या सबबीखाली ही तक्रार दाखल केलेली आहे.
3) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांना सामनेवाले यांचेकडून व्हाट्सअॅप समाजमाध्यमाद्वारे संपर्क करण्यात आला. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारास दोन वर्षासाठी पंचतारांकित व फोर स्टार हॉटेलमध्ये दोन दिवस व एक रात्र या कालावधीसाठी रुपये 6,000/- इतकी सभासद फी भरून हॉटेल निवासव्यवस्था ज्यामध्ये जेवण, नाश्ता वगैरे सोयीसुविधा पुरविल्या जातील या प्रकारची माहिती देऊन तक्रारदार यांना सदरचे सभासदत्व घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार तक्रारदार क्र.1 व 2 यांनी सामनेवाले यांचेकडून रुपये 600/- इतक्या सभासदत्व शुल्कामध्ये ग्रेप वाइन रिसॉर्ट नाशिक व हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक या दोन प्रकारच्या हॉटेलमध्ये निवासाची सोय उपलब्ध होईल यादृष्टीने तक्रारदाराकडून प्रत्येकी रु.6,000/- स्विकृत करून दोन्ही तक्रारदारास सामनेवाले यांनी दिनांक 21 एप्रिल, 2020 रोजी रक्कम स्विकृतीची पावती दिली. त्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सभासद शुल्क भरल्यामुळे व सामनेवाले यांच्या हॉटेल सुविधेचा उपभोग घेण्यासाठी तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाले यांचेकडे ई-मेलद्वारे दिनांक 10 डिसेंबर, 2020 रोजी दिनांक 17 जानेवारी, 2021 ते 19 जानेवारी, 2021 या कालावधीसाठी हॉटेलमध्ये आरक्षण करण्यासंबंधीचा मेल पाठवला होता. सामनेवाले यांचेकडून तक्रारदारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारदारक्र.1 यांनी पुन्हा सामनेवाले यांना दिनांक 12 डिसेंबर, 2020 रोजी हॉटेल आरक्षणाबाबत मेलद्वारे स्मरण करुन दिले. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना हॉटेलचे आरक्षण उपलब्ध नसल्याने आरक्षण देता येणार नाही. परंतु जादा रक्कम भरणा केल्यास तक्रारदारास दुसऱ्या पर्यायी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येईल असे कळविले. त्याचप्रकारे तक्रारदार क्र.2 यांनी सुध्दा सामनेवाले यांच्याकडे हॉटेलचे आरक्षण करण्यासाठी दिनांक 27 जानेवारी, 2021 रोजी आरक्षणासाठी ईमेल केला असता सामनेवाले यांचेकडून तक्रारदार क्र.2 यांना सुध्दा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारदार क्र.2 यांनी दिनांक 27 जानेवारी, 2021 ते 4 फेब्रुवारी, 2021 पर्यंत सामनेवाले यांचेकडे पुन्हा पुन्हा ईमेलव्दारे पत्रव्यवहार केला. त्यावर सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना दिनांक 6 फेब्रुवारी, 2021 रोजी सभासद शुल्कापोटी भरणा केलेली रक्कम 50% परत करण्यात येईल असे कळविण्यात आले. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून हॉटेल सेवासुविधा पुरविण्यासाठी आगाऊ स्वरूपात सभासद शुल्क स्विकृत करून सुध्दा तक्रारदार यांना हॉटेलची सेवासुविधा पुरविली नाही व त्यासाठी नकार देऊन तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यास कसूर केली ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे म्हणून तक्रारदाराने सामनेवाले यांच्याविरुध्द या आयोगासमोर ही तक्रार दाखल केलेली आहे
4) याउलट या आयोगातर्फे नोटीसी बजावणी होऊन देखील सामनेवाले या आयोगासमोर हजर झाले नाहीत व त्यांनी लेखी जबाबही दाखल केला नाही म्हणून त्यांचेविरुध्द दिनांक 21 सप्टेंबर, 2022 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आलेला आहे.
5) तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार त्यांनी सामनेवाले यांच्याकडे हॉटेल सेवासुविधा उपलब्ध होण्यासाठी सभासद शुल्क प्रत्येकी रु.6,000/- याप्रमाणे आगाऊ स्वरूपात भरणा करुन सुध्दा त्यांना हॉटेल आरक्षण सुविधा सामनेवाले यांनी उपलब्ध करून दिली नाही ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे.
सदर मुद्दयाच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे भरणा केलेली रक्कम रु.6000/- च्या पावत्या पृष्ठ क्रमांक 32 वर दाखल केलेल्या आहेत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांना हॉटेल सुविधेसंबंधीच्या सेवेसाठी म्हणून माहितीपत्रक दिले असून त्याची प्रत पृष्ठ क्रमांक 34 व 35 वर तक्रारी सोबत दाखल करण्यात आलेली आहे. तसेच तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये हॉटेलचे आरक्षण व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पृष्ठ क्रमांक 36 ते 44 वर उभय पक्षकारांतील ईमेलव्दारे झालेल्या पत्रव्यवहारांच्या प्रती पुराव्यादाखल दाखल केलेल्या आहेत. सदर मेलचे सूक्ष्मपणे वाचन करण्यात आले असून तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे हॉटेल आरक्षण व त्यासंबंधीची सेवासुविधा उपलब्ध होण्यासाठी ईमेलव्दारे केलेल्या पत्रव्यवहारानुसार सामनेवाले यांच्याकडे हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक व तक्रारदार क्र.2 यांनी दिनांक 27 जानेवारी, 2021 रोजी तक्रारदार यांनी दोन्ही तक्रारदारांसाठी ठरलेल्या हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक व ग्रेप काऊन्टी नाशिक यामध्ये आरक्षण मिळावे यासंदर्भात ईमेल केला असल्याचे दिसून येते. सदर ईमेलला सामनेवाले यांनी दिनांक 4 फेब्रुवारी, 2021 रोजी तक्रारदारास त्यांनी भरणा केलेल्या रकमेच्या पावत्या दाखल करण्यास सांगितले व नंतर तक्रारदारास दिनांक 6 फेब्रुवारी, 2021 रोजी तक्रारदार यांनी भरणा केलेल्या रकमेच्या 50% रक्कम परत केली जाईल असे कळविले. सदर सामनेवाले यांच्या ईमेलचे अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदारास 50% रक्कम कोणत्या कारणास्तव देण्याचे मान्य केले व तक्रारदारास हॉटेल सुविधा का उपलब्ध करून दिली नाही याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. एकंदरीत सामनेवाले यांनी तक्रारदारास त्यांच्या विनंतीनुसार हॉटेल सेवासुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा उपलब्ध करून दिली नाही याउलट तक्रारदार यांना केवळ 50% रक्कम परत मिळेलअशा आशयाचा ईमेल पाठविला आहे. सबब सामनेवाले यांची सदरची बाब तक्रारदारास सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे आयोगाचे मत आहे.
6) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत सामनेवाले यांच्याकडून सभासद शुल्कासाठी भरणा केलेली रक्कम रु.12,000/- परत मिळावी. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्हणून तक्रारदारास प्रत्येकी रु.50,000/- मिळावेत तसेच तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रुपये 25,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
सदर मुद्द्याच्या अनुषंगाने ज्याअर्थी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून हॉटेल सुविधा पुरविण्यासाठी सभासद शुल्क म्हणून प्रत्येकी रु.6,000/- आगाऊ स्वरूपात स्विकृत केलेले असून सुध्दा त्याबदल्यात तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून मागणी केल्यानुसार हॉटेल सुविधा पुरविण्यास कसूर केली व तक्रारदार यांना हॉटेल सुविधा उपलब्ध झाली नाही त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. अशा परिस्थितीत तक्रारदार यांना मानसिक त्रास होणे ही स्वाभाविक बाब आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्या मागणीचा काही अंशी विचार करणे संयुक्तिक होईल असे या आयोगाचे मत आहे.
वरील विवेचनावरून खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रार क्र. CC/108/2022 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना हॉटेल सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे घोषित करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांना प्रत्येकी रु.6,000/- (रु.सहा हजार फक्त) इतकी रक्कम हे आदेश प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांचे आत परत करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर सदर रकमेवर प्रतिदिन रु.10/- याप्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येईल.
- सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.1 व 2 यांना मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.3,000/- (रु.तीन हजार फक्त) याप्रमाणे रक्कम अदा करावी. सदर रक्कम हे आदेश प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अदा करावी अन्यथा तीस दिवसानंतर सदर रकमेवर 7% दराने व्याज आकारणी लागू राहील.
- या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात यावी.