न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कराड येथील रहिवाशी असून तक्रारदार क्र. 1 हे तक्रारदार क्र.2 चे वडील आहेत. जाबदार क्र. 1 कंपनी ही गुंतवणुक करुन घेणारी कंपनी असून जाबदार क्र. 2 हे सदर कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक आहेत. जाबदार क्र. 3 हे कंपनीचे संचालक असून जाबदार क्र. 4 हे जाबदार क्र. 1 कंपनीचे एजंट आहेत. ते सांगली व कोल्हापूर व सातारा या जिल्हयामध्ये लोकांना गुंतवणूक करणेस उद्युक्त करुन ठेवी ठेवणेस भाग पाडणेचे काम करतात त्यासाठी त्यांना़ कमिशन मिळते.
जानेवारी, 2012 मध्ये जाबदार क्र. 4 यांनी तक्रारदार यांना फोन करुन संपर्क करुन प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जाबदार क्र. 4 हे तक्रारदार यांना कराडमधील अलंकार हॉटेलमध्ये भेटले त्यावेळी जाबदार क्र. 4 ने स्वतःची ओळख जाबदार क्र. 1 कंपनीचे कोअर कमिटीचे मेंबर असलेबाबत करुन दिली. तसेच जाबदार क्र. 1 कंपनीने आर्थिक गुंतवणूक केल्यास कमीत कमी कालावधीत रक्कम दामदुप्पट होऊन मिळेल अशी माहिती तक्रारदारांना दिली. तसेच प्रस्तुत जाबदार क्र. 1 चे व्यवसायाची माहिती घेणेसाठी गुजरात येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार तक्रारदार क्र. 1 हे जाबदार क्र. 4 बरोबर गुजरात येथे गेले. जाबदार क्र. 4 ने कंपनीची जाबदार क्र. 1 व 2 यांचेशी ओळख करुन दिली तसेच जाबदार कंपनीने वेगवेगळया योजना गुंतवणूकदारांसाठी जाहीर केलेल्या असून सदर योजनेत रक्कम भरल्यास प्रतिवर्ष रक्कम मिळेल अशी खात्री जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना दिली. तसेच जाबदार क्र. 1 कंपनीत रक्कम गुंतवणेस जाबदार क्र.4 ने उद्युक्त केले. तक्रारदाराने जाबदार यांचेवर विश्वास ठेवून जादा व्याजाच्या अपेक्षेने खालील नमूद कोष्टकातील ठेवी जाबदार यांचे खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे,-
तक्रारदार क्र. 1 ने केलेली गुंतवणूक-
अ.क्र. | गुंतवणूक तारीख | रक्कम रुपये | चेक नंबर | बँकांचे नाव |
1 | 28/08/2012 | 40,000/- | 414958 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
2 | 12/09/2012 | 4,00,000/- | 414957 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
3 | 19/11/2012 | 1,00,000/- | 414960 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
तक्रारदार क्र. 2 ने केलेली गुंतवणूक-
अ.क्र. | गुंतवणूक तारीख | रक्कम रुपये | चेक नंबर | बँकांचे नाव |
1 | 05/12/2012 | 1,00,000/- | 115653 | दि यशवंत को-ऑप. बँक शाखा कराड |
अशी एकंदरीत रक्कम रु.15,60,000/- (रुपये पंधरा लाख साठ हजार मात्र) तक्रारदाराने जाबदार कंपनीत गुंतविली आहे. प्रस्तुतची रक्कम तक्रारदार यांनी चेकव्दारे कराड येथून जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडे गुंतविली आहे. एवढी रक्कम गुंतवूनही जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना वैयक्तिक नावाने गुंतवणूक केल्याचा कोणताही लॉग इन आय.डी. दिलेला नाही. त्यामुळे या रकमेबाबत तक्रारदाराला असुरक्षितता वाटू लागल्याने तक्रारदार यांनी जाबदार क्र. 2 ते 4 यांना वारंवार फोन करुन व एस.एम.एस. करुन रक्कम देणेची विनंती केली. तसेच तक्रारदार हे जाबदार क्र. 4 यांचे ताकारी येथील घरी जाऊन भेटले व रक्कम गुंतविलेचे कागदपत्रे देणे शक्य नसलेस गुंतविलेली रक्कम परत द्या अशी विनंती केली असता जाबदार क्र.4 ने स्वतःचे वैयक्तिक खात्यावरील रक्कम रु.15,00,000/- लाखाचा धनादेश तक्रारदार क्र. 1 यांना दिला. प्रस्तुत धनादेश तक्रारदाराने बँकेत भरला असता जाबदार क्र. 1 चे खात्यावर रक्कम शिल्लक नाही म्हणून तो परत आला. त्यानंतर तक्रारदाराने रक्कम परत मिळाली नाही तर वलसाड गुजरात येथे पोलीस केस दाखल करतील व आत्महत्या करतील अशी सूचना तक्रारदाराने जाबदार क्र. 2 ला दिलेनंतर जाबदार क्र. 2 यांनी त्यांचे वैयक्तिक खात्यावरील रक्कम रु.15,00,000/- चा चेक तक्रारदार यांना दिला होता व सदर रक्कम तातडीने परत करण्याचे आश्वसन दिले होते. त्यावेळी जाबदार क्र. 4 नेही जाबदार क्र. 2 चे म्हण्ण्यास दुजोरा दिला होता. प्रस्तुतचा चेकही जाबदाराने बँकेत पैसे नाहीत भरु नका असे सांगितलेने तो वटला नाही. दरम्यान जाबदारांनी मालाड पश्चिम मुंबई येथे वेगळे ऑफीस सुरु केलेची माहिती तक्रारदार यांना मिळाली. तेथेही तक्रारदाराने जाऊन चौकशी केली असता ते ऑफीस बंद झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून तक्रारदाराने दि. 13/2/2015 रोजी जाबदार यांचेविरुध्द कराड व सातारा पोलीस स्टेशनला फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तथापी, पोलीसांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. अशाप्रकारे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम गुंतवणूकीसाठी घेवून त्याबाबत कोणतीही कागदपत्रे न देणे तसेच रक्कम परताव्याची मागणी केलेनंतर रक्कम तक्रारदारांना न देणे अशी सेवात्रुटी जाबदारांनी केली आहे व जाबदारांनी तक्रारदाराला गुंतवणूकीवर जादा व्याजदराचे प्रलोभन दाखवून रक्कम गुंतवणूक करुन घेतली व प्रस्तुत रक्कम परत देणेस टाळाटाळ करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेमुळे जाबदारांकडून प्रस्तुत तक्रारदाराने गुंतवणूक केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळणेसाठी व नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडे गुंतवलेली सर्व रक्कम जाबदार यांनी तक्रारदाराला परत देणेचे आदेश व्हावेत, प्रस्तुंत गुंतवणूक रकमेवर गुंतवणूक तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करावे, मानसिक व शारीरीक त्रासापोटी जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम रु.1,00,000/- नुकसानभरपाईपोटी द्यावेत तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.30,000/- जाबदारांनी तक्रारदार यांना देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि.2 चे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/4 कडे अनुक्रमे तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 कंपनीकडे भरलेल्या रकमेच्या तपशिलाबाबत तक्रारदाराचे बँकेचे पासबुकची सत्यप्रत, जाबदार कंपनीचे नोंदणीपत्र, जाबदार यांनी तक्रारदार क्र. 1 यांना दिलेल्या चेकच्या प्रती बँकेच्या रिटर्न मेमोसह, तक्रारदार यांनी जाबदारांविरुध्द पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जाची प्रत, नि. 7 कडे जाबदार क्र. 1 ते 4 हे सातारा जिल्हा बाहेरील असलेने त्यांचेविरुध्द तक्रार दाखल करणेसाठी परवानगीचा अर्ज, नि. 8 कडे तक्रारदाराचे अँफीडेव्हीट, नि. 10 ते 12 कडे जाबदार क्र. 1 ते 3 यांना पाठविलेले नोटीसचे ‘Refused’ या पोष्टाचे शे-याने परत आलेले लखोटे, नि.12/3 कडे जाबदार क्र. 4 ला नोटीस मिळालेची पाहोचपावती नि. 13 कडे पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे याकामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 ते 4 यांना तक्रार अर्जाची नोटीस लागू होऊनही प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 4 हे मंचात हजर झालेले नाहीत. तसेच त्यांनी तक्रार अर्जावर म्हणणे/कैफीयतही दाखल केलेली नाही. सबब प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 4 यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. सबब प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी. मंचाकडे दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदार यांचे आहेत काय?- होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?- होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहेत कारण- तक्रारदार यांनी जाबदार क्रपनीमध्ये खाली नमूद केलेप्रमाणे रकमा गुंतविल्या होत्या व आहेत.
तक्रारदार क्र. 1 ने केलेली गुंतवणूक-
अ.क्र. | गुंतवणूक तारीख | रक्कम रुपये | चेक नंबर | बँकांचे नाव |
1 | 28/08/2012 | 40,000/- | 414958 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
2 | 12/09/2012 | 4,00,000/- | 414957 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
3 | 19/11/2012 | 1,00,000/- | 414960 | स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड |
तक्रारदार क्र. 2 ने केलेली गुंतवणूक-
अ.क्र. | गुंतवणूक तारीख | रक्कम रुपये | चेक नंबर | बँकांचे नाव |
1 | 05/12/2012 | 1,00,000/- | 115653 | दि यशवंत को-ऑप. बँक शाखा कराड |
ही बाब तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत गुंतवणूक रक्कम गुंतविलेचे कागदपत्र जाबदारांकडे मागणी केलेवर ते कागदपत्रे तक्रारदार यांना जाबदारांना दिले नाहीत. तसेच त्यामुळे प्रस्तुत रकमेबाबत तक्रारदारांना असुरक्षितता वाटू लागलेने तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे गुंतवणूक केलेली सर्व रक्कम परत मागीतली असता कोणतीही रक्कम जाबदार यांनी परत दिली नाही. तर रकमेपोटी तक्रारदाराला दिलेले दोन्ही चेक वटले नाहीत. पुन्हा तक्रारदाराने जाबदारांकडे रकमेची मागणी केली असता जाबदार रक्कम देणेस टाळाटाळ करत आहेत. तसेच जाबदाराने तक्रारदार यांना जादा व्याजाचे अमिष दाखवून गुंतवणूक करणेस भाग पाडले आहे व आता तक्रारदार यांना रक्कम परत देणेस टाळाटाळ करत आहेत. म्हणजेच जाबदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेचे स्पष्ट होते. तसेच जाबदार क्र. 1 ते 4 यांना नोटीस लागू होऊनही जाबदार क्र. 1 ते 4 हे प्रस्तुत कामी मे मंचात हजर राहीले नाहीत व त्यांनी तक्रार अर्जावर म्हणणे/कैफियत दाखल केलेली नाही. सबब जाबदारांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. जाबदारांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने बरोबर आहेत असे गृहीत धरावे लागेल. सबब सदर कामी जाबदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना जाबदाराने सेवात्रुटी दिली असलेचे स्पष्ट होते.
7. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना
तक्रारदारांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम रु.15,60,000/- (रुपये पंधरा
लाख साठ हजार मात्र) अदा करावेत. प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल
तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने
व्याजाची रक्कम जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
अदा करावी.
3. तक्रारदारांना झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदार क्र.1 ते 4 यांनी
वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र)
तक्रारदाराला अदा करावेत.
4. तक्रार अर्जाचे खर्चापोटी जाबदार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या
यांनी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तक्रारदार यांना अदा
करावेत.
5. वर नमूद आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावे.
6. रक्कम मुदतीत अदा करणेत कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
7. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.11-01-2016.
सौ.सुरेखा हजारे, श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.