(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 29 मार्च 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष रेवती असोशिएट्स इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ही एक कन्सट्रक्शन कंपनी असून त्यांचा शेतीचे ले-आऊट पाडून तेथील भूखंड ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करते. तसेच, तक्रारकर्त्याला स्वतःचे घर बांधून राहण्यासाठी त्यांना एका भूखंडाची आवश्यकता होती, त्यामुळे त्याचा संपर्क विरुध्दपक्ष यांचेशी आला. त्यादरम्यान विरुध्दपक्ष कंपनी मौजा – कान्होलीबारा, सर्व्हे नं.427, प.ह.क्र.66, तह. हिंगणा, जिल्हा – नागपूर येथे ले-आऊट टाकलेले होते व तेथील ले-आऊअ मधील भूखंड क्रमांक 66 तक्रारकर्त्याने घेण्याचा करारनामा केला व भूखंडाची एकूण रक्कम रुपये 5,31,387/- ठरली. त्याप्रमाणे, तक्रारकर्ता यांनी संपूर्ण विश्वास ठेवून भूखंडाची एकूण रक्कम विरुध्दपक्ष यांनी दिली व त्याबाबतची पावती क्रमांक 95, दिनांक 12.5.2011 रोजी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दिला. पुढे तक्रारकर्ता विरुध्दपक्ष यांचेकडे दिनांक 12.5.2011 रोजी दिलेल्या पञानुसार दिनांक 15.5.2013 रोजी तक्रारकर्ता यांनी भूखंडाचे विक्रीपञ लावून देऊ असे कळवीले. परंतु, दिनांक 18.5.2013 पर्यंत सुध्दा विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यांना संपर्क साधूनही विनंती करुनही विक्रीपञ लावून दिले नाही. त्यानंतर, पुन्हा दिनांक 17.6.2013 रोजी किंवा विक्रीपञ करुन देण्यास तक्रारकर्त्याने तगादा लावला. परंतु, विरुध्दपक्ष यांनी विक्रीपञकरुन देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, विरुध्दपक्ष यांनी विक्रीपञ लावण्यास ब-याचदा दुरध्वनीव्दारे संपर्क साधून विक्रीपञ लावण्याकरीता तगादा लावला व नंतर तक्रारकर्त्याला लक्षात आले की, विरुध्दपक्षाने आपली फसवणूक केली आहे त्यामुळे दिनांक 17.6.2015 रोजी अधिवक्ता मार्फत विरुध्दपक्ष यांनी कायदेशिर नोटीस पाठविली, त्याचेही उत्तर विरुध्दपक्षाने दिले नाही. सरते शेवटी तक्रारकर्ता यांनी सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन विरुध्दपक्ष यांचेकडून झालेली अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेत ञुटी झाल्याबाबतचे मंचाकडून न्याय मिळण्याकरीता दाखल केलेली आहे. तसेच, विरुध्दपक्ष यांनी भूखंडाची सूपर्ण रक्कम सुध्दा विरुध्दपक्षाला दिलेली असून भूखंडाचे विक्रीपञ करुन देण्याची प्रार्थना केलेली आहे व तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- देण्याचे आदेशीत व्हावे व तसेच विरुध्दपक्ष भखंडाचे विक्रीपञ करुन देण्यास असमर्थ असल्यास भूखंडापोटी भरलेली रक्कम 5,31,387/- रुपये 18 टक्के व्याजासह परत देण्याचे आदेशीत व्हावे, अशी मागणी केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याचे तक्रारीत अनुसरुन विरुध्दपक्ष यांनी मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावणी होऊ शकली नाही करीता दिनांक 18.7.2016 रोजी दैनिक वृत्तपञ नवभारत या वृत्तपञातून जाहीर नोटीस काढण्यात आला, तरी सुध्दा सदर प्रकरणात उपस्थित होऊन आपले तक्रारीला उत्तर सादर केले नाही, त्यामुळे दिनांक 24.8.2016 रोजी मंचाने विरुध्दपक्षाचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केले.
4. तक्रारकर्त्याने सदरच्या तकरीबरोबर 1 ते 5 दस्ताऐवज दाखल करुन , त्यात प्रामुख्याने विरुध्दपक्ष यांना रुपये 5,31,387/- ज्या भूखंडापोटी रकमेचा भरणा केलयाबाबतची पावती, तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना पाठविलेल्या पञाची प्रत, व कायदेशिर नोटीस इत्यादी दस्ताऐवज अभिलेखावर दाखल केलेले आहे.
5. तक्रारकर्त्याने सदरच्या प्रकरणात आपला लेखी युक्तीवाद व मंचासमक्ष त्याचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याचे सेवेत ञुटी किंवा : होय
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनी ज्याचा व्यवसाय शेतीचे ले-आऊट पाडून तेथील भूखंड विकण्याचा असून तक्रारकर्त्याने मौजा – कान्होलीबारा, सर्व्हे नं.427, प.ह.क्र.66, तह. हिंगणा, जिल्हा – नागपूर येथील भूखंड क्रमांक 66 ज्याचे एकूण क्षेञफळ 2361.63 चौरस फुट असून त्याची एकूण किंमत रुपये 5,31,387/- मध्ये घेण्याचे ठरले होते व त्याअनुषंगाने विरुध्दपक्षाकडे रकमेचा भरणा केला, त्याबाबतची पावती तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाकडून भूखंड विकत घेतला, परंतु विरुध्दपक्षाने दिनांक 18.5.2013 पर्यंत भूखंडाचे विक्रीपञ लावून देतो असे आश्वासीत केले होते. त्यादरम्यानचा काळ लोटून सुध्दा विरुध्दपक्ष भूखंडाची विक्रीपञ करुन दिले नाही, अशी तक्रार आहे व तक्रारकर्ता विरुध्दपक्ष कंपनीचा ग्राहक या संज्ञेत मोडतो. विरुध्दपक्ष यांनी प्रकरणात उपस्थित होऊन आपले उत्तर सादर केले नाही, करीता मंचाने दिनांक 24.8.2016 रोजी त्याचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत केला. त्यामुळे, तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई मागण्याचा तक्रारकर्त्याला अधिकार आहे, असे वाटते. तसेच, विरुध्दपक्ष यांनी सदर भूखंडाचे कायदेशिर N.A.T.P. चे आदेश प्राप्त करुन भूखंडाचे विक्रीपञ लावून देण्यास पाञ आहे.
करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याने आवंटीत केलेला भूखंड त्याचे कायदेशिर N.A.T.P. करुन तक्रारकर्त्याला त्याचे नोंदणीकृत विक्रीपञ लावून द्यावे तसेच भूखंडाचा ताबा तक्रारकर्त्याला द्यावा.
(3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला वादीत भूखंडाचे विक्रीपञास कायदेशिर अडचणीप्रमाणे भूखंडाचे विक्रीपञ लावून देण्यास असमर्थ असल्यास तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम रुपये 5,31,387/- जमा केल्याचा दिनांक 12.05.2011 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने येणारी रक्कम तक्रारकर्त्याला त्याच्या हातात पडेपर्यंत देण्यात यावी.
(4) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.