(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 20 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष रेवती असोसिएट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांचे अभिन्यासातील भूखंड क्रमांक 67, मौजा – कोन्होलीबारा, सर्व्हे नंबर 427, प.ह.नं. 66, तह. हिंगणा, जिल्हा – नागपुर येथील उपरोक्त भूखंडाकरीता रुपये 5,63,647/- मध्ये विकत घेण्याकरीता विरुध्दपक्षासोबत दिनांक 31.10.2011 रोजी Deed of Memorandum of Understanding केले. तक्ररकर्त्याने विरुध्दपक्षावर पूर्ण विश्वास ठेवून आजपर्यंत विरुध्दपक्षाच्या कार्यालयात जावून एकूण रक्कम रुपये 2,52,400/- जमा केले. तक्रारकर्त्याने सदर भूखंडाच्या कायदेशिर विक्रीबद्दल विचारणा केली असता विरुध्दपक्षाकडून कुठलाही अपेक्षीत उत्तर मिळाले नाही. यालउट, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता यांनी मोबदल्यातील उर्वरीत रक्कम भरणा करण्याकरीता सांगितले. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास Deed of Memorandum of Understanding व्यतिरिक्त भूखंडासंबंधी कुठलेही नोंदणीकृत दस्ताऐवज करुन दिले नाही. तसेच, कायदेशिर विक्रीपत्र व संबंधीत भूखंडाचा ताबा तक्रारकर्त्यास आजपर्यंत करुन दिले नाही. यावरुन, विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे व सेवेत त्रुटी केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास सदर भूखंडाचे शासना तर्फे स्विकृत करुन कायदेशिर विक्रीपत्र करुन द्यावे.
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता नुकसान भरपाई रुपये 50,000/- देण्यात यावे व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
3) जर विरुध्दपक्ष सदरच्या भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असेल तर तक्रारकर्त्याची जमा रक्कम रुपये 2,52,400/- तक्रारकर्त्यास द.सा.द.शे.18 % व्याजाने तक्रारकर्त्यास मिळेपर्यंत परत करण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत मंचात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु, ती नोटीस विरुध्दपक्षास प्राप्त होऊनही ते मंचात हजर झाले नाही. त्यामुळे, दिनांक 7.9.2017 रोजी विरुध्दपक्षाचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर पारीत केला.
4. तक्रारकर्ता तर्फे लेखी युक्तीवाद व मौखीक युक्तीवादाकरीता पुरसीस दाखल केली. तक्रारकर्ता तर्फे अभिलेखावर दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे मौजा – कोन्होलीबारा, सर्व्हे नंबर 427, प.ह.क्र.66, तह. हिंगणा, जिल्हा – नागपुर येथील भूखंड क्रमांक 67 एकूण रुपये 5,63,647/- मध्ये विकत घेण्याकरीता विरुध्दपक्षाने दिनांक 31.10.2011 रोजी Deed of Memorandum of Understanding करुन दिले. तक्रारकर्त्याने ठरलेल्या रकमेपैकी विरुध्दपक्षाच्या कार्यालयात जावून आजतागायत रुपये 2,52,400/- जमा केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचेमध्ये Deed of Memorandum of Understanding केल्याबाबतचा दस्त निशाणी क्र.3 नुसार दाखल दस्त क्र.1 वर दाखल आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे खालील ‘परिशिष्ट - अ’ प्रमाणे वेळोवेळी एकूण रक्कम रुपये 2,52,400/- दिल्याची नोंद आहे, ते दस्त निशाणी क्र.3 नुसार दाखल पान क्र.26 नुसार जोडले आहे.
‘परिशिष्ठ – अ’
अ.क्र. | दिलेली रक्कम (रुपये) | रक्कम दिल्याची तारीख | रोख/धनादेश/ डी.डी. |
1 | 5,700/- | 30.10.2011 | रोखीने |
2 | 28,200/- | 31.10.2011 | रोखीने |
3 | 6,000/- | 07.01.2011 | रोखीने |
4 | 6,000/- | 08.02.2012 | रोखीने |
5 | 6,000/- | 14.03.2012 | रोखीने |
6 | 6,000/- | 03.05.2012 | रोखीने |
7 | 6,000/- | 03.05.2012 | रोखीने |
8 | 6,000/- | 08.06.2012 | रोखीने |
9 | 28,500/- | 20.07.2012 | रोखीने |
10 | 6,000/- | 05.08.2012 | रोखीने |
11 | 6,000/- | 09.09.2012 | रोखीने |
12 | 6,000/- | 11.10.2012 | रोखीने |
13 | 6,000/- | 05.11.2012 | रोखीने |
14 | 30,000/- | 17.01.2013 | रोखीने |
15 | 12,000/- | 20.03.2013 | रोखीने |
16 | 6,000/- | 13.04.2013 | रोखीने |
17 | 6,000/- | 14.05.2013 | रोखीने |
18 | 25,000/- | 13.08.2013 | रोखीने |
19 | 6,000/- | 23.09.2013 | रोखीने |
20 | 5,000/- | 15.10.2013 | रोखीने |
21 | 10,000/- | 06.12.2013 | रोखीने |
22 | 30,000/- | 09.01.2014 | रोखीने |
23 | 6,000/- | 11.02.2014 | रोखीने |
| 2,52,400/- | एकूण रुपये | |
6. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत विरुध्दपक्षाकडे वरीलप्रमाणे रुपये 2,52,400/- एवढी रक्कम जमा केल्याचे नमूद केले आहे. परंतु, तक्रारकर्त्याने त्याबाबत कोणतेही पुरावे दाखल केले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने रुपये 2,52,400/- एवढी रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा केले हे म्हणणे विचारात घेण्यात येत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या Deed of Memorandum of Understanding चे अवलोकन केले असता, दिनांक 20.10.2011 ला रुपये 5,700/- व दिनांक 31.10.2011 ला रुपये 28,200/- असे मिळून एकूण रुपये 33,900/- विरुध्दपक्षास मिळाल्याची नोंद आहे. यावरुन, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास भूखंडापोटी Deed of Memorandum of Understanding मध्ये म्हटल्याप्रमाणे रुपये 33,900/- दिल्याचे दिसून येते.
7. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत General Power of Attorney दाखल केली आहे, ती निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.28 वर दाखल आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे श्रीमती जयमाला मुर्लीधर ढगे, वय 58 वर्षे, धंदा – नोकरी, राहणार त्रिमुतीनगर, नागपुर यांनी आपला मुलगा श्री प्रशांत मुर्लीधर ढगे, वय 36 वर्षे, धंदा – नोकरी, राहणार त्रिमुर्तीनगर, नागपुर यांना आपली स्थावर मालमत्ता संबंधी आममुखत्यारधारक म्हणून नियुक्त केल्याचे नोंदणीकृत दस्ताऐवज आहे. मंचा तर्फे विरुध्दपक्षास दिनांक 6.2.2017 ला नोटीस पाठविण्यात आली, परंतु विरुध्दपक्ष मंचात उपस्थित झाले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाचे विरुध्द दिनांक 18.7.20017 रोजी नवभारत वृत्तपत्रातून नोटीस प्रसिध्द करण्यात आला, तरी सुध्दा विरुध्दपक्ष मंचात उपस्थित राहिले नाही. त्यामुळे, दिनांक 7.9.2017 रोजी विरुध्दपक्षा विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा निर्णय पारीत करण्यात आला.
8. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे कार्यालयात वारंवार विरुध्दपक्षाचे कार्यालयात जावून रुपये 2,52,400/- जमा केल्याबाबतचे म्हणणे आहे, परंतु तक्रारीत त्याबाबत कोणाताही लेखी स्वरुपात पुरावा दाखल केला नाही त्यामुळे सदर रक्कम पुराव्याअभावी विचारात घेण्यात येत नाही. तक्रारकर्ताने Deed of Memorandum of Understanding प्रमाणे विरुध्दपक्षास रुपये एकूण रक्कम रुपये 33,900/- दिल्याचे नमूद आहे, त्यामुळे ती रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे मंचाला वाटते. करीता, मंच सदर तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याची जमा रक्कम रुपये 33,900/- यावर रक्कम जमा केल्याचा शेवटचा हप्ता दिनांक 11.2.2014 पासून द.सा.द.शे.18 % व्याजाने तक्रारकर्त्याच्या हातात मिळेपर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 20/12/2017