Exh.No.40
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 34/2011
तक्रार दाखल झाल्याचा दि. 26/09/2011
तक्रार निकाल झाल्याचा दि. 23/05/2012
श्री कृष्णा धोंडू दळवी
पोस्ट- होडावडा, भोजवाडी,
तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) मा.अध्यक्ष,
श्री देवू लाडू दळवी
श्री क्षेत्रपालेश्वर विकास सह.सेवा संस्था (लि.)
पो.होडावडा, तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग.
2) सचिव,
श्री राजबा रमाकांत सावंत
श्री क्षेत्रपालेश्वर विकास सह.सेवा संस्था (लि.)
पो.होडावडा, तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग.
3) श्री भास्कर लाडू साळगांवकर
रा. पो.होडावडा (परबवाडी),
तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग.
4) श्री सुरेश महादेव जाधव
रा. पो. होडावडा (परबवाडी),
तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग
5) श्री नारायण लाडू पार्सेकर
रा. पो. होडावडा (सुभाषवाडी),
तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग
6) बँक तालुका निरिक्षक,
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
तालुका – वेंगुर्ला, जिल्हा – सिंधुदुर्ग ... सामनेवाला
गणपूर्तीः-
1) श्री. एम्. डी. देशमुख, अध्यक्ष
) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
सामनेवाला क्र.1 ते 5 तर्फे - विधिज्ञ एस.जी. प्रभुखानोलकर
सामनेवाला क्र.6 तर्फे - विधिज्ञ श्री दीपक अंधारी
(मंचाच्या निर्णयाद्वारे द्वारा एम्. डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.23/05/2012)
1) प्रस्तुतची तक्रार स्वीकृत करुन सामनेवालेस नोटीस काढण्यात आली. त्यानुसार सामनेवाले हे मंचात हजर होऊन त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदार तसेच सामनेवाला क्र.1 ते 5 यांना पुकारले असता ते गैरहजर आहेत. तसेच त्यांच्या वकीलांना पुकारले असता ते गैरहजर आहेत. सामनेवाला क्र.6 व त्यांचे वकील हजर. सामनेवाला क्र.6 च्या वकीलांनी युक्तीवाद केलेला आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण हे मंच गुणदोषावर निकाली काढीत आहोत.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, तक्रारदाराने दि.21/08/2007 रोजी कर्ज मिळण्यासाठी सामनेवाला संस्थेकडे कर्ज मागणी अर्ज सादर केला. सामनेवाला संस्थेच्या कर्ज वाटप समितीने प्रत्यक्ष आंबा कलम क्षेत्राची पाहणी करुन दि.14/01/2008 रोजी तक्रारदारास रक्कम रु.26,200/- कर्ज रक्कम अदा केली. तिस-या वर्षी दि.09/09/2010 रोजी रक्कम रु.46,000/- ची कर्ज रक्कम दिलेली आहे. त्यानंतर तक्रारदारास पुढील काळात शासन धोरणाच्या बदलत्या निकषानुसार वाढीव कर्ज मिळणे आवश्यक असतांनाही सामनेवाले यांनी वेळोवेळी हेतूपुरस्सर कारणे सांगून वाढीव कर्ज दिलेले नाही. सदर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये सामनेवाला यांनी अपेक्षा व गरजेनुसार तक्रारदारास पतपुरवठा केलेला नाही. त्यामुळे आंबा पिक क्षेत्राची निगराणी करणे, पोषक रासायनिक व सेंद्रिय खते घालणे आणि किटकनाशक औषधांची फवारणी करणे, साफ-सफाई इत्यादी कामे शिल्लक राहिली असल्याने मिळणा-या फळ उत्पनांवर परिणाम होऊन नुकसान झाले.
3) तक्रारदार पुढे सांगतात की प्रतिवर्षी कर्ज मागणीच्यावेळी तक्रारदार यांच्या सहहिस्सेदारांची संमतीपत्रे करुन घेतली. मात्र इतर आंबा- पिक कर्जधारक शेतक-यांकडून ती वेळोवेळी घेतली जातात का ? याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागीतली, परंतु त्यांचे समाधान झाले नसल्याने प्रथम अपिलीय अधिका-याकडे अपिल केले. त्यावर दि.25/04/2011 रोजी सुनावणी त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार संमत्तीपत्रे वगळता 7/12 च्या झेरॉक्स प्रती, फेर आंबा पिक कर्जदारांची यादी उपलब्ध करुन दिली. तसेच 3 वर्षाच्या कालावधीमध्ये रितसर पत्रव्यवहार करुनही सामनेवाला यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच ही कागदपत्रे करण्यापूर्वी कर्ज वाटप करण्यात आले. तक्रारदार पूढे सांगतात की, या प्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिव व कर्ज वाटप समिती सदस्य यांनी सहकार कायदयाचा आणि नियमांचा भंग करुन आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे. त्यामुळे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेमार्फत कार्यवाही होणेबाबत आदेश व्हावेत. तसेच दि.21/08/2007 ते 30/03/2011 या 3 ½ वर्षाच्या कालावधीमध्ये तक्रारदारास आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच तसेच आंबा पिक उत्पन्नावर व देखभालीवर दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे रक्कम रु.40,600/- चे नुकसान झाले आहे तसेच त्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठेवल्याने सामनेवालांची सहकार खात्याकडून चौकशी व्हावी अशी विनंती केलेली आहे.
4) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीसोबत नि.4/1 ते 4/12 वर पिक कर्ज मागणीबाबत कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5) सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी तक्रारदाराची तक्रार प्रतिज्ञापत्रावर नाकारलेली आहे व त्यांनी त्यांचे सविस्तर म्हणणे नि.20 वर व सामनेवाला क्र.6 यांनी नि.19 वर दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी नि.21 च्या यादीने कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला क्र.6 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे तसेच तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही तसेच तक्रारदाराने मागीतलेल्या नुकसानभरपाईला कोणताही आधार नाही. सामनेवाला क्र.6 बँक हे सामनेवाला क्र.1 ते 5 यांना त्यांच्या मागणीप्रमाणे कर्जपुरवठा करतात. सामनेवाला क्र.6 संस्था ही सामनेवाला क्र.1 ते 5 यांना कर्ज वितरण करीत असतांना सहकार कायदयाचा भंग झालेला नाही. प्रस्तुत तक्रार या मंचाच्या क्षेत्रात येत नसल्याने तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी, असे म्हटले आहे.
6) या मंचाने तक्रारदाराची तक्रार, सामनेवालाने दाखल केलेले म्हणणे, दोन्ही बाजूंनी दाखल केलेली शपथपत्रे यांचे अवलोकन केले आहे तसेच सामनेवाला क्र.6 यांच्या वकीलांचा युक्तीवाद या मंचाने ऐकलेला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीचे अवलोकन केले असता त्यांच्या तक्रारीच्या विनंती कलमात सामनेवाला यांनी पुरेसा व त्यांच्या गरजेइतका कर्ज पुरवठा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या झालेल्या नुकसानीची मागणी केलेली आहे. वास्तविक पाहता कर्ज वितरणासंबंधीचे निर्णय हे धोरणात्मक स्वरुपाचे आहेत. धोरणात्मक स्वरुपाच्या निर्णयामध्ये या मंचाला हस्तक्षेप करता येणार नाही तसेच तक्रारदाराने सहकार खात्यामार्फत चौकशी व्हावी व त्यावर आदेश व्हावेत अशी मागणी केलेली आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील तरतूदींचा विचार करता अशा प्रकारचे आदेश करणेचे अधिकारक्षेत्र या मंचाला येत नाही. उपरोक्त विवेचन विचारात घेता तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये कोणतिही गुणवत्ता या मंचाला दिसून येत नाही.
सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
- आदेश -
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3) सदरचे निकालपत्र खुल्या न्यायमंचात घोषित करण्यात आले.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 23/05/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम्. डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.