नि. 34 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 257/2010 नोंदणी तारीख – 12/10/2010 निकाल तारीख – 20/1/2011 निकाल कालावधी – 68 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. सचिन बबनराव पांढरपट्टे 2. सौ संध्याराणी सचिन पांढरपट्टे दोघे रा.26, समाधान, शिवनेरी हौसिंग सोसायटी शाहूनगर, गोडोली, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.आनंद कदम) विरुध्द 1. रेणुकामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शाहूनगर, गोडोली, सातारा तर्फे चेअरमन सतिश रंगनाथ कुलकर्णी तर्फे 2. चेअरमन, सतिश रंगनाथ कुलकर्णी रा.बंधूप्रेम, शाहूनगर, गोडोली, सातारा 3. संचालक, शशिकांत रंगनाथ कुलकर्णी रा. श्रीनिवास, विशाल सहयाद्री हौसिंग सोसायटी, शाहूनगर, गोडोली, सातारा 4. संचालक, परिक्षित जयंत कुलकर्णी रा. विद्युत, विशाल सहयाद्री हौसिंग सोसायटी, शाहूनगर, गोडोली, सातारा 5. संचालक, सुधीर पांडुरंग देशपांडे रा. 108, शनिवार पेठ, सातारा 6. संचालिका, सौ वैशाली सुर्यकांत भट, रा.मु.पो. पाचवड, ता.वाई जि. सातारा 7. संचालक, श्री गिरीश भगवान कुलकर्णी रा.110, बारावकर नगर, छ.प्रतापसिंह गृहनिर्माण संस्था, एम.आय.डी.सी. सातारा 8. संचालक, नंदकुमार बाळकृष्ण फडणीस, रा.18, आझाद कॉलनी, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एस.व्ही.कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. तसेच अर्जदार यांचे बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. सदरच्या ठेवींची मुदत संपलेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना वेळोवेळी तीन ते चार वेळा त्यांची मुदत डिसेंबर 2009 पर्यंत वाढवून दिली. परंतु तदनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.4,39,928/- लाख व त्यावरील व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र. 1 ते 3 व 5 ते 8 यांनी नि.22 कडे लेखी म्हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार क्र.1 चे सासरे व क्र.2 चे वडील श्री सदाशिव यशवंत भंडारे हे जाबदार संस्थेचे संचालक आहेत. त्यांना तसेच इतर काही संचालकांना अर्जदार यांनी याकामी पक्षकार केलेले नाही. अर्जदारचे ठेवपावत्यांची मुदत संपणेची तारीख दि.31/12/09 नसून 30/9/10 अशी आहे. अर्जदार यांनी दि.18/9/2010 रोजी बचत खात्यातून रु.10,000/- काढून नेले आहेत. अर्जदारने स्वतःहून ठेवपावत्यांची मुदत वाढवून घेवून बचत खात्यामार्फत व्याजाचा उपभोग घेतलेला आहे. अर्जदार यांनी ठेवरकमेची जाबदार यांचेकडे कधीही मागणी केलेली नव्हती. अर्जदारांनी संस्थेकडे लेखी अर्ज व आवश्यक नियमानुसारची पूर्तता केल्यास संबंधीत रक्कम अर्जदारांना परत करणेबाबत संस्था कार्यवाही करेल. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.4 यांना झालेली आहे. परंतु त्यांनी याकामी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही. 4. अर्जदार व जाबदार यांचे अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकला तसेच दाखल कागदपत्रे पाहिली. 5. जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी जाबदार संस्थेचे संचालक असलेले त्यांचे पती व अन्य काही संचालकांना याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. परंतु अर्जदार यांनी ठेवीदार ग्राहक या नात्याने जाबदार संस्थेत ठेवी ठेवल्या आहेत. सदरचे ठेवींची मुदत संपलेनंतर सदरच्या रकमा परत करणेची जबाबदारी जाबदार क्र.1 संस्था व पर्यायाने जाबदार क्र.2 ते 8 यांची आहे. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की अर्जदार हे त्यांचेकडे ठेवीची मुदत संपलेनंतर रक्कम परत मागण्यास कधीही आले नव्हते. परंतु सदरचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. जाबदार हे रक्कम देण्यास तयार असते तर अर्जदारांना या मे.मंचासमोर दाद मागण्याची आवश्यकता भासली नसती. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही, तसेच बचत खात्यातील रक्कमही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी दि.18/9/10 रोजी रु.10,000/- काढून नेले आहेत. अर्जदार यांनी सदरची बाब प्रतिउत्तर दाखल करुन नाकारली आहे. जाबदार यांनी नि.33 ला अर्जदारचे बचत खात्याचा उतारा दाखल केला आहे. त्यामध्ये अर्जदारचे नावे रोख रु.10,000/- दि.18/9/10 रोजी दिल्याबाबतची नोंद दिसून येत आहे. परंतु सदरची रक्कम अर्जदार यांनी काढून नेताना अर्जदार यांनी भरुन दिलेली पैसे काढण्याची स्लीप व त्यावर अर्जदार यांना सदरची रक्कम मिळालेबाबतची सही या बाबी जाबदार यांनी याकामी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ खातेउता-यातील नोंदीवरुन सदरची रक्कम अर्जदार यांना मिळाली आहे यावर विश्वास ठेवता येणार नाही. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सदरची रक्कम रु.10,000/- दिले आहेत हे जाबदार यांचे म्हणणे ग्राहय मानता येणार नाही. 7. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 8 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.001158, 287, 286, 285, 001213 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. वरील ठेवपावत्यांवर जाबदार यांनी अर्जदार यांना निकाल तारखेपूर्वी अदा केलेल्या व्याजाच्या रकमेची वजावट करण्यात यावी. क. बचत खाते क्र. 448 वरील शिल्लक रक्कम अधिक रु.10,000/- बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. ड. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत. इ. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 20/1/2011 (सुनिल कापसे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य अध्यक्ष
| Mr. Sunil K Kapse, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | , | |