जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 668/2009. तक्रार दाखल दिनांक : 03/12/2009. तक्रार आदेश दिनांक : 21/03/2011. श्री. नारायण सुखदेव कपणे, वय 22 वर्षे, व्यवसाय : ड्रायव्हर/ व्यापार, रा. देगांव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., 210, साई इन्फोटेक, आर.बी. मेहता मार्ग, पटेल चौक, घाटकोपूर (पूर्व), मुंबई. (नोटीस सोलापूर शाखेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.डी. शिंदे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : आर.एम. कोनापुरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांच्या मालकीच्या जीप क्र.एम.एच.13/एन.8804 चा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे पॉलिसी क्र.1702782311002322 अन्वये विमा उतरविण्यात आला आहे. तक्रारदार हे नातेवाईकांना सोडण्यासाठी तुळजापूर येथे गेले होते आणि सोलापूरकडे येताना बसशी अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले. जीपच्या दुरुस्तीकरिता रु.1,90,000/- खर्च आला. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्लेम सादर केला. विमा कंपनीने इन्व्हेस्टीगेटरची नियुक्ती केली आणि तक्रारदार यांनी त्यांच्या मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. तक्रारदार यांनी विमा कंपनीशी वारंवार संपर्क साधला आहे. परंतु दि.12/10/2009 च्या पत्राद्वारे विमा कंपनीने तक्रारदार यांना क्लेम नाकारला. विमा कंपनीने क्लेम नाकारुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारदार यांनी रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि त्रासापोटी रु.20,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी भाडे तत्वावर जीपमधून प्रवाशी वाहतूक करण्यात येत होती आणि ज्यामुळे पॉलिसीच्या अटीचा भंग झालेला आहे. त्यांनी योग्य कारणास्तव विमा क्लेम नाकारला असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी खर्चासह तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या जीप क्र.एम.एच.13/एन.8804 चा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याविषयी विवाद नाही. तसेच विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.13/4/2009 रोजी विमा संरक्षीत जीपचा अपघात झाल्याविषयी विवाद नाही. विमा कंपनीने दि.12/10/2010 रोजीच्या पत्राद्वारे जीपचा वापर भाडे तत्वावर केल्यामुळे विमा क्लेम नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. निर्विवादपणे, अपघाताचे वेळी विमा संरक्षीत जीपमध्ये काही प्रवाशी प्रवास करीत असल्याचे पोलीस पेपर्सवरुन निदर्शनास येते. विमा नाकारण्याचे कारण पाहता, सदर प्रवाशी हे भाडे तत्वावर मोबदला देऊन प्रवास करीत होते काय ? किंवा कसे ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. 6. विमा कंपनीने अपघातग्रस्त जीपमधून प्रवास करणा-या सौ. मिनाक्षी महादेव भरले यांचे शपथपत्र दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी ड्रायव्हरकडून प्रवासाकरिता रु.30/- ची मागणी केल्याचे व इतर प्रवासी जीपचे भाडे देऊन उतरुन गेल्याचे नमूद केले आहे. 7. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर सौ. मिनाक्षी महादेव भरणे यांचे पोलीस तपास टिपण दाखल केले असून त्यामध्ये भाडे तत्वावर प्रवास केल्याचा कोणताही उल्लेख नाही. 8. रेकॉर्डवर दाखल पोलीस पेपर्सचे अवलोकन करता, अपघाताचे वेळी प्रवास करणा-या प्रवाशांनी प्रवासाकरिता मोबदला किंवा भाडे दिल्याचे निदर्शनास येत नाही. 9. मा.सर्वोच्च न्यायालयाने 'अमलेंदु साहू /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.', 2 (2010) सी.पी.जे. 9 (एस.सी.) निवाडयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, Para. 16 : In the instant case the entire stand of the insurance company is that claimant has used the vehicle for hire and in the course of that there has been an accident. Following the aforesaid guidelines, this Court is of the opinion that the insurance company cannot repudiate the claim in toto. 10. विमा कंपनीने रेकॉर्डवर मा.राष्ट्रीय आयोगाने ‘ओरिएंटल इन्शु.कं.लि. /विरुध्द/ बी.ए. नागेश’, 2010 (4) सी.पी.आर. 41 (एन.सी.) या निवाडयाचा संदर्भ घेतला आहे. परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वाचा आम्ही आधार घेतल्यामुळे मा.राष्ट्रीय आयोगाच्या निर्णयातील तत्व विचारात घेणे न्यायिकदृष्टया उचित ठरत नाही. 11. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वमान्य व प्रस्थापित न्यायिक तत्व विचारात घेता, एखाद्या वेळी भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत असल्याचे मान्य केले तरी विमा कंपनीस संपूर्णत: क्लेम नाकारता येऊ शकत नाही. भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत असल्याचे सिध्द झाल्यास नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर क्लेम सेटल करण्यात यावे, असे प्रस्थापित तत्व आहे. परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये भाडे तत्वावर वाहन चालविण्यात येत होते, असे सिध्द झालेले नाही आणि त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर सेटल करणे उचित ठरत नाही. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 12. तक्रारदार यांच्या अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे मुल्यनिर्धारण करणारे सर्व्हेअर एस.एम. दुधणी यांचा सर्व्हे रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामध्ये वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.91,490/- च्या नुकसानीचे निर्धारण करण्यात आले आहे आणि सदर बाब विमा कंपनीस मान्य आहे. सर्व्हे रिपोर्टद्वारे निर्धारण केलेल्या रकमेस तक्रारदार यांनी आक्षेप घेऊन योग्य पुराव्याद्वारे आव्हान दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.91,490/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 13. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना रु.91,490/- दि.12/10/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर संपूर्ण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/29311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |