निकालपत्र :- (दि.14/09/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की- अ) तक्रारदाराचे मयत पती शामराव पाटील हे शेती व्यवसायिक होते.त्यांचा विमा शासकीय शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.1कडे उतरविला होता. सदर विम्याच्या हप्त्याची रक्कम शासना तर्फे सामनेवालांकडे भरण्यात आली होती. यातील मयत विमाधारक शामराव पाटील यांचा दि.04/03/2007 रोजी शेताकडून संध्याकाळी 6 वाजता सायकलवरुन येत असताना मोटर सायकलस्वाराने ठोकरल्यामुळे गंभीर अपघात झाला. त्याच्यावर नवे पारगाव येथील तसेच त्यानंतर कोडोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर येथील यशोमंगल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर दि.19/5/2007 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्याचा उपयोग न होता शामराव पाटील यांचे दि.20/05/2007 रोजी अपघाती निधन झाले. ब) त्यानंतर तक्रारदार यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला क्र.1कडे शेतकरी अपघात योजनेनुसार विमा क्लेमचे रु.1,00,000/- मिळावे म्हणून क्लेम फॉर्म दिला. परंतु आजतागायत सामनेवाला क्र.1विमा कंपनीने तक्रारदारास आश्वासनाखेरीज काहीही दिले नाही. तक्रारदाराने दि.29/08/2009रोजी सामनेवाला क्र.1 यांना वकीलांमार्फत रजि.ए.डी.ने नोटीसही पाठवली आहे. परंतु त्यालाही सामनेवाला यांनी दाद दिली नाही. तक्रारदार हे गरीब शेतकरी असून त्यांच्यावर कुटूंबाच्या चरितार्थाचा बोजा आहे. शासकीय योजनेला अपेक्षीत असल्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने गरीब व विधवा तक्रारदाराचा क्लेम योग्य मुदतीत मंजूर करुन अदा न करणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत मंचाकडे तक्रार केली आहे व सामनेवालाकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी अशी विनंती सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत खबरी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, सी.पी.आर.हॉस्पिटलने दिलेला मृत्यू कारण दाखला, मृत्युप्रमाणपत्र, तहसिलदार हातकणंगले यांनी तक्रारदारांना पाठवलेले पत्र, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारचे पतींना पाठवलेले पत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना पाठवलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस रजि.ए.डी.ने पाठवलेली पावती, सामनेवाला क्र. 1 व 2 यांना सदर नोटीस पोहचलेबाबतची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) यातील सामनेवाला क्र.2 कबाल इन्शुरन्स कंपनीने आपल्या कथनात प्रस्तुत प्रकरणात आपली जबाबदारी तक्रारदाराकडून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन ती विहीत कालावधीत सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे पाठवणे एवढीच असते. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्याकडे तक्रारदाराकडून दि.12/07/2007 रोजी क्लेमपेपर्स आल्यावर ते लगेचच सामनेवाला क्र.1कडे पाठवले. परंतु तरीही सामनेवाला क्र.1 कडून त्यासंबंधी कुठलीही कार्यवाही झाली नाही. परंतु या प्रकरणात सामनेवाला क्र.2 ची कुठलीही सेवात्रुटी नाही असे सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या लेखी कथनात म्हटले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला सामनेवाला यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यातील विमाधारक मयत शामराव पाटील हे सायकलवरुन जात असताना मोटरसायकलच्या धडकेने झालेल्या अपघातामध्ये जखमी झाले व त्यातच ते मयत झाले इत्यादी सर्व कथने सामनेवाला क्र.1 यांनी अमान्य केली आहेत. सामनेवाला विमा कंपनीने सदर क्लेम अजून नामंजूरही केला नाही. परंतु तक्रारदाराने घाईगडबडीने प्रस्तुत मंचाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सदरची तक्रार प्रस्तुत मंचासमोर चालणेस पात्र नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे कथन सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनाची प्रत दाखल केली आहे. (6) या मंचाने दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासली. तसेच युक्तीवादाच्या वेळी तक्रारदाराचे वकील गैरहजर होते. सामनेवालाच्या वकीलांनी युक्तीवाद केला. सामनेवाला क्र.1 च्या वकीलांनी सदरहू प्रकरणातील मोटरसायकलस्वाराचे लायसेन्स अदयाप मिळाले नसल्यामुळे सामनेवाला क्लेम च्याबाबतीत अदयाप निर्णय घेऊ शकत नसल्याचे कथनही सामनेवाला यांनी केले आहे. (7) सामनेवाला यांनी तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. आता सामनेवालाच्या सेवेत त्रुटी आहे का ? व त्याबद्दल सामनेवाला नुकसानभरपाई देय आहे का ? याबद्दल या मंचाला निर्णय घ्यावयाचा आहे. (8) तक्रारदाराचे मयत पती हे अपघाताने मृत्यू पावले हे तक्रारदाराने दाखल केलेल्या खबरी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, मृत्यू दाखला, सी.पी.आर.हॉस्पिटलचा दाखला इत्यादी कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. तक्रारदार हे सायकलवरुन जात असताना त्यांना अपघात झाला आहे हे स्पष्ट होऊनही सामनेवालाने मोअर सायकलस्वाराचे लायसन्स मिळत नसल्यामुळे क्लेमचा निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा हास्यास्पद युक्तीवाद केला आहे तो हे मंच ग्राहय धरु शकत नाही. (9) सदर शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकरी कुटूंबातील कर्ता माणूस अपघाताने दगावल्यास त्याचे कुटूंब निराधार होऊन उघडयावर येऊ नये या उदात्त हेतूने सुरु केली आहे. परंतु सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने दि.20/05/2007 रोजी झालेल्या अपघाताबद्दल गरीब शेतक-याच्या विधवा पत्नीला 3 वर्षे होऊनही सदर क्लेमबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही ही सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेमधील निश्चित व गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदाराला विमा क्लेमचे रक्कम रु.1,00,000/-(रु. एक लाख फक्त) दि.20/08/2007 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजासह दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावे.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |