जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/270 प्रकरण दाखल तारीख - 11/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 27/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य आनंदराव पि.रामराव पाटील, वय वर्षे 60, व्यवसाय शेती, अर्जदार. रा.उंदरी (प-मु) ता.मुखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार. 19,रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई-400038. 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि, मार्फत – शाखा व्यवस्थापक, उज्वल एन्टर प्राईजेसच्यावर, हनुमान गड कमानी जवळ,हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कुलकर्णी. गैरअर्जदार क्र. 1 - स्वतः गैरअर्जदारा 2 व 3 तर्फे वकील - अड.अविनाश जी.कदम. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ही मयत विठाबाई आनंदराव पाटील हिचा पती आहे. मयत विठाबाई पाटील यांचा मृत्यु दि.19/10/2007 रोजी सर्पदंश झाल्याने अपघाती मृत्यु झाला. मयताच्या नांवे मौजे उमरी ता.मुखेड येथे गट नं.3 मध्ये 3.93 हेक्टर एवढी शेत जमीन आहे. सदरील अपघाताबाबत ग्राम पंचायतचे मृत्यु प्रमाणपत्र,तलाठयाचे प्रमाणपत्र, वैद्यकिय प्रमाणपत्र,7/12, तहसिल कार्यालय मुखेड यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम दि.08/02/2008 रोजी दाखल केलेले आहेत. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने मयत विठाबाई यांचा विमा काढला होता, सदरील विमा पॉलिसीचा कालावधी 15/08/2007 ते 14/08/2008 असा होता. विमा योजने अंतर्गत मयत विठाबाई पाटील हे लाभार्थी आहेत. गैरअर्जदार क्र. 2 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-यांच्या हक्कात दिला. अर्जदाराची पत्नी ही शेतकरी होती व तीचे प्रिमीअम महाराष्ट्र शासनाने भरलेले आहे व ती लाभार्थी आहे. सदरील घटना ही पॉलिसीच्या कालावधीत घडलेली आहे. अर्जदाराची पत्नी ही व्यवसायाने शेतकरी होती तीच्या नांवे मौजे उमरी ता.मुखेड जि.नांदेड येथे गट नं.3 मध्ये 3.93 हेक्टर एवढी जमीन आहे अर्जदाराची पत्नी ही त्या जमीनीची मालक व ताबेदार होती. अर्जदाराने 7/12 चा उतारा, तलाठयाचे प्रमाणपत्र,वैद्यकिय प्रमाणपत्र,धारणा नोंद वही, ग्रामपंचायतीचे मृत्यु प्रमाणपत्र, दाखल केला आहे. अर्जदाराने विमा क्लेम तहसिलदार यांचेकडे दि.08/02/2008 रोजी त्यानंतर तहसीलदार मुखेड यांनी अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार यांचेकडे पाठवुन दिला. त्यानंतर विमा कंपनीने विम्याची रक्कम अदा केली नाही त्यामुळे अर्जदाराने दि.16/10/2009 रोजी वकीला मार्फत रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला नोटीस पाठविली सदरील नोटीस त्यांना मिळुनही त्यांनी विमा रक्कम आजपर्यंत अर्जदारास दिले नाही. म्हणुन अर्जदारास न्यायमंचासमोर तक्रार दाखल करावी लागली.सदरील विमा योजनेत साप चावुन मरणे हा अपघात या व्याख्येत मोडतो. त्यामुळे अर्जदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. प्रस्तुत प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असुन ती फेटाळण्यात यावी. अर्जदार यांनी वारस प्रमाणपत्र दाखल केलेले नाही तसेच अर्जदार संबंधीत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. गट नं.3 मौजे उमरी याबद्यल कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार शेतकरी असल्याबद्यल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 चा ग्राहक नाही व त्यांनी कोणतीही सेवा अर्जदारास दिली नाही. त्यांनी तहसिल मुखेड येथे दावा दाखल केला ही बाब मान्य नाही. अर्जदार ही साप चावुन मेली ही गोष्ट त्यांना मान्य नाही. अर्जदाराची तक्रार ही दि.07/12/2009 रोजी दाखल झाल्यामुळे ती लिमीटेशनमध्ये नाही. म्हणुन ती फेटाळण्यात यावी. अर्जदार यांनी एफ.आय.आर.,खबरी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा दाखल केलेला नाही. मयत विठाबाई ही साप चावुन मेली याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदरचा दावा हा या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही, मुंबई कार्टाला त्यांचे अधिकार आहेत. त्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र, तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 मयत विठाबाई पाटील याचा मृत्यु दि.19/10/2007 सर्पदंश झाल्याने अपघाती मृत्यु झाला. याबद्यलचा पुरावा म्हणुन पुरावा म्हणुन वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. यात वैद्यकिय अधिकारी यांचे मते सर्प दंशावर प्रथमोपचरा करुन पुढील उपचारासाठी पाठविले, असे म्हटले आहे. अर्जदाराचे नांवे जमीन असल्याबद्यल 7/12 व तलाठी यांनी प्रमाणपत्र दिले आहे. गैरअर्जदार यांना मयत विठाबाई यांचा विमा प्रस्ताव मिळाला असुन सुध्दा त्यांनी अर्जदारास विमा क्लेमची रक्कम न दिल्यामुळे अर्जदार यांनी दि.16/10/2009 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार यांना विमा दाव्या बाबत कायदेशिर नोटीस पाठविलेली आहे. तहसिलदार यांनी गैरअर्जदार यांना एक वर्षात कळविले आहे. म्हणुन सदरील प्रकरण लिमिटेशन मध्ये आहे. अर्जदार यांनी सतत पाठपुरावा करत राहीला. म्हणुन सदरील प्रकरण लिमीटेशनचा प्रश्न येणार नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्यांना शासनाच्या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्यानंतर ते दुःखात असतात. त्यामुळे ताबडतोब क्लेम दाखल करणे शक्य नसते. म्हणुन अशा प्रकारचा उशिर झाला असल्यास शासनाच्या परिपत्रका प्रमाणे क्लेम वेळेत दाखल करणे आवश्यक असले तरी हे बंधनकारक नाही त्यामुळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्नीकल कारणांसाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्पष्ट म्हटले आहे. शेतक-याचा मृत्यु अपघाती झाला हे स्पष्ट आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहीजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. विम्याची रक्कम ही मयताच्या पत्नीस मिळाली पाहीजे, त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते. गैरअर्जदारयांना प्रपोजल तहसिलदार यांनी पाठविले आहे. प्रपोजल मिळुनही गैरअर्जदार यांनी निर्णय घेतला नाही. यात विमा क्लेम देण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. या कागदपत्राचे आधारावर विम्याची रक्कम देता येईल. विमा रक्कमेवर व्याज लावणे व मानसिक त्रास दयावयास सांगणे हे कायदयाचे दृष्टीने योग्य होईल. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजुर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रित रित्या किंवा संयुक्तीक रित्या अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- एक महिन्याच्या आंत द्यावी. सदरील रक्कमेवर क्लेम पाठविल्याची तारीख 08/02/2008 पासुन 9 टक्के व्याज दराने एक महिन्याचे आंत द्यावे. तसे न केल्यास पुर्ण रक्कम फिटेपर्यत 12 टक्के व्याज द्यावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा पोटी रु.2,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |