निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार शिवाजी पि. नागनाथ सूरनर हा अॅटो क्र. एम.एच.26/जी-4209 चा मालक व चालक आहे. अर्जदाराने त्याच्या अॅटोचा विमा गैरअर्जदार 2 यांच्याकडे काढलेला होता. सदर विमा पॉलिसीचा क्र. 1708782339001871 असा असून तिचा कालावधी दिनांक 25/08/2008 ते 24/08/2009 असा आहे. दिनांक 12/06/2009 रोजी अर्जदार हा अॅटो चालवित असतांना सांगवी गावातील नवीन पुलाजवळ त्याच्या अॅटोला पाठीमागून येणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अॅटो पल्टी झाला व त्या अपघतात अर्जदाराच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली. पायाचे हाड फॅक्चर झाले. अर्जदारास सरकारी दवाखाना नांदेड येथे शरीक केले. त्यानंतर अर्जदाराने डॉ. कवटेकर व डॉ. तुंगेनवार यांच्या दवाखान्यात उपचार घेतले. अर्जदाराच्या पायास गंभीर मार लागल्यामुळे अर्जदारास कायमचे पूर्ण अपंगत्व आले. वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय यांनी तपासून 56 टक्के कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. अर्जदार हा विमा पॉलिसी क्र. 1708782339001871 च्या अटी व शर्तीप्रमाणे गैरअर्जदार यांच्याकडून 1,00,000/- रुपये मिळण्यास पात्र आहे. अर्जदाराने दिनांक 27/10/2010 रोजी गैरअर्जदाराकडे लेखी अर्ज करुन अपघाताच्या नुकसान भरपाईची मागणी केली परंतू गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मागणीचा विचार करीत आहेत अशी कारणे सांगून परत पाठवले. दिनांक 04/01/2013 रोजी अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली परंतू गैरअर्जदार यांनी आजपर्यंत नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासह अपघाताच्या तारखेपसून रक्कम अदा होईपर्यंत देण्याचा आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती तक्रारीद्वारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
4. अर्जदार हा अॅटो क्र. एम.एच.26/जी-4209 यांचा चालक व मालक होता हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतू सदरचा अॅटो हा व्यापारी तत्वावर चालवत होता. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून सदर अॅटोची विमा पॉलिसी काढलेली होती तिचा पॉलिसी क्र. 1708782339001871 व कालावधी दिनांक 25/08/2008 ते 24/08/2009 असा होता हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदर पॉलिसी ही Passenger Carrying Vehicle Package Policy होती. अर्जदारास सरकारी रुग्णालय नांदेड येथे शरीक केले व नंतर अर्जदारास डॉ. कवटेकर व डॉ. तुंगेनवार यांच्याकडे उपचार घेतला, हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे तसेच अर्जदाराने दाखल केलेले 56 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील खोटे आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार हे अर्जदारास 1,00,000/- देण्यासाठी जबाबदार आहेत हे म्हणणे देखील खोटे आहे. अपघाताचे वेळी अॅटो क्र. एम.एच.26/जी-4209 च्या चालकाकडे व्हॅलीड व इफेक्टीव्ह ड्राव्हींग लायसन्स नव्हते आणि तो सदर अॅटो चालविण्यास पात्र नव्हता. अर्जदाराने जे स्वतःचे ड्राव्हींग लायसन्स दाखल केलेले आहे त्यावरुन तो LMV (NT) लाईट मोटार व्हेईकल चालविण्यास पात्र आहे. म्हणजेच तो पॅसेंजर वाहून नेणारे वाहन चालविण्यास पात्र नव्हता. प्रस्तुत प्रकरणातील अपघात हा दिनांक 12/06/2009 रोजी झालेला आहे. अर्जदाराने त्यानंतर 2 वर्षाच्या काळात तक्रार दाखल करावयास पाहिजे होती परंतू अर्जदाराने वर्ष 2013 मध्ये तकार दाखल केलेली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार ही मुदतीत नाही त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम फॉर्म भरुन दिलेला नाही आणि त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास कुठल्याही प्रकारच्या सेवेत त्रुटी दिलेली नाही व अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व असल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार शिवाजी नागनाथ सुरनर हा अॅटो क्र. एमएच-26/जी-4209 चा मालक होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या आर. सी. बुकाच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे सदर अॅटोचा विमा काढलेला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या विमा प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता लिमीट्स ऑफ लायबिलीटी या सदरात P A Covr to owner driver 2,00,000/- रुपये एवढी दर्शविलेली आहे. अर्जदाराच्या अॅटोला दिनांक 12/06/2009 रोजी अपघात झाला हे अर्जदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर, घटना स्थळ पंचनामा ई. च्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट आहे. तसेच सदर अपघातात शिवाजी सुरनर हा गंभीर जखमी झाला होता हे देखील स्पष्ट आहे. सदर अपघातात अर्जदारास 56 टक्के अपंगत्व आले हे अर्जदाराने दाखल केलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या मुळ प्रतीवरुन स्पष्ट आहे. अर्जदाराने दिनांक 27/11/2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम दाखल करण्यासाठीचा अर्ज दिला होता, हे अर्जदाराने दिनांक 27/11/2010 रोजीच्या पत्राच्या दाखल केलेल्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदारास अर्जदाराचा सदरचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदाराने काहीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही हे स्पष्ट आहे.
7. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या म्हणण्यात गैरअर्जदार यांनी असा आक्षेप घेतलेला आहे की, अर्जदाराने मुदतीत तक्रार दाखल केलेली नाही. सदरचे कथन योग्य नाही असे दिसते कारण गैरअर्जदाराने दिनांक 07/11/2010 चे अर्जदाराचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर काहीही केलेले नाही. अर्जदारास अपंगत्व प्रमाणपत्र हे दिनांक 28/07/2010 रोजी प्राप्त झालेला आहे. त्यानंतर अर्जदाराने दिनांक 27/11/2010 रोजी गैरअर्जदाराकडे दावा दाखल करणेसंबंधी अर्ज केलेला आहे. सदर अर्जावर गैरअर्जदारांनी काहीही केलेले नाही व प्रकरण प्रलंबित ठेवलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणणेत असेही कथन केले आहे की, अर्जदाराकडे Non Transport या प्रकारच ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही. गैरअर्जदार यांचे सदरचे कथन मान्य करता येत नाही कारण अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सचे अवलोकन केले असता पंचनाम्यात स्पष्ट लिहिलेले आहे की, अॅटोस पाठीमागून अज्ञात वाहनाची घडक लागून अपघात झाला. त्यामुळे अर्जदारास 56 टक्के अपंगत्व आलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराची 2,00,000/- रुपयाची विमा जाबाबदारी स्विकारलेली आहे म्हणून अर्जदार हा रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम रु. 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.