निकालपत्र
( दिनांक 23-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार सय्यद अन्वर पि. सय्यद जानी हे वाजेगांव ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून मोटार सायकल क्र. एमएच-26/एजी 3984 चा मालक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून सदर मोटार सायकलचा विमा काढलेला होता. त्याचा क्र. 1712422312000877 असा आहे व त्याचा कालावधी दिनांक 5.6.2012 ते 4.6.2013 असा होता. सदर विमा पॉलिसीमध्ये ओनर ड्रायव्हरच्या विम्याची जोखीम देखील होती. दिनांक 14.11.2012 रोजी अर्जदारास सदर गाडी चालवतांना अपघात होवून तो जबर जखमी झाला. अर्जदाराने दिनांक 14.11.2012 ते 16.11.2012 पर्यंत ‘साई अॅक्सीडंट हॉस्पीटल, नांदेड’ येथे उपचार घेतला. अर्जदारास Facture of tibia condyle and L3 tnibia and Facture of Bnse of 1st MC Bone अशा जखमा झालेल्या आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन अर्जदारावर ईलाज केला. सदर अपघातात झालेल्या जखमेमुळे अर्जदारास कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे अर्जदारास आलेल्या अपंगत्वाबद्दल, दवाखान्याच्या झालेल्या खर्चाबद्दल पॉलिसीतील नियमाप्रमाणे गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहे. अर्जदार विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली परंतू पोकळ आश्वासनाशिवाय अर्जदारास आजपर्यंत गैरअर्जदार यांच्याकडून काहीही मिळालेले नाही म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करावा व अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 1,00,000/- गैरअर्जदार यांच्याकडून मिळण्याबाबत आदेशीत करावे तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- गैरअर्जदार यांनी देण्याबाबत आदेश करावा.
2. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर मंचात हजर होवून त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. दिनांक 24.2.2015 रोजी गैरअर्जदाराने नो-सेचा आदेश रद्द करण्याचा अर्ज दिला. परंतू मंचाने पारीत केलेला आदेश रद्द करण्याचा अधिकार मंचास नसल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला. दिनांक 28.4.2014 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला. त्यांच्या लेखी युक्तीवादात त्यांनी हे मान्य केलेले आहे की, त्यांनी अर्जदारास पॉलिसी क्र. 1712422312000877 ही दिनांक 5.6.2012 ते 4.6.2013 या कालावधीसाठी मोटार सायकल क्र. एमएच-26/एजी 3984 साठी दिलेली होती आणि सदर पॉलिसीमध्ये ‘ओनर ड्रायव्हरच्या’ विम्याची जोखीम देखील अंतर्भत होती परंतू त्यात जखमेबद्दलची जोखीम अंतर्भूत नव्हती. अर्जदाराने त्याला कायमचे अपंगत्व आल्याबद्दलचा कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे कुठलाही विमा दावा दाखल केलेला नसल्यामुळे गैरअर्जदार हे त्यावर निर्णय घेवू शकलेले नाहीत. गैरअर्जदार यांनी IMT 15 नुसार खालीलप्रमाणे जोखीम स्विकारलेली आहे.
Sr. No. Details of Injury Scale of Compensation.
(I) Death 100 %
(II) Loss of two limbs or sight of two eyes 100 %
Or one limb and sight of one eye.
(III) Loss of one limbs or sight of one eyes 50 %
(IV) Permanent total disablement from injuries 100%
Other than named above.
अर्जदाराने दाखल केलेली उपचाराची कागदपत्रे पाहिली असता अर्जदारास वरील प्रकारचे कुठलेही कायमचे अपंगत्व आलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास कुठलीही नुकसान भरपाई देणे लागत नाहीत.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार सय्यद अन्वर पि. सय्यद जानी हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदाराने दाखल केलेल्या पॉलिसी शेडयुल वरुन स्पष्ट आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर पॉलिसीत Compulsory PA covers for owner-driver CSI 1,00,000/- असे नमूद आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदाराची रु.1,00,000/- ची जोखीम गैरअर्जदाराने घेतलेली आहे. गैरअर्जदारास हे मान्य आहे की, त्यांनी अर्जदारास पॉलिसी क्र. 1712422312000877 ही दिलेली होती. त्यात PA covers for owner-driver आहे व गैरअर्जदार यांची जबाबदारी IMT 15 नुसार खालील दिलेल्या प्रमाणे आहे.
Sr. No. Details of Injury Scale of Compensation.
(I) Death 100 %
(II) Loss of two limbs or sight of two eyes 100 %
Or one limb and sight of one eye.
(III) Loss of one limbs or sight of one eyes 50 %
(IV) Permanent total disablement from injuries 100%
Other than named above.
वरील प्रमाणे अर्जदारास कोणतीही जखम अथवा अपंगत्व आलेले नसल्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाहीत. गैरअर्जदार यांचे असेही म्हणणे आहे की, अर्जदाराने त्यांच्याकडे विमा दावा दाखलच केलेला नाही व त्यामुळे अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासहीत विमा दावा आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दाखल करावा व गैरअर्जदार यांच्याकडे दावा दाखल झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्यावर 30 दिवसांच्या आत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.