जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 350/2010. तक्रार दाखल दिनांक: 14/06/2010. तक्रार आदेश दिनांक : 19/10/2010. श्री. संजय शिवलिंग क्षीरसागर, वय 38 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, पुष्पम प्लाझा, ग्राऊंड फ्लोअर, 135 ब, ताडीवाला रोड, पुणे - 411 001. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., एच.डी.एफ.सी. बँकेच्या वर, लकी चौक, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : राजेंद्र एम. कोनापुरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या म्हशीचा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.16,000/- रकमेचा विमा उतरविलेला आहे. विमा पॉलिसी क्रमांक 1702-06-3012-000001/2762 व टॅग क्रमांक 15576 असा आहे. तक्रारदार यांची म्हैस आजारी पडली आणि उपचारादरम्यान दि.16/3/2008 रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर म्हशीचे पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. परंतु विमा कंपनीने त्यांना क्लेमचा निर्णय कळविला नाही किंवा विमा रक्कम दिलेली नाही आणि विमा कंपनीने क्लेम प्रलंबीत ठेवला आहे. त्यानंतर विमा कंपनीने त्यांचा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.16,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, म्हशीचा मृत्यू दि.16/3/2008 रोजी झालेला आहे आणि विमेदाराने त्याची माहिती 24 तासाचे आत दिलेली नाही किंवा 14 दिवसाचे आत कागदपत्रे दाखल केली नाहीत. पॉलिसी अट क्र.6 गाईच्या मृत्यूबाबत 24 तासाचे आत कळविणे व 14 दिवसाचे आत सर्व कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीच्या अटीचा भंग केला आहे आणि विमा रक्कम देण्यास ते जबाबदार नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या म्हशीचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याचे व विमा कालावधीमध्ये म्हैस मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. म्हशीचा विमा क्लेम पॉलिसीच्या अट क्र.3 नुसार 'नो टॅग नो क्लेम' तत्वानुसार नामंजूर केल्याचे विमा कंपनीच्या दि.17 सप्टेंबर, 2008 च्या पत्रावरुन निदर्शनास येते. 5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, क्लेम फॉर्म, पोस्टमार्टेम रिपोर्ट, वेटर्नरी सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या सर्व कागदपत्रांतील म्हशीचे वर्णन हे विमा पॉलिसीतील वर्णनाशी मिळतेजुळते आहे. जनावराच्या कानात बसविण्यात येणारा टॅग हा जनावराची ओळख पटविण्यासाठी असतो. यदाकदाचित टॅग तुटलेल्या अवस्थेत असेल किंवा दाखल केला नसला तरी संबंधीत जनावराचे पॉलिसीतील वर्णन हे पोस्टमार्टेम रिपोर्ट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट व इतर अनुषंगिक कागदपत्रात नमूद वर्णनाशी मिळतेजुळते असल्यास 'नो टॅग नो क्लेम' या तत्वानुसार क्लेम नाकारणे उचित ठरु शकत नाही. तसेच विमा संरक्षीत म्हैस मृत्यू पावलेली नाही, असेही विमा कंपनीचे म्हणणे नाही आणि किंबहुना तसे सिध्द करण्याचा कोणतही प्रयत्न त्यांनी केलेला नाही. 6. अशा परिस्थितीत, तक्रारदार यांचा विमा क्लेम अनुचित व तथ्यहीन कारणास्तव नाकारुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार विमा रक्कम रु.16,000/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.16,000/- दि.17/9/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त नमूद रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास तेथून पुढे विरुध्द पक्ष यांनी द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज द्यावे. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/161010)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |