जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 361/2010. तक्रार दाखल दिनांक: 15/06/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011. श्री. सुभाष लक्ष्मण घोरपडे, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती व दुग्धव्यवसाय, रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., सन प्लाझा, दुसरा मजला, 8516/11, मुरारजी पेठ, शिवपार्वती हॉटेलसमोर, सुभाष चौक, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एम.यू. जहागिरदार विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एम. कोनापुरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते शेतीसह दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्या जर्शी गाईचा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे दि.27/3/2007 ते 26/3/2010 कालावधीसाठी रु.30,000/- चा विमा उतरविण्यात आलेला आहे. त्यांच्या गाईच्या कानामध्ये बिल्ला क्र.44405 बसविण्यात आला. त्यांच्या गाईचा सदर बिल्ला पडल्यामुळे त्याबाबत विमा कंपनीस कळविले असता रि-टॅगींग करण्यास कळविले, परंतु प्रत्यक्षात त्यांना टॅग दिला नाही. दि.6/2/2010 रोजी त्यांची गाय मृत्यू पावली आणि त्याबाबत पोस्टमार्टेम करुन विमा क्लेम सादर केला असता तो विमा कंपनीने नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.30,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची गाय दि.6/2/2010 रोजी मृत्यू पावली असून पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे त्यांनी 24 तासाचे आत कळविले नाही आणि 14 दिवसाचे आत आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. तसेच अट क्र.3 प्रमाणे गाईच्या कानातील टॅग जमा न केल्यास ‘नो टॅग नो क्लेम’ तत्वानुसार क्लेम देय होत नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याचे व विमा कालावधीमध्ये गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. तसेच गाईच्या मृत्यूनंतर दाखल केलेला विमा क्लेम विमा कंपनीने नामंजूर केल्याविषयी विवाद नाही. 5. विमा कंपनीने प्रामुख्याने पॉलिसी अट क्र.3 चा आधार घेत 'नो टॅग नो क्लेम' तत्वानुसार विमा दावा नामंजूर करण्यात येत असल्याचे नमूद आहे. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी त्यांच्या गाईच्या कानातील टॅग हरविल्याचे विमा कंपनीस कळविल्यानंतर रि-टॅगींग करण्याबाबत झालेला पत्रव्यवहार रेकॉर्डवर दाखल आहे. परंतु त्यानंतर नवीन टॅग बसविण्याची कार्यवाही झाली काय ? किंवा कसे ? हे विमा कंपनीने स्पष्ट केलेले नाही. वास्तविक पाहता, जनावराची ओळख पटविण्यासाठी संबंधीत जनावराच्या कानामध्ये टॅग बसविण्यात येतो. गाईच्या कानातील टॅग हरविल्यानंतर नवीन टॅग बसविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेणे विमा कंपनीवर बंधनकारक होते आणि सदरचे कर्तव्य त्यांनी पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास येते. 6. तसेच वरिष्ठ आयोगाच्या निर्णयांनुसार क्लेमची माहिती वेळेमध्ये न दिल्यास ते क्लेम नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, तक्रारदार यांचा विमा क्लेम अनुचित व तथ्यहीन कारणास्तव नाकारुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार विमा रक्कम रु.30,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- दि.15/6/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त नमूद रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास तेथून पुढे विरुध्द पक्ष यांनी द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज द्यावे. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/18411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |