जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 192/2011 तक्रार दाखल तारीख –04/01/2012
रंजना भ्र. सुर्यभान उर्फ सुरेश गोल्हार
वय 32 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.कापसी ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई
समन्स बजावणीचा पत्ता ः- 570, रेक्टीफायर हाऊस नायगांव, क्रॉस रोड,वडाळा (पश्चिम) मुंबई सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
शॉप नं.2,दिशा अलंकार कॉम्प्लेक्स,
टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद.
3. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, जळगांव ता.आष्टी,जि. बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डि.जी.भगत
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी सामनेवाला क्र.2 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
(घोषित द्वारा ः- अजय भोसरेकर,सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या मयत पतीचा अपघात दि.05.07.2008 रोजी झाला असून त्यांच्या घटनेची फिर्याद धोंडीराम माणिक रहाडे यांनी आष्टी पोलिस स्टेशन येथे दिली. त्यानुसार तक्रारदाराच्या मयत पतीचा पंचनामा,शवविच्छेदन इत्यादी करुन तक्रारदाराच्या मयत पतीचा मृतदेह अत्यंसस्कांरासाठी तक्रारदारास सोपविण्यात आला. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्या क्लेम फॉर्मच्या तरतूदीनुसार सर्व कागदपत्राची पुर्तता करुन सामनेवाला क्र.3 यांचेकडे दाखल केला.तक्रारदार हा सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे वांरवार चौकशी करीत राहीला. त्यांस त्यांनी उत्तर दिले नाही म्हणून तक्रारदाराने माहिती अधिकारी 2005 चा वापर करुन आपल्या मयत पतीचे शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम मिळण्या संदर्भात दि.21.11.2011 रोजी मागणी केली. त्यांसही त्यांचे उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- त्यावर द.सा.द.शे 18 टक्के व्याज, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण 9 कागदपत्र दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.15.03.2012 रोजी दाखल केले असून, सामनेवाला यांनी काढलेल्या त्रुटीचे पत्र दि.04.04.2009 ची पुर्तता दि.14.08.2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेकडे केल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात त्यांनी तक्रारदाराच्या मयत पतीचा विमा दावा दि.19.09.2008 रोजी मिळाला असून तो दि.21.06.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे अपुर्ण असा शे-यासह पाठविला असून तो सामनेवाला क्र.1 यांनी दि.24.11.2010 रोजी अपुर्ण विमा प्रस्ताव म्हणून बंद केला असल्याचे पत्र दिले आहे असे म्हटले आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.15.03.2012 रोजी दाखल केले असून त्यात त्यांनी तक्रारदाराचा विमा दावा हा पॉलिसी कालावधीच्या 90 दिवसांनंतर प्राप्त झाला असल्यामुळे व तक्रारदाराने विमा प्रस्तावातील अपूर्ण कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे तो न देऊन आम्ही कोणतीही सेवेत त्रुटी केली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पृष्टयर्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता,
तक्रारदारांने सामनेवाले यांचे नियमाप्रमाणे सर्व कागदपत्राची पुर्तता सामनेवाला क्र.3 यांचेकडे केलेली आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी काढलेल्या त्रुटीची पुर्तता सामनेवाला क्र.3 यांनी केल्याचे निदर्शनास आणुन दिले आहे. याबाबत सामनेवाला क्र.1 यांचा कोणताही आक्षेप नाही. म्हणजेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचा शेतकरी वैयक्तीक अपघात विमा रक्कम मुदतीत न देऊन सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते.
त्यामुळे तक्रारदारास मयत पतीच्या शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
सुर्यभान ऊर्फ सुरेश विठठल गोल्हार यांचे शेतकरी वैयक्तीक
अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त)
आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.04.01.2012 पासून देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.3,000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड