अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपीडीएफ/373/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 09/02/2007
तक्रार निकाल दिनांक : 30/12/2011
श्री. मनोज ओव्हाळ, ..)
राहणार :- सुदाम कृपा, पंचशिलनगर, पिंपळे निलख,..)
औंध छावणी, पुणे – 27. ..)... तक्रारदार
विरुध्द
1. रिलायन्स वेबस्टोअर मर्यादित, ..)
रिलायन्स वर्ल्ड स्वोजस इमारत तळमजला, ..)
गट क्रमांक 19/20 बी 1 व बी 2, ..)
परिहार चौक, औंध, पुणे – 411 007. ..)
2. रिलायन्स कम्युनिकेशन्स मर्यादित, ..)
4 था मजला, गोदरेज मिलेनियम इमारत, ..)
9, कोरेगाव पार्क रस्ता, पुणे – 411 001. ..)... जाबदार
************************************************************************
तक्रारदारांतर्फे : स्वत:
जाबदार : एकतर्फा
************************************************************************
द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत
// निकालपत्र //
(1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2007 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/36/2007 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/373/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
(2) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार कंपनीने आपला भ्रमणध्वनी सुरु करुन दिला नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,
(3) तक्रारदार श्री. मनोहर ओव्हाळ हे एक स्वयंसेवी संस्थेचे सभासद असू या संस्थेच्या कामकाजासाठी त्यांनी रिलायन्स कंपनीचा भ्रमणध्वनी विकत घेतला होता. या भ्रमणध्वनीची सेवा जाबदार क्र. 2 रिलायन्स कम्यूनिकेशनमार्फत पुरविली जाते. काही कालावधीनंतर तक्रारदारांचा भ्रमणध्वनी बिघडल्यामुळे त्यांनी जाबदार क्र. 1 यांचेकडून दि.5/1/2007 रोजी नवीन भ्रमणध्वनी विकत घेतला. या भ्रमणध्वनीचा क्रमांक सुरु करण्याकरिता तक्रारदारांनी जाबदारांना विनंती केली. मात्र तक्रारदारांचा भ्रमणध्वनी सुरु करण्यात आला नाही. यानंतर तक्रारदारांनी जाबदारांशी वैयक्तिकरित्या, प्रतिनिधीमार्फत, फोनवरती व पत्राद्वारे वारंवार संपर्क साधला व भ्रमणध्वनी सुरु करुन देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आपल्या विनंतीप्रमाणे आपला भ्रमणध्वनी सुरु करुन दिला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदार ग्राहक संघटनेचे कार्यकर्ते असून जाबदारांच्या सदोष सेवेमुळे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अडथळा झाला याचा विचार करता जाबदारांना आपल्या भ्रमणध्वनीची सेवा सुरु करुन देण्याबरोबरच आपल्याला प्रतिदिन रु.5,000/- याप्रमाणे नुकसानभरपाई देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र तसेच भ्रमणध्वनी विकत घेतल्याची पावती व जाबदारांना पाठविलेली पत्रे मंचापुढे हजर केली आहेत.
(4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांवरती नोटीस बजावल्याची पोहोचपावती निशाणी 14 व 15 अन्वये दाखल होऊनसुध्दा त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर करण्यात आला. यानंतर जाबदारांतर्फे वकील हजर झाले. त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाल्याची वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणण्यात आली. तडजोडीसाठी म्हणून हे प्रकरण लोकअदालतीमध्ये नेमण्यात आले. मात्र तडजोडीसाठी जाबदारांचे अधिकृत प्रतिनिधी हजर न राहिल्याने यामध्ये तडजोड होऊ शकली नाही. यानंतर नेमलेल्या तारखेला जाबदार गैरहजर राहिल्याने तसेच एकतर्फा आदेश रद्द करुन घेण्याबाबत त्यांनी तजवीज न केल्याने तक्रारदारांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(5) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यांनी जाबदार क्र. 1 रिलायन्स वेबस्टोअरमधून भ्रमणध्वनी विकत घेतला होता ही बाब सिध्द होते. हा भ्रमणध्वनी सुरु न झाल्यामुळे दि. 15/1/2007 व दि. 20/1/2007 रोजी तक्रारदारांनी जाबदारांना लेखी पत्र पाठविल्याचे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. तक्रारदारांनी जाबदारांना पाठविलेल्या व मंचापुढे तक्रारदारांनी जाबदारांना निशाणी 4 अन्वये दाखल असलेल्या पत्रावर आपण ही सेवा लवकरात लवकर सुरु करुन देऊ असे लेखी आश्वासन जाबदारांनी दिलेले आढळते. मात्र जाबदारांनी ही सेवा सुरु करुन दिलेली नाही हे तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत शपथेवर केलेले निवेदन जाबदारांनी हजर होऊन नाकारलेले नाही. सबब याअनुषंगे त्यांचेविरुध्द प्रतिकुल निष्कर्ष निघतो. अशाप्रकारे भ्रमणध्वनीची विक्री केल्यानंतर त्याची सेवा सुरु न करण्याची जाबदारांची कृती त्यांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांनी विनंती केल्याप्रमाणे ही सेवा सुरु करुन देण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. अशाप्रकारे वारंवार प्रयत्न करुनसुध्दा जाबदारांनी भ्रमणध्वनी सुरु न केल्यामुळे तक्रारदारांना जो त्रास झाला व शेवटी हा तक्रार अर्ज दाखल करावा लागला याचा विचार करता तक्रारदार शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरतात असा मंचाचा निष्कर्ष आहे. मात्र यासाठी तक्रारदारांनी प्रतिदिन रु.5,000/- याप्रमाणे मागितलेल्या नुकसानभरपाईला पुराव्याचा आधार नसल्याने तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व सदरहू तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मंजूर करण्यात येत आहेत.
वर नमुद सर्व निष्कर्षांच्या आधारे पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहेत.
1.
2. यातील जाबदारांनी तक्रारदारांच्या भ्रमणध्वनीची सेवा त्वरित सुरु करुन द्दावी.
3. यातील जाबदारांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु.10,000/- व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- मात्र अदा करावेत.
3.
4.वर नमूद आदेशांची अंमलबजावणी
जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तीस
दिवसांचे आत अदा न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण
दाखल करु शकतील.
5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 30/12/2011