तक्रारदार ः- स्वतः.
सामनेवाले ः- एकतर्फा
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 28/11/2017 रोजी घोषीत )
1. तक्रारदार यांनी घेतलेल्या वाशींग मशीनबाबत निर्माण झालेल्या वादाकरीता ही तक्रार दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली तक्रारदारानी त्याबाबत पोस्टाची पावती व ट्रॅक रिपोर्ट सादर केली. त्यानूसार सामनेवाले यांना मंचाची नोटीस दि. 29/12/2016 ला प्राप्त झाली आहे. सामनेवाले हे मंचात उपस्थित न झाल्यामूळे त्यांच्याविरूध्द दि. 23/02/2017 ला एकतर्फा चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला.
2. तक्रारदारानूसार ते जेष्ठ नागरीक आहेत व त्यांनी सामनेवाले यांचेकडून वाशींगमशीन विकत घेतली होती व अतिरीक्त रक्कम अदा करून 2 वर्षाची जादा वारंटी प्राप्त केली होती. परंतू, तिस-या वर्षी मशीनमध्ये दोष निर्माण झाला. प्रतिनीधीनी निरीक्षण केल्यानंतर तक्रारदारांना सांगीतले की, मशीन दुरूस्त करता येत नाही. तक्रारदारानी तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. तक्रारदारांनी कॅश मेमो डिलीवरीची नोंद पाठविलेले पत्र सादर केले आहे. या पत्रावरून असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी रू. 1,930/-,भरल्यानंतर त्यांना 2 वर्षाची जादा वारंटी देण्यात आली होती. तक्रारदारानी वाशींगमशीन करीता रू. 14,290/-,अदा केले. 4 वर्षाची वारंटी असतांना सामनेवाले यांनी तिस-याच वर्षी (दि. 08/08/2016) ला मशीनची दुरूस्ती न करता येण्याबाबत कळविले. ही बाब तक्रारदार यांचे दि. 08/08/2016 च्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे. सामनेवाले यांनी तशा प्रकारच्या मशीनचे उत्पादन करणे बंद केले असे सांगण्यात आले व तक्रारदाराना नविन मशीन घेण्याबाबत सूचविण्यात आले.
3. ज्याअर्थी वाशींगमशीन ही वारंटी पिरीअडमध्ये होती त्याअर्थी ही सामनेवाले यांची जबाबदारी ठरते व त्यांनी आवश्यक ती दुरूस्ती करावी. सामनेवाले यांनी जर तशा प्रकारच्या मशीनचे उत्पादन बंद केले असेल तर त्यामध्ये तक्रारदार यांचा काहीही दोष नाही. कंपनीकडे त्यांनी शेवटी मशीन केव्हा विकली याबाबत नोंद असणे क्रमःप्राप्त आहे व त्यांनी तेव्हा पासून वारंटी पिरिअडमध्ये सेवा देता येऊ शकेल. याबाबत व्यवस्था करून ठेवणे आवश्यक आहे. सामनेवाले यांनी तशी कोणतीही व्यवस्था करून ठेवल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ते सेवा देण्यात कसुरवार ठरतात. शिवाय, सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून 4 वर्षाकरीता पैसे घेतले होते. परंतू, त्यांनी चवथ्या वर्षाच्या वारंटीकरीता कोणतीच सेवा दिली नाही. त्यामुळे चवथ्या वर्षाकरीता ती वारंटी दाखल रक्कम घेण्याचे अधिकार त्यांना प्राप्त होत नाही. तक्रारदारांना नुकसान भरपाई देतांना ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. तक्रारदारानी ती मशीन 2 वर्ष वापरली. त्यामुळे 2 वर्षाकरीता घसारा विचारात घेऊन मशीनचे मुल्य ठरविणे आवश्यक आहे.
4. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र सादर केलेले आहे. त्यांचा पुरावा अबाधीत आहे. तो अस्विकार किंवा अमान्य करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. सबब, खालील आदेश.
5. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
6. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 445/2016 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात, कसुर केला व अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मशीन दुरूस्त न केल्याबाबत त्या मशीनचे मुल्य रू.11,175/-(रूपये अकरा हजार एकशे पच्यांहत्तर) अदा करावे.
4. सामनेवाले यांनी चवथ्या वर्षाकरीता वारंटीकरीता घेतलेली रक्कम रू. 965/-,(नऊशे पासष्ठ) तक्रारदार यांना परत करावे.
5. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासासाठी रू. 4,000/-(चार हजार) व तक्रारीचा खर्च रू. 3,000/-,(तीन हजार) अदा करावे.
6. सामनेवाले यांनी उपरोक्त क्लॉज प्रमाणे देय रक्कम तक्रारदाराना दि. 31/12/2017 पर्यंत अदा करावी तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/01/2018 पासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे 18 टक्के व्याज लागु राहील.
7. सामनेवाले यांनी आदेशीत रक्कम अदा केल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांचेकडे असलेली जुनी वाशींग मशीन 10 दिवसाचे आत घेऊन जावे.
8. आदेशाची प्रत उभयपपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
9. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
npk/-