::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 06/02/2020)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. वि.प. हे विजउपकरणे उत्पादन करुन विक्री करणारी कंपनी असून त्यांची सदर उपकरणाच्या विक्रीकरीता जीओ स्टोअर्स या नावाने दालने उघडण्यात आले असून त्यापैकी एक चंद्रपूर येथे आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 4/4/2018 रोजी विरुध्द पक्षा कडून रिकनेक्ट नावांचा 1.5 टन इर्न्वटर 3 स्टार स्प्लीट ए.सी.मॉडेल क्रं.एक्सएस-183बी80 अनुक्रमांक एएयु18ए0015536 रु. 30,990.99/- ला खरेदी केला. वि.प यांनी सदर एसीची खरेदी करतेवेळी पाच वर्षाची वॉंरंटी दिली होती. मात्र तक्रारकर्त्यास वॉंरंटी कार्ड भरुन न देता कोरे कार्ड देते वेळी बिल हेच वॉरंटी आहे हे सांगून तक्रारकर्त्यास संगणकीय बिल दिले. सदर एसी खरेदी केल्यानंतर ग्राहकाच्या सुचनेनुसारच एसी लावून देण्याची विरुध्द पक्षांची जबाबदारी असते. तक्रारकर्ता यांनी 4/4/18 रोजी एसी खरेदी केल्यानंतर तब्बल 13 दिवसानंतर म्हणजे दिनांक17/4/18 रोजी वि.प.यांच्या तंत्रज्ञाने तक्रारकर्त्याच्या घरी एसी लावून दिला. सदर एसी दिनांक17/4/18 नंतर सुरु केल्यापासूनच खोली थंड होत नव्हती. त्यामुळे तक्रारकर्त्याने टोल फ्री क्रं.18001031044 या दुरध्वनीवर तक्रार नोंदविली असता वि.प.यांच्या तत्रंज्ञाने तक्रारकर्त्याच्या घरी येऊन एसीची तपासणी केली असता सदर एसी थंड का होत नाही? याकरिता वेगळा तंत्रज्ञ पाठवावा लागेल असे सांगितले.त्यानंतर तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिनांक 20/9/18 व दिनांक 30/9/18 रोजी टोल फ्री क्रमांकावर तक्रार केली असता वि.प.यांचेकडून आलेल्या तंत्रज्ञाला सदर एसी दुरुस्त करता आला नाही. विशेष म्हणजे सदर एसी मधील कॉम्प्रेसर खराब असून बाहय युनिट सुध्दा बंद पडलेले आहे. सदर बाब वि.प.यांचे तंत्रज्ञाने सुध्दा पाहणी केली. सदर एसी आजपर्यंत बंद पडलेला असुन तक्रारकर्त्यांने वि.प.यांच्याकडे टोल फ्री नबंरवर अनुक्रमे दिनांक 1/10/18, दिनांक6/10/18, दिनांक28/10/18 व दिनांक15/11/18 रोजी वेळोवेळी एसी बंद असल्याची तक्रार करुन सुध्दा वि.प.यांनी सदर एसी वॉंरंटी कालावधीत असुन सुध्दा दुरुस्त करुन दिला नाही. सदर एसी मध्ये निर्मातीत दोष असल्याने सुरुवातीपासूनच बंद आहे आणि तक्रारकर्त्यांनी वि.प.यांच्याकडे वारंवारं तक्रार करुन सुध्दा तक्रारीचे निवारण न करुन वि.प. यांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक3/12/18 अधिवक्त्या मार्फत वि.प.यांना सदर एसीच्या दोषाबददल नोटीस पाठविली. सदर नोटीस वि.प.यांनी घेण्यास नकार दिल्याने दिनांक 4/12/18 ला पोस्टमनने तसा शेरा नोंदवून तक्रारकर्त्याच्या वकीलाकडे परत पाठविला. सबब तक्रारकर्त्याने वि.प.यांचे विरुध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये उपरोक्त एसी मध्ये निर्मातीत दोष दुर करुन तक्रारकर्त्यास एसी चालू करुन सुस्थितीत दयावा. तसेच त्याची वाढीव वॉंरंटीसुध्दा वि.प.यांनी तक्रारकर्त्यास दयावी.सदर एसी मधील निर्मातीत दोष दुरुस्त करणे शक्य नसल्यास वि.प.यांनी नविन एसी युनिट तक्रारकर्त्यास दयावा. याशिवाय वि.प.यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 50,000/- व तक्रारखर्च रु. 10,000/- दयावा ही विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन वि.पं.यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. हे हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले असुन त्यामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन विशेष कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक 4/4/18 रोजी वि.प. यांच्या रिटेल आऊटलेट मधून एसी खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. त्यांच्या सागण्यानुसार वि.प. यांच्याकडून एसी खरेदी केला व त्याबाबत वि.प. यांनी संगणकीय टॅक्स इनव्हाईस बिल तक्रारकर्त्यास दिले. वि.प.यांनी सदर एसी नागपूर येथुन दिनांक 5/4/18 रोजी कुरियरद्वारे पाठविला असता दिनांक7/4/18 रोजी तक्रारकर्त्यास मिळाल्याचे व दिनांक9/4/18 रोजी सदर एसी इन्स्टॉलेशन करण्याकरिता तक्रारकर्त्याने वि.प. यांना कळविले त्यामुळे वि.प.यांनी त्यांचे तंत्रज्ञ दिनांक 9/4/18 रोजी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन सदर एसीचे इन्स्टॉलेशन करुन त्याचा डेमो दिला. त्यावेळी एसी चांगला असुन थंडावापण देत होता. परंतु दिनांक 20/9/18 रोजी तक्रारकर्ता यांनी सायकांळी 7 वाजता टोल फ्री क्रमांकावर सदर एसी बरोबर काम करीत नसून थंडावापण देत नाही असे सांगितल्याने त्याच तारखेला रात्री वि.पक्षांचे तंत्रज्ञ सुरज यांनी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन एसीची दुरुस्ती करुन दिली. त्यानंतर तक्रारकर्त्यांने दिनांक 28/10/18 रोजी वि.प.यांना फोन केला असता त्यांच्या तंत्रज्ञाने एसीचे ग्रील साफ करुन सर्व्हिसींग करुन दिले. वि.प.यांचे तंत्रज्ञ यांनी पुन्हा एका महिन्यांनी दिनांक 28/11/18 रोजी तक्रारकर्त्याकडे सदर एसीच्या रुटून चेंकीग करीता गेले असता त्यामध्ये तो चांगल्या स्थितीत कार्यरत होता व त्यामध्ये कोणताही निर्मीती दोष आढळुन आला नाही. परंतु तंत्रज्ञ यांनी तक्रारकर्त्यास विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने स्टॅबीलायजर बसविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तक्रारकर्त्यांने दिनांक 11/1/19 रोजी वि.प.यांना टोल फ्री नबंरवर सदर एसीचा कुलींग सिस्टीम काम करीत नसल्याचे सांगितल्याने वि.प.यांचे तंत्रज्ञानी त्याच दिवशी तक्रारकर्त्याकडे जाऊन एसीची पाहणी केली असता, सदर एसीचे ओ.डी.यु. मेन पी.सी.बी. शॉट झाल्याचे आढळले. तक्रारकर्त्यांने निष्काळजीपणाने स्टॅबीलायजर शिवाय एसी वापरल्यामुळे सदर एसीचा पी.सी.बी. उडाला असे असून सुध्दा वि.प.यांनी तक्रारकर्त्यास नविन पी.सी.बी. लावून एसी सुरु करुन दिला. सदर एसीमध्ये कोणताही निर्मिती/तांत्रिक दोष नाही. सबब तक्रारकर्ता यांनी खोटी तक्रार वि.प.यांचे विरुध्द दाखल केली असल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी,अशी विनंती केली.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज,शपथपत्र, तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज शपथपत्र यालाचा तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद ग्रहीत धरण्यात यावा अशी निशाणी क्रंमाक 14 वर पुरसिस दाखल. वि.प. यांचे लेखी उत्तर, लेखी उत्तर व दस्तावेजाला वि.प.चे शपथपत्र व लेखी युक्तिवाद ग्रहीत धरण्यात यावा अशा अनुक्रमे निशाणी क्रंमाक 12 व 13 वर पुरसिस दाखल आणि उथयपक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि.प. यांचे परस्पर विरोधी कथनावरुन तक्रार निकाली कामी खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? : होय
2) आदेश काय ? : अंशतः मंजूर.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्त्याने दिनांक 4/4/2018 रोजी विरुध्द पक्षा कडून रिकनेक्ट नावांचा 1.5 टन इर्न्वटर 3 स्टार स्प्लीट ए.सी.मॉडेल क्रं.एक्सएस-183बी80 अनुक्रमांक एएयु18ए0015536 रु. 30,990.99/- ला खरेदी केला.याबाबत तक्रारकर्त्याने नि. क्र. 4 वर दस्त क्र.1संगकणीय बिल दाखल केले. याशिवाय सदर बाब वि.प.यांनी सुध्दा मान्य केली असल्याने तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारीत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, वि.प. यांचे तंत्रज्ञ यांनी दिनांक 9/4/18 रोजी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन सदर एसीचे इन्स्टॉलेशन करुन दिले. परंतु त्यानंतर तक्रारकत्याने लगेच दिनांक 17/4/18 रोजी वि.प.यांना टोल फ्री क्रमांकावर फोन करुन सदर एसी थंडावा देत नसल्याचे सांगितले. याशिवाय अनुक्रमे दिनांक 20/9/18, 30/9/18 रोजी सुध्दा टोल फ्री नबंरवर सदर एसी बाबत तक्रार दिली असता वि.प.यांचे तंत्रज्ञ यांनी सदर एसी चालु करुन दिला. वि.प.यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये सुध्दा तक्रारकर्त्याने दिनांक 20/9/18, 28/10/18 व 11/1/19 रोजी सदर एसीच्या कुलींग सिस्टीमबाबत तक्रार केली असे मान्य केले आहे. तसेच सदर एसीचे ओ.डी.यु. मेन पी.सी.बी. शॉट झाल्याचे आढळल्याचे सुध्दा नमुद आहे. याशिवाय तक्रारीत निशाणी क्रंमाक 10 वर दस्त क्रंमाक 2 ते 6 वर दाखल जॉबशिटस मध्ये सुध्दा तक्रारकर्त्याने कुलींगबाबत तक्रार केल्याचे नमुद आहे. तसेच सदर एसीचा पी.सी.बी. उडाल्याने असे असून सुध्दा वि.प.यांनी नविन पी.सी.बी. लावून एसी सुरु करुन दिला. परंतु सदर एसीच्या दोषाचे निवारण झाले नाही. यावरुन तक्रारकर्त्याने सदर एसी खरेदी केल्यापासूनच त्यामध्ये कुलींगचा दोष होता व वि.प.यांनी सदर एसी वारंवार दुरुस्त केल्यानंतरही त्यामध्ये असलेल्या सततच्या दोषाचे निवारण झाले नाही. करिता सदर एसी मध्ये सततचा दोष असल्याने व तक्रारकर्त्याने वि.प.यांच्याकडे वारंवार तक्रार करुन सुध्दा सदर दोषाबाबत वि.प. यांनी निर्मुलन न करुन तक्रारकर्त्याप्रति न्युनता सेवा दिल्याचे मंचाच्या मते सिध्द होते. सदर एसीमध्ये दोष असुनही वि.प.ने तक्रारकर्त्यास तो बदलवून न दिल्याने तक्रारकर्त्यास त्याचा उपभोग घेता आला नाही त्यामुळे त्यास शारिरीक व मानसिक त्रास झाल्याने वि.प.हे तक्रारकर्त्यास सदर एसी बदलवून नविन एसी तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. सबब मुद्दा क्रंमाक 1 उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. सीसी/16/2019 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) वि.प. यांनी तक्रारकर्त्यास त्याच्याकडील विवादीत रिकनेक्ट नावांचा 1.5 टन इर्न्वटर 3
स्टार स्प्लीट ए.सी.मॉडेल क्रं.एक्सएस-183बी80 अनुक्रमांक एएयु18ए0015536एसी
बदलवून त्याच मॉडेलचा नविन एसी विना मोबदला तक्रारकर्त्यास बसवुन दयावा.
(3) वि.प. यांनी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई तसेच
तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.3,000/- दयावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष