तक्रारदार ः- स्वतः
सामनेवाले क्र 2 ते 5 तर्फे वकील :. श्री. वृषभ पारेख
सामनेवाले क्र 1 ः- एकतर्फा
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 21/09/2016 रोजी घोषीत )
1. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र 5 यांचे कंपनीने उत्पादीत केलेला भ्रमणध्वनी विकत घेतला व तो वारंटी कालावधीमध्ये दुरूस्त न करून मिळाल्यामूळे व भ्रमणध्वनी घेतांना महत्वाची माहिती न सांगीतल्यामूळे ही तक्रार दाखलकेली. सामनेवाले क्र 1 यांना नोटीस प्राप्तझाली.परंतू ते उपस्थित झाले नाही.त्यांना नोटीस प्राप्त झाल्याबाबत पोस्टाचा दाखला व, सामनेवाले क्र 1 यांची शिक्कानिशी सहीची छायांकित प्रत अभिलेखावर दाखल केली. सामनेवाले क्र 1 विरूध्द दि.06/10/2015 च्या आदेशान्वये एकतर्फा चालविण्यात येत आहे. सामनेवाले क्र 2 ते 5 हे हजर झाले व सेवेमध्ये कसुर असल्याबाबत स्पष्टपणे व ठामपणे नाकारले.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले क्र 1 हे भ्रमणध्वनीचे विक्रेते आहेत. सामनेवाले क्र 2 हे अधिकृत सेवाकेंद्र आहे. सामनेवाले क्र 3 व 4 हे सामनेवाले क्र 5 उत्पादीत कंपनीचे अधिकारी आहेत. सामनेवाले क्र 5 यांनी उत्पादीत केलेल्या XPERIA ZR भ्रमणध्वनी तक्रारदारांनी सामनेवाले क्र 1 कडून रक्कम रू. 28,449.05 पैसे अदा करून दि. 15/08/2013 ला विकत घेतला. सदरहू भ्रमणध्वनीला 1 वर्षाची वारंटी होती. परंतू 1 वर्षाच्या वारंटीच्या दरम्यान भ्रमणध्वनी व्यवस्थीतपणे कार्य करू लागले नाही. त्याला असलेला प्लॅप निघुन आला व आतील स्पिकर कार्य करीत नव्हते. वॉयपाय काम करीत नव्हता. चार्जींगकरीता युएसबी प्लॅप क्षतीग्रस्त झाले होते व पाण्यामूळे भ्रमणध्वनीचे नुकसान झाले होते. सबब तक्रारदार यांना भ्रमणध्वनी वापरतांना त्रास जाणवू लागला. तक्रारदार हे सामनेवाले क्र 2 कडे दि. 07/08/2014 ला गेले असता त्यांना भ्रमणध्वनीमध्ये असलेला दोष नमूद केले व पाण्यामूळे नुकसान झाल्याचे सांगीतले व सदर भ्रमणध्वनी हा “No Repair mobile” . असल्याचे तोंडी सांगीतले व नविन मोबाईलवर तक्रारदार यांना 20 टक्के सवलत देण्यात येईल असे सांगीतले. तक्रारदार यांच्या वतीने त्यांच्या मुलानी सामनेवाले क्र 3 यांना दि. 02/10/2014 ला सदरहू भ्रमणध्वनी हा “No Repair mobile” . असल्याचे विकत घेतेवेळी सांगण्यात न आल्याचे कळविले. या बाबत तोडगा काढण्याची विनंती केली. उभयपक्षामध्ये पत्रव्यवहार झाला. परंतू, तक्रारदार यांना समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. तक्रारदार यांनी दि. 19/12/2014 ला वकीलामार्फत नोटीस पाठविली व ही तक्रार दाखल करून भ्रमणध्वनीची किंमत व्याजासह व मानसिक त्रास, इतर खर्चासाठी अशी एकुण रू 60,440/-,ची मागणी केली. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पावती, झालेले पत्रव्यवहार, सर्व्हिस जॉब शिट इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
3. सामनेवाले क्र 2 ते 5 यांचेनुसार सामनेवाले क्र 5 ही एक व्यापारी संघटना असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सामनेवाले क्र 2 त्यांचे अधिकृत सेवाकेंद्र व सामनेवाले क्र 3 व 4 त्यांचे अधिकारी आहेत. तक्रारदारानी त्यांचा सोनी XPERIA ZP मॉडेल नंबर 5502 दि. 15/08/2013 ला विकत घेतला व विकत घेतांना त्यांनी त्या भ्रमणध्वनीमध्ये असलेले वेगवेगळे फिचर, फंक्शन्स व अप्लीकेशन याचे प्रात्यक्षिक सामनेवाले क्र 1 यांनी केले होते व तक्रारदार यांचे समाधान झाल्यामूळे त्यांनी तो भ्रमणध्वनी विकत घेतला. सामनेवाले यांनी सिमीत वारंटी 1 वर्षाकरीता दिली होती व वारंटीतील क्लॉज 3 प्रमाणे सामनेवाले हे पाण्यामूळे भ्रमणध्वनीमध्ये दोष उत्पन्न झाल्यास त्याकरीता सामनेवाले हे जबाबदार राहणार नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी द्रवपदार्थ आतमध्ये गेल्यामूळे त्यामध्ये दोष उत्पन्न झाले होते. हा दोष तक्रारदार यांच्या निदर्शनास सामनेवाले क्र 2 यांनी आणला व त्या भ्रमणध्वनीची दुरूस्ती निःशुल्क होऊ शकत नाही असे सांगीतले. सदरहू भ्रमणध्वनी अंदाजे 13 महिने दोषमुक्त स्थितीमध्ये वापरला व तक्रारदार यांनी ते सर्व प्रथम सामनेवाले क्र 2 कडे दि. 26/09/2014 ला स्पिकर व युएसबीची तक्रार घेऊन केली होती. तक्रारदार यांना द्रवपदार्थाचे परिक्षण दाखविण्यात आले. भ्रमणध्वनीमधील द्रवपदार्थामूळे झालेले दोष वारंटीमध्ये येत नसल्यामूळे ते निःशुल्क दुरूस्ती करता येत नाही व सदरहू दोष हा तक्रारदार यांनी भ्रमणध्वनी निष्काळजीपणे वापरल्यामूळे निर्माण झाला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या पत्रव्यवहाराला वेळोवेळी लगेच प्रतिसाद दिला. तक्रारदार यांची मागणी आधारहीन असल्यामूळे ती मान्य करण्याजोगी नव्हती. तक्रारदार स्वतःच्या चुकीचा गैरफायदा घेऊ पाहत आहेत. सामनेवाले यांनी घेतलेल्या भूमीकेला मा.सर्वोच्च न्यायालय, मा.राष्ट्रीय आयोग, मा. राज्य आयोगानी दिलेल्या न्यायनिर्णयाचा भरपूर पाठिंबा आहे. सामनेवाले यांनी सेवा देतांना कोणताही कसूर केला नाही. तक्रारदार यांची तक्रार खोटी व चुकीच्या बाबीवर आधारीत असल्यामूळे ती खर्चासह फेटाळण्यात यावी. सामनेवाले यांनी भ्रमणध्वनी वापरासंबधी असलेले निर्देश, वारंटीसंबधी माहितीपत्रिका तक्रारदार यांचे भ्रमणध्वनीचे काढलेले छायाचित्र दाखल केले.
4. तक्रारदार व सामनेवाले क्र 2 ते 5 यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. तक्रारदार यांचा स्वतःचा व सामनेवाले क्र 2 ते 5 यांचे तर्फे वकील श्री. वृषभ पारेख यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
5. उपरोक्त बाबीवरून खालील बाबी मान्य आहेत असे समजता येईल.
(अ) तक्रारदारानी सामनेवाले क्र 1 कडून सामनेवाले क्र 5 यांनी उत्पादीत केलेला XPERIA ZP भ्रमणध्वनीची रक्कम अदा करून खरेदी केली. सुरूवातीचे 8 ते 10 महिने भ्रमणध्वनीमध्ये दोषाबाबत अधिकृत सेवाकेंद्राकडे कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी दुरूस्त करून देण्यात आला नाही. सामनेवाले क्र 2 हे सामनेवाले क्र 5 चे अधिकृत सेवाकेंद्र आहे. सामनेवाले क्र 3,4 हे सामनेवाले क्र 5 यांचे अधिकारी आहेत. भ्रमणध्वनीमध्ये द्रव्य शिरल्यामूळे दोष उत्पन्न झाला होता.
6. उपरोक्त तक्रार निकाली काढण्याकरीता खालील मुद्दे महत्वाचे ठरतात.
(अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदरहू भ्रमणध्वनीकरीता सेवा देण्यात कसुर केला आहे काय?
(अ-1) मान्य बाबीवरून हे सिध्द होते की, तक्रारदार सदरहू भ्रमणध्वनी 8 ते 10 महिने वापरला व त्यांनी सर्वप्रथम दिनांक 07/08/2014 ला सामनेवाले क्र 2 कडे तक्रार दाखल केली. त्याबाबत जॉबशीट अभिलेखावर आहे. सदरहू भ्रमणध्वनी तक्रारदारानी दि. 07/08/2014 पूर्वी दोषाबाबत तक्रार नोंदविली त्याबाबत कोणताही दस्ताऐवज अभिलेखावर नाही. यावरून असे म्हणता येईल की, सदरहू भ्रमणध्वनीमध्ये उत्पादीत दोष नव्हता.
(अ-2) तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी प्लॅप हे क्षतीग्रस्त होते. तक्रारदार हा मुंबई येथील रहिवासी आहे व मुंबई मधील पावसाळयाला जुनमध्ये सुरूवात होते व पावसाचे जुन जुलैमध्ये भरपूर प्रमाण असते. तक्रारदार यांच्या भ्रमणध्वनीचा प्लॅप हा क्षतीग्रस्त असल्यामूळे त्यामध्ये पाणी शिरल्याचे नाकारता येत नाही. सामनेवाले क्र 2 यांनी केलेल्या पाहणीतुन हे सिध्द होते की, द्रव/पाणी शिरले होते. ही बाब सामनेवाले क्र 2 यांनी स्पष्टपणे जॉबशीटमध्ये नमूद केली आहे.
(अ-3) सामनेवाले यांनी भ्रमणध्वनी वापराबाबत व वारंटीबाबत दाखल केलेले पुस्तीकेवरून विशेषतः वारंटी अट क्र. 3 प्रमाणे द्रव्यामुळे दोष उत्पन्न झाल्यास ती बाब वारंटी अंतर्गत येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे वारंटीचे अटी व शर्ती उभयपक्षकारांना बंधनकारक राहतील. वकील श्री. वृषभ पारेख यांनी त्यांच्या तोंडीयुक्तीवादाच्या पृष्ठर्थ मा. सर्वोच्च न्यायालय यांनी सिव्हील अपील नं 9057/1996 भारती निटींग कंपनी विरूध्द डिएचएल वर्ल्डवाईड एक्सप्रेस कुरीअर डिव्हीजन ऑफ एअर लि. निकाल तारीख 09/05/1996 व मा. चंदिगड राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचानी प्रथम अपील क्र. 75/2014 डॉ.सुरीदंर पाल सिंग विरूध्द सोनी इंडिया प्रा.लि. व इतर निकाल तारीख 05/03/2014 चा आधार घेतला आहे.
(अ-4) उपरोक्त बाबींचा विचार करता भ्रमणध्वनीमध्ये उत्पन्न झालेला दोष हा वारंटीच्या अंतर्गत येत नसल्यामूळे सामनेवाले यांनी तो निःशुल्क दुरूस्ती न करून देणे म्हणजे सेवेमध्ये कसुर ठरत नाही. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी निःशुल्क दुरूस्ती न करून दिल्यामूळे सामनेवाले यांना, वारंटीची तरतुद विचारात घेता, जबाबदार धरता येणार नाही.
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदरहू भ्रमणध्वनी विकतांना अनुचित व्यापार पध्दत अवलंबिली आहे काय किंवा सामनेवाले यांनी तक्रारदारासोबत केलेला विक्री व्यवहार हा योग्य व कायदेशीर आहे काय?
(ब-1) तक्रारदार यांनी सामनेवाले क्र 2 कडे भ्रमणध्वनी दुरूस्तीसाठी दिल्यानंतर त्याला सामनेवाले क्र 2 कडून सदरहू भ्रमणध्वनी हा “No Repair mobile” असल्याचे समजले. त्यांनी ही दि. 02/10/2014 ला पत्र लिहीले व ही बाब त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केली. तसेच त्यानंतर तक्रारदारानी ही बाब त्यांच्या दि. 11/10/2014 च्या व दि. 15/10/2014 च्या पत्रामध्ये तसेच वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केली आहे. तसेच तक्रारदारानी दाखल केलेल्या तक्रारीच्या परिच्छेद 9 मध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे. परंतू सामनेवाले यांनी या बाबी बाबत कोणतेही स्पष्टीकरण कोणत्याही टप्यावर दिलेले नाही किंवा हा सदरहू भ्रमणध्वनी हा No repair mobile नसल्याबाबत स्पष्टपणे नकार दिलेला नाही. यावरून असे समजता येईल की, तक्रारदार यांना विक्री करण्यात आलेला भ्रमणध्वनी हा No repair mobile होता.
(ब-2) आमच्या मते No repair mobile ही बाब फार महत्वाची आहे व त्या बाबीवर ग्राहक तो भ्रमणध्वनी घ्यावा किंवा नाही याबाबत विचार करू शकतो व ही बाब त्याच्या निर्णयाशक्तीवर नक्कीच परिणाम करू शकते. त्यामुळे अशा प्रकारचा भ्रमणध्वनी विक्री करतांना ग्राहकाला ही बाब स्पष्टपणे सांगणे महत्वाचे आहे. ही बाब न सांगणे म्हणजे एक प्रकारची महत्वाची बाब दडवून ठेवण्यासारखे आहे व थोडक्यामध्ये ग्राहकांशी करार करतांना लबाडी केल्यासारखे होईल. असले करार ग्राहक नामंजूर किंवा अस्विकार करू शकतात.
(ब-3) आमच्या मते सदरहू भ्रमणध्वनी हा No repair mobile ही बाब सामनेवाले क्र 1 हे तक्रारदार यांना सांगु शकले असते. परंतू त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सदरहू भ्रमणध्वनी हा No repair mobile असल्याचे सांगण्यात आले होते असा पुरावा अभिलेखात नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे म्हणणे ग्राहय धरण्यास काहीही हरकत नाही. शिवाय, सामनेवाले क्र 2 ते 5 यांनी ही बाब तक्रारदाराना केव्हा, कशी सांगीतली हे कुठेही स्पष्ट होत नाही. सामनेवाले यांनी कोणताही दस्तऐवज सादर केलेला नाही, ज्यावरून हे सिध्द होते की, महत्वाची बाब त्यांनी जाहीरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केली होती. त्यामुळे आमच्या मते सदरहू विक्रीचा करार तक्रारदार यांना बंधनकारक म्हणता येणार नाही व मुलतः जर सदरहू भ्रमणध्वनी हा No repair mobile होता तर, त्यासंबधी दुरूस्तीसाठी 1 वर्षाकरीता वारंटी देणे म्हणजे अनुचित व्यापार पध्दत म्हणता येईल. जो भ्रमणध्वनी दुरूस्त होऊ शकत नाही, त्याबाबत दुरूस्तीची वारंटी देणे म्हणजे अनुचित व अयोग्य आहे. सबब, आमच्या मते सामनेवाले क्र 1 ते 5 यांनी तक्रारदार यांना सदरहू भ्रमणध्वनी विक्री करतांना महत्वाची बाब न सांगणे Indian Contract ACT कलम 17 प्रमाणे Fraud ठरते. त्यामुळे हा करार तक्रारदार यांना बंधनकारक ठरत नाही. सबब आमच्या मते तक्रारदार हे केलेल्या मागणीकरीता पात्र ठरतात.
8. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्षानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
9. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
1. तक्रार क्रमांक 138/2015 बहूतांशी मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र 1 ते 5 यांनी तक्रारदार यांना सदरहू भ्रमणध्वनी विकतांना अनुचित व्यापार पध्दत अवलंबीली व महत्वाची बाब दडवून ठेवली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र 1 ते 5 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना भ्रमणध्वनीची किंमत रू. 28,449.05 (रूपये अठ्ठावीस हजार चारशे एकोणपन्नास 05 पैसे) दि. 15/08/2013 पासून 10 टक्के व्याजानी दि. 31/10/2016 पर्यंत अदा करावे तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/11/2016 पासून 18 टक्के व्याज लागु राहील.
4. सामनेवाले क्र 1 ते 5 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासासाठी रू. 10,000/-,(दहा हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रू. 10,000/-,(दहा हजार) दि. 31/10/2016 ला किंवा त्यापूर्वी अदा करावे तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/11/2016 पासून 10 टक्के व्याज लागु राहील.
5. तक्रारदारांनी त्यांच्याकडे असलेला सदरहू भ्रमणध्वनी दि. 15/10/2013 पर्यंत सामनेवाले क्र 2 कडे सुपूर्द करावा.
6. सामनेवाले क्र 1 ते 5 यांना असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी सदरहू प्रकारचा भ्रमणध्वनी/सोनी XPERIA ZP मॉडेल 5502 हा या पुढे विक्री करतांना तो No repair mobile आहे हे स्पष्टपणे ग्राहकांना सांगावे व त्यासंबधी माहिती जाहीरातीमध्ये स्पष्टपणे व ठळकपणे नमूद करावी.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
8. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
npk/-