(द्वारा मा.श्री. ना.द.कदम - मा. सदस्य)
1. सामनेवाले 1 हे मोबाईल विक्रते आहेत. सामनेवाले 2 हे सॅमसंग मोबाईलचे सर्व्हिस सेंटर आहे. सामनेवाले 3 हे सामनेवाले 1 यांचे सर्व्हिस सेंटर आहे. सामेनवाले 4 हे सॅमसंग मोबाईल उत्पादक कंपनीचे मुख्यालय आहे. तक्रारदारानी सामनेवाले 1 यांचेकडुन, सामनेवाले 4 यांनी उत्पादित केलेला मोबाईल विकत घेतल्यानंतर तो लगेचच बंद पडल्याचा बाबीतुन प्रस्तुतचा वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार, त्यांनी सामनेवाले 4 यांनी उत्पादीत केलेला सॅमसंग A3 हा मोबाईल रु. 14,500/- या किमतीस दि.27/09/2015 रोजी सामनेवाले 1 कडुन विकत घेतला व 4 दिवसातच मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये निळसर रेषा येऊ लागल्या. त्यावेळी तक्रारदार नागपुरमध्ये होत्या. दि.14/10/2015 रोजी मुंबईमध्ये परत आल्या, त्यावेळी मोबाईलचा डिस्प्ले संपुर्णपणे खराब झाला होता. तक्रारदारांनी सदर बाब सामनेवाले 1 यांच्या निदर्शनास आणल्यावर सामनवेाले 2 यांचेकडे जाण्यास सांगितले. सामनेवाले 2 यांचेकडे मोबाईल दुरूस्तीसाठी दिला असता सदोष डिस्प्लेबाबतचे कारण ते शोधु शकले नाहीत. तथापी, मोबाईलमध्ये अंतर्गत दोष असल्याचे त्यांनी सांगितले. सदर बाब सामनेवाले 1 यांना कळविली असता त्यांनी सामनेवाले 3 कडे जाण्यास सांगितले. सामनेवाले 3 कडे मोबाईल जमा केला. त्यानंतर काही दिवसांनी सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना कळविले की, मोबाईलचा डिस्प्ले खराब झालेला आहे व दुरुस्तीसाठी रु. 8,500/- खर्च करावा लागेल. तक्रारदारांनी विकत घतलेला मोबाईल 4 दिवसातच खराब झाला व मोबाईल वारंटीमध्ये असल्याने सामनेवाले यांनी तो दुरूस्त करुन / बदलुन न दिल्याने, प्रस्तुत तक्रार दाखल करुन, नवीन मोबाईल मिळावा अथवा किमत रु 14,500/-, 18% व्याजासह मिळावी, मानसिक त्रासाबद्दल रु. 75,000/- व तक्रार खर्चाबद्दल रु. 3,000/- मिळावेत अशा मागया केल्या आहेत.
3. सामनेवाले 1 ते 4 यांना पाठविलेली तक्रारीची नोटिस सामनेवाले 1 यांनी न स्वीकारल्याबाबत, सामनेवाले 2 यांना नोटिस दि.15/01/2016 रोजी प्राप्त झाल्याबाबत, सामनेवाले 3 यांना सुचना देऊनही त्यांनी न स्वीकारल्याबाबत व सामनेवाले 4 यांना दि. 19/01/2016 रोजी प्राप्त झाल्याबाबतचा पोस्टल ट्रॅक रिपोर्ट तक्रारदारांनी दाखल केला. सामनेवाले 1 व 3 यांच्याबाबत तक्रारदारांनी सर्व्हिस अॅफिडेव्हीट दाखल केले. सबब सामनेवाले यांना नोटिस बजावणी होऊनही व त्यांना बराचकाळ संधी मिळुनही त्यांनी लेखी कैफियत दाखल केली नाही अथवा ते हजरही झाले
नाहीत. त्यामुळे सामनेवाले 1 ते 4 यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी शपथपत्र, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादाची पुर्सिस दिली. तक्रारदाराची तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) तक्रारदारांनी सॅमसंग A3 हा मोबाईल रु. 14,500/- या किंमतीस सामनेवाले यांचे कडुन दि. 27/09/2015 रोजी विकत घेतल्याची बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या कॅशमेमो / रिटेल इन्वहाईस वरुन दिसुन येते. यानंतर लगेचच सदर मोबाईलमध्ये डिस्प्लेचा दोष निर्माण झाल्याची बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि. 17/10/2015 रोजीच्या जॉब शीटवरून दिसून येते. मोबाईलमध्ये डिस्प्लेचा दोष आढळल्यावर तक्रारदारांनी आपला मोबाईल सामनेवाले 3 यांचेकडे दि. 17/10/2015 रोजी जमा केल्याचे दिसून येते.
ब) तक्रारदाराच्या कथनानुसार सामनेवाले 3 हे मोबाईल दुरूस्त करु न शकल्याने सामनवाले 2 यांचेकडे दुरूस्तीसाठी मोबाईल दिला. तथापी त्यानंतर सामनेवाले 1 यांनी तक्रारदाराचा मोबाईल दूरुस्तीचा खर्च रु. 8,500/- मागितला व तक्रारदाराचा मोबाईल परत देण्यात आला.
क) तक्रारदारानी दि. 27/09/2015 रोजी मोबाईल विकत घेतल्यानंतर केवळ 15 – 20 दिवसातच मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्याचे स्पष्ट होते. सदर मोबाईल हा वॉरंटी पिरियडमध्ये होता ही बाबही स्पष्ट होते. अशा परिस्थितीत सामनेवाले 1 ते 4 यांनी तक्रारदाराचा मोबाईल दुरूस्त करून अथवा तो बदलून देणे त्यांची जबाबदारी होती.
ड) तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांना दि.23/10/2015 रोजी पाठविलेल्या इ-मेलद्वारे तक्रारीच्या तपशिलाचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडुन सॅमसंग मोबाईल विकत घेण्यापुर्वी 5 – 6 आठवडे सोनी सी-3 हा मोबाईल रु. 15,000/- या किमतीस विकत घेतला असता तो लगेचच सतत हॅंग होत राहिल्याने मोबाईलचा वापर तक्रारदाराना करता आला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सोनी सी-3 हा मोबाईल सामनेवाले 1 यांना बाय बँक / एक्स्चेंज आफॅरमध्ये परत केला व सोनी सी-3 या मोबाईलची किंमत रु. 4,550/- दि. 27/09/2015 रोजी सॅमसंग A-3 मोबाईल विकत घेतांना समायोजित केली. सदर बाबी दि.27/09/2015 रोजीच्या कॅश मेमोमध्ये दर्शविण्यात आल्या आहेत. तक्रारदारानी दि. 23/10/2015 रोजीच्या पत्रामध्ये सामनेवाले 1 हे नादुरूस्त मोबाईल ग्राहकांना विकत असल्याचा आक्षेप नमुद केला आहे.
5. तक्रारदारांनी दि. 27/09/2015 रोजी विकत घेतलेल्या मोबाईलचा वापर ते 15 दिवस सुध्दा करु शकले नाहीत. शिवाय, सॅमसंग मोबाईल कंपनीचे अधिकृत सर्विस सेंटरसुध्दा तक्रारदाराचा मोबाईल दुरूस्त करु शेकले नाहीत. त्यावरुन तक्रारदारांना सामनेवाले 1 यांनी विकलेला मोबाईल दोषपुर्ण होता ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी सामनेवले 1 हे सदोष मोबाईलची विक्री करत असून सामनेवाले 1 हे अशा प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथेबद्दल केलेल्या उल्लेखावरून सामनेवाले 1 सुध्दा तक्रारदारांना सदोष मोबाईल विकण्यास जबाबदार आहेत असे मंचास वाटते.
6. सामनेवाले 1 ते 4 यांना संधी मिळुनही त्यांनी कैफियत दाखल ल केल्याने तक्रारदाराची तक्रारीमधील कथने अबाधित राहतात.
7. उपरोक्त चर्चेवरुन व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
- तक्रार क्र. 1096/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
- सामनेवाले 1 व सामनेवाले 4 यांनी तक्रारदारांना मोबाईल संदर्भात सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले 1 व 4 यांनी तक्रारदारास सॅमसंग A-3 हा नवीन सीलबंद मोबाईल दि. 15/07/2016 पुर्वी द्यावा किंवा तो मोबाईल देवू शकत नसल्यास मोबाईलची किंमत रु. 14,500/- (रु. चौदा हजार पाचशे फक्त) तक्रारदाराला दि.05/12/2015 पासून 12% व्याजासह दि.15/07/2016 पुर्वी तक्रारदाराना द्यावी. सदर आदेशपुर्ती विहित मुदतीमध्ये न केल्यास दि. 05/12/2015 पासून 15% व्याजासह संपुर्ण रक्कम द्यावी.
- मानसिक, शारिरिक त्रास व तक्रार खर्चाबद्दल रु. 3,000/- (रु. तीन हजार फक्त) दि. 15/07/2016 पुर्वी सामनेवाले 1 ते 4 यांनी तक्रारदारास द्यावे.
- सामनेवाले 2 व 3 यांच्याविरुध्द कोणतेही आदेश नसल्याने सामनेवाले 1 व 4 हे आदेशपुर्ती करण्यास स्वतंत्ररित्या तसेच संयुक्तरित्या जबाबदार राहतील.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
ठिकाण – ठाणे.
दिनांक - 26/05/2016.