जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १७५/२०११ तक्रार दाखल दिनांक – ०२/०९/२०११
तक्रार निकाली दिनांक – ११/०९/२०१४
रमेश मोतीराम वसावे
वय ४१, धंदा – शेती,
रा.शहादा, हल्ली मु.उमेदा
ता.शिरपूर जि. धुळे. . तक्रारदार
विरुध्द
१) रिलायन्स लाईफ इश्युरन्स क.लि.
सिक्स फ्लोअर, रिलायन्स हाऊस नं.६
हाडाडोस रोड नमुगम बाक्कम चेन्नई-०६
(तामीळनाडू राज्य) चेन्नई
२) रिलायन्स लाईफ इश्युरन्स कं.लि.
रजिष्टर ऑफिस एच ब्लॉक, फस्ट फ्लोअर
धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी नवी मुंबई
(महाराष्ट्र) ४००७१०
३) ब्रॅंच मॅनेजर रिलायन्स लाईफ इश्युरन्स कं.लि.
फस्ट फ्लोअर इविंग राणी मॉसाहेब प्लाझा
नंदुरबार रोड, दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
४) भरत रमेश सोनार
सेल्स मॅनेजर, रिलायन्स लाईफ इश्युरन्स कं.लि.
रा.ओम प्लाझा नगरपालिके समोर, शहादा
ता.शहादा जि.नंदुरबार
५) इम्रान अहमद शेख, एजंट
रिलायन्स लाईफ इश्यु.कं.लि.
रा.रा. मदीना नगर, शहादा जि.नंदुरबार . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.बी.बी. बोरसे)
(सामनेवाला क्र.१ ते ३ तर्फे – एकतर्फा)
(सामनेवाला क्र.४ व ५ तर्फे – अॅड.श्री.ए.डी. कुलकर्णी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. विमा धारकाच्या मृत्यूनंतर सामनेवाले यांनी विम्याची रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. आपल्या तक्रारीत तक्रारदार यांनी म्हटले आहे की, त्यांची पत्नी कमलबाई रमेश वसावे यांनी सामनेवाले यांच्याकडून दि.११/०७/२००९ रोजी विमा पॉलिसी घेतली होती. तिचा क्रमांक १४८५७२५९ असा होता. पॉलिसी घेतल्यानंतर दि.०२/०९/२००९ रोजी कमलबाई वसावे यांचा अल्सरच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. तथापि, विमा पॉलिसी घेतांना भरावयाच्या माहितीपत्रात कमलबाई वसावे यांनी चुकीची माहिती भरली असे कारण सांगून सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मागणी नाकारली. तक्रारदार यांनी त्यासंदर्भात विमा लोकपाल यांच्याकडे दाद मागितली. विमा लोकपाल यांच्याच सुचनेवरून तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांच्याकडून कमलबाई वसावे यांच्या पॉलिसीची रक्कम संपूर्ण फायद्यासह मिळावी, मानसिक त्रासापोटी रूपये १०,०००/- मिळावे, त्या रकमेवर द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे भरून दिलेला विमा दावा अर्ज, विमाधारकाच्या मृत्यूबाबतची माहिती, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, ओळखीबाबतचे प्रमाणपत्र, विमा लोकपाल यांच्याकडे केलेला अर्ज, सामनेवाले यांनी चौकशी संस्थेला दिलेले पत्र, विमा लोकपाल यांच्याकडील पत्र, सामनेवाले यांनी विमा दावा नाकारल्याबाबतचे पत्र, विमा पॉलिसीपोटी भरलेल्या रकमेची पावती आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ ते ३ यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत व त्यांनी आपला खुलासा दाखल केला नाही. म्हणून त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश करण्यात आला. सामनेवाले क्र.४ व ५ यांनी हजर होवून संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सामनेवाले क्र. १ यांच्या सुचनेनुसार आणि धोरणानुसारच तक्रारदार यांच्या पत्नी विमाधारक कमलबाई रमेश वसावे यांना विमा पॉलिसी देण्यात आली होती. विमाधारक कमलबाई वसावे या ए.एन.एम. म्हणून कार्यरत होत्या त्यांच्याशी ओळख असल्यामुळे सामनेवाले क्र.१ यांच्या विमा व्यावसायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामनेवाले क्र.१ यांच्या धोरणानुसारच कमलबाई यांच्या आयुष्याची हमी सामनेवाले क्र.१ यांनी घेतली होती. ग्राहकाकडून पॉलिसी घेतांना ग्राहकाची वैद्यकीय तपासणी करून घेण्याची कंपनीची पध्दत नव्हती व तशा सूचनाही नव्हत्या. त्यामुळे कमलबाई यांची वैद्यकिय तपासणी केली नव्हती. सामनेवाले क्र.४ व ५ हे कमलबाई यांना पूर्वीपासूनच ओळखत होते. त्यांची प्रकृती चांगली व सशक्त होती. त्याचमुळे कंपनीचा फायदा करून देण्यासाठी त्यांना विमा पॉलिसी देण्यात आली होती. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम वारसांना मिळते हे तक्रारदार यांचे कथन खरे आहे. विमाधारक ए.एन.एम. म्हणून नोकरीस असल्यामुळे त्यांना इंग्रजी येत असावे असे सामनेवाले क्र.४ व ५ यांना वाटले होते. तथापि, पॉलिसीच्या अर्जातील माहिती कशी भरावी याची ग्राहकाला कल्पना नसल्यामुळे शाखा व्यवस्थापाकांच्या सुचनेवरून व सामनेवाले क्र.१ यांच्या नियमानुसार आम्हीच त्यांचा अर्ज भरून दिला होता, असे सामनेवाले क्र.४ व ५ यांनी खुलाशात म्हटले आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद व सामनेवाले क्र.४ व ५ यांनी दाखल केलेला खुलासा पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे विमादाव्याची रक्कम मिळण्यास
पात्र आहेत काय? होय
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांच्या पत्नी कमलबाई रमेश वसावे यांनी सामनेवाले क्र.४ व ५ यांच्याकडून सामनेवाले क्र.१ ते ३ यांची विमा पॉलिसी घेतली होती. सामनेवाले क्र.४ व ५ हे सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्यासाठी काम करतात. विमा पॉलिसी घेतेवेळी कमलबाई वसावे यांनी विमा हप्ता रूपये २५,०००/- भरला होता. त्याच्या पावतीची छायांकीत प्रत तक्रारदार यांनी अर्जासोबत दाखल केली आहे. यावरून कमलबाई वसावे हया सामनेवाले क्र.१ ते ५ यांच्या ग्राहक होत्या हे स्पष्ट होते. विमाधारक कमलबाई वसावे यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार हे त्यांचे कायदेशीर वारस ठरतात. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ब) (पाच) मधील तरतुदीनुसार तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ते सामनेवाले क्र.१ ते ५ यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणूनच मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
७.मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांच्या पत्नी कमलबाई रमेश वसावे यांनी सामनेवाले क्र.४ व ५ यांच्याकडून सामनेवाले क्र.१ ते ३ यांची विमा पॉलिसी दि. ११/०७/२००९ रोजी घेतली होती. दि.०२/०९/२००९ रोजी कमलबाई यांचा अल्सरच्या आजारामुळे धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी कंपनीच्या धोरणानुसार आणि विमा पॉलिसीच्या नियमानुसार विमाधारकाच्या विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना म्हणजे तक्रारदार रमेश मोतीराम वसावे यांना देणे आवश्यक होते. त्यासंदर्भात तक्रारदार यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना विमा लोकपाल यांच्याकडे दाद मागावी लागली. मात्र तेथेही सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी योग्य माहिती पुरविली नाही आणि तक्रारदार यांची मागणी नियमबाहय किंवा चुकीची आहे हे सिध्द केले नाही. एवढेच नव्हे तर तक्रारदार यांना विमा रक्कम मागण्याचा अधिकार नाही, विमाधारक कमलबाई वसावे यांनी विमा अर्जात भरलेली माहिती कशी चुकीची होती हे सिध्द न करताच तक्रारदार यांचा विमा दाव्याचा अर्ज नाकारण्यात आला. सामनेवाले यांची ही कृती तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील कसूर आहे असे आम्हाला वाटते. म्हणनूच मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८.मुद्दा ‘क’ – विमाधारक कमलबाई वसावे यांचा दिनांक ०२/०९/२००९ रोजी मृत्यू झाल्यानंतर तक्रारदार यांनी लगेच म्हणजे दि.०७/११/२००९ रोजी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा मागणीपत्र आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर सामनेवाले यांनी दि.३१/०३/१० रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून त्यांचा दावा नाकारण्यात येत असल्याचे कळविले होते. विमा पॉलिसी घेतांना पॉलिसीतील कलम ३० व ३२ मधील प्रश्नांची विमाधारकाने चुकीची उत्तरे भरल्यामुळे हा दावा नाकारत असल्याचे सामनेवाले यांनी या पत्रात म्हटले होते. हे पत्र मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी दि.१३/०४/११ रोजी विमा लोकपाल यांच्याकडे अर्ज केला. त्यावर विमा लोकपाल यांनी दि.१६/०५/२०११ च्या पत्राअन्वये तक्रारदार यांना कळविल्याचे दाखल कागदपत्रावरून दिसून येते. विमाधारक कमलबाई वसावे यांचा मृत्यू खरेच कोणत्या आजाराने झाला, पॉलिसी घेण्यापूर्वी त्या आजारी होत्या काय ? याची चौकशी करण्यासाठी सामनेवाले यांनी पुणे येथील इन्फो डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस या संस्थेची नियुक्ती केली होती. त्याबाबतचा पत्र व्यवहार तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केला आहे. चौकशी दरम्यान इन्फो डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस या संस्थेने कोणता अहवाल दिला याबाबतची माहिती सामनेवाले यांनी दाखल करणे किंवा तक्रारदार यांना पुरविणे आवश्यक होते. मात्र सामनेवाले यांनी अशी कोणतीही माहिती तक्रारदार यांना पुरविली नाही किंवा या तक्रारीच्या कामकाजादरम्यान मंचात दाखल केली नाही किंवा तक्रारदार यांनी विमा लोकपाल यांच्याकडे दाद मागितली त्यावेळी तेथेही सादर केली नाही.
सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी आपले कोणतेही म्हणणे मांडले नाही. सामनेवाले क्र.४ व ५ यांनी संयुक्त खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सामनेवाले क्र.१ यांच्या सुचनेनुसार विमाधारक कमलबाई वसावे यांच्या आयुष्याची हमी सामनेवाले क्र.१ यांच्यासाठी घेण्यात आली. सामनेवाले क्र.१ यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कमलबाई वसावे यांची विमा पॉलिसी उतरविण्यात आली. पॉलिसी घेतांना वैद्यकीय तपासणी करून घेण्याची कंपनीची पध्दत नव्हती आणि तश्या सुचनाही नव्हत्या. त्यामुळे विमाधारकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. सामनेवाले क्र.४ व ५ यांनी पुढे असेही स्पष्ट केले आहे की, विमा धारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना विम्याची संपूर्ण रक्कम मिळते हे तक्रारदार यांचे कथन खरे आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे भरून दिलेला विमा दाव्याचा अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि सामनेवाले क्र.४ व ५ यांनी दाखल केलेला खुलासा याचे आम्ही अत्यंत बारकाईने अवलोकन केले. त्यावेळी आमच्या असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा रक्कम मागण्यासाठी जो अर्ज भरून दिला आहे त्यात पॉलिसीची रक्कम रूपये २,००,०००/- इतकी नमूद करण्यात आली आहे. सामनेवाले यांनी दि.३१/०३/२०१० रोजी तक्रारदार यांना जे पत्र पाठविले आहे त्यात विमाधारकाने पॉलिसी घेतेवेळी कलम ३० व ३२ मधील माहिती असत्य भरली असे नमूद केले आहे. मात्र विमा धारकाने कोणती माहिती लपविली आणि कोणती माहिती असत्य भरली याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण सामनेवाले यांनी या पत्रात केलेले नाही. विमा धारकाच्या मृत्यूबाबत अधिक चौकशी करण्यासाठी सामनेवाले यांनी पुणे येथील इन्फो डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस या संस्थेची नियुक्ती केली होती. त्या संस्थेचा चौकशीअंतीचा अहवालही सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाले क्र.४ व ५ यांनी आपल्या खुलाशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पॉलिसी घेतेवेळी विमाधारकाची वैद्यकीय तपासणी करण्याची सामनेवाले क्र.१ यांची सुचना नव्हती.
वरील बाबींचा विचार करता विमाधारक कमलबाई वसावे यांनी कोणती माहिती सामनेवाले यांच्यापासून लपविली, विमा पॉलिसी घेतांना त्यांनी कलम ३० व ३२ मध्ये कोणती माहिती असत्य लिहिली याबाबतचा पुरावा सामनेवालेंनी दाखल केलेला नाही. विमाधारक कमलबाई वसावे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कायदेशीर वारस पती रमेश मोतीराम वसावे हे आहेत. सामनेवाले क्र.४ व ५ यांनी खुलाशात नमूद केल्याप्रमाणे विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पॉलिसीची रक्कम वारसांना मिळायला हवी. याचाच अर्थ कमलबाई वसावे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पॉलिसीची रक्कम तक्रारदार रमेश वसावे यांना मिळायला हवी आणि तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. या सर्व मुद्यांचा विचार करता आमचे असे मत बनले आहे की, तक्रारदार रमेश मोतीराम वसावे हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे. म्हणूनच मुददा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘ड’ – वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे त्यांची मयत पत्नी कमलबाई रमेश वसावे यांच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे सादर केलेल्या विमा दावा अर्जातील माहितीनुसार कमलबाई वसावे यांनी रूपये २,००,०००/- एवढया रकमेची पॉलिसी घेतली होती. तेवढी रक्कम तक्रारदार यांना नियमानुसार मिळायला हवी असे आम्हाला वाटते. सामनेवाले क्र.१ यांनी सेवेत कसूर केल्यामुळे आणि कोणतेही ठोस कारण न देता तक्रारदार यांची विमा दाव्याची मागणी अयोग्य आहे हे सिध्द न केल्यामुळे तक्रारदार यांना विमा लोकपाल यांच्याकडे आणि त्यानंतर या मंचात दाद मागावी लागली त्यामुळे त्यांना मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्चही सहन करावा लागला. त्याबददलही त्यांना अनुक्रमे रूपये २,०००/- व रूपये १,०००/- भरपाई मिळायला हवी असे आमचे मत आहे. सदर तक्रारीत सामनेवाले क्र.४ व ५ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला आहे. सामनेवाले क्र.४ व ५ हे दोघेही सामनेवाले क्र.१ व २ यांच्यासाठीच काम करतात. या दोघांनी विमाधारक कमलबाई वसावे यांची विमापॉलिसी उतरविली असली तरी ती स्वतःच्या फायद्यासाठी उतरविलेली नाही. सदर पॉलिसीमुळे सामनेवाले क्र.१ व २ यांच्याच व्यवसायात वृध्दी झाली आहे. पॉलिसीची ध्येयधोरणे आणि नियम व अटी सामनेवाले क्र.१ व २ यांनी निश्चित केल्या आहेत. त्याचबरोबर विमाधारकाच्या आयुष्याची जबाबदारीही सामनेवाले क्र.१ व २ यांनी स्विकारली आहे. त्यामुळे त्या पॉलिसीची जबाबदारी सामनेवाले क्र.४ व ५ यांच्यावर टाकता येणार नाही. याचा विचार होता सामनेवाले क्र.४ व ५ यांच्याविरूध्द कोणतेही आदेश करता येणार नाही असे आम्हाला वाटते. सामनेवाले क्र.२ व ३ हे सदर तक्रारीत हजर झालेले नाहीत. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचेच नोंदणीकृत कार्यालय आहे. तर सामनेवाले क्र.३ हे सुध्दा शाखा कार्यालय आणि शाखा व्यवस्थापक आहे. यावरून सामनेवाले क्र.२ व ३ हे सुध्दा सामनेवाले क्र.१ यांच्यासाठीच काम करतात हे स्पष्ट दिसते. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे. त्यामुळे सामनेवाले क्र.१ यांच्याएवढीच त्यांचीही जबाबदारी होती. सामनेवाले क्र.३ हे सामनेवाले क्र.१ यांचेच शाखा कार्यालय आहे. पॉलिसी संदर्भात त्यांनी जबाबदारी स्विकारलेली नाही. त्यामुळे त्यांना जबाबदार धरणे योग्य होणार नाही. याचा विचार होता आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेात.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.१ व २ यांनी या निकालापासून ३० दिवसांच्या आत तक्रारदार
यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात
- तक्रारदार यांना विमा दावा मागणीपत्रातील मागणीनुसार विम्याची रक्कम रूपये २,००,०००/- द्यावी.
ब) मानसिक त्रासापोटी रूपये २,०००/- व तक्रारीचा खर्च रूपये १,०००/द्यावा.
३. वरील आदेश २(अ) मधील रक्कम मुदतीत न दिल्यास संपूर्ण रक्कम देऊन होईपावेतो द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले क्र.१ व २ जबाबदार राहतील.
४. सामनेवाले क्र.३,४ व ५ यांच्याविरूध्द कोणतेही आदेश नाहीत.
-
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.