निकालपत्र
( पारीत दिनांक : 31/07/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).
तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
1 तक्रारकर्ता हा शासकीय मनोरुग्णालय नागपूर येथे नोकरी करतो व ज्या दिवशी अपघाती घटना घडली, त्यादिवशी तक्रारकर्ता आपल्या कार्यालयात सेवा करीत होता. तक्रारकर्त्याच्या पत्नीने वि.प. क्रं. 1 व 2 यांच्याशी करार करुन रिलायन्स लाईफ इंशोरन्स पॉलिसी क्रं. 18505494 दि. 04.02.2011 ला 15 वर्षाकरिता घेतली. विम्याचा कालावधी दि. 04.02.2011 ते 03.02.2026 हा होता व विम्याचा प्रिमियम रुपये20,000/- होता. विमा रक्कम एकूण रुपये2,00,000/- एवढी ठरविण्यात आली होती.
दि. 14.03.2011 रोजी तक्रारकर्त्याची पत्नी स्वयंपाक करीत असतांना गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने पूर्णपणे जळाली. त.क. यांनी त्यांच्या पत्नीला मेयो रुग्णालयात भरती करुन पोलिस स्टेशन कोराडी रोड, नागपूर येथे सूचना दिली. पोलिसांनी त.क. च्या पत्नीचा मृत्युपूर्व बयान नोंदवून घेतले.
2 त.क. च्या पत्नीचा उपचारा दरम्यान दि. 18.03.2011 रोजी सकाळी 7.10 मि. मृत्यु झाला. त.क. यांनी विमा दाव्यासोबत पोलिस पंचनामा, मृत्युपूर्व बयान, पोस्टमार्टम रिपोर्ट , मृत्यु प्रमाणपत्र व इतर आवश्यक दस्ताऐवज वि.प. यांना दिले. त्यानंतर वि.प. यांनी पर्यवेक्षकाची नेमणूक करुन त्यांनी आजुबाजूला विचारपूस केली व त.क. यांचा विमा दावा निश्चित केला जाईल असे आश्वासन दिले.
3 दिनांक 20.09.2011 रोजी वि.प. यांनी पर्यवेक्षकाच्या तपासणीनंतर रुपये 17603/-चा धनादेश त.क. यांना पोस्टाने पाठविला. त्यामध्ये विमा रक्कमेच्या पूर्ण समाधानाबाबत कळविले नाही. त.क. जेव्हा कार्यालयात याबाबत चौकशीसाठी गेले तेव्हा त्यांना मुंबईला जाऊन पाहण्याचा सल्ला दिला व खोटे आश्वासन दिले. त्यामुळे त.क. यांनी दि. 19.07.2013 रोजी वि.प. क्रं. 1 व 2 यांना नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊन ही वि.प. यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून, विमा दाव्याची रक्कम व इतर नुकसान भरपाई असे एकूण रुपये 4,00,000/-ची मागणी केली आहे.
4 सदर तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचा मार्फत बजाविण्यात आली. त्याप्रमाणे वि.प. यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
5 वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, त.क. हा स्वच्छ हाताने मंचासमक्ष आलेला नाही व सदर तक्रार कालबाहय आहे. तसेच त.क. यांना दि. 19.09.2011 रोजी योग्य विमा राशी दिल्याचे म्हटले आहे. त.क. यांनी आवश्यक दस्ताऐवज वि.प. यांना दिलेले नाही. त्यामुळे सौ. प्रतिभा मेश्राम हिचा मृत्यु कशामुळे झाला याबाबतचा निर्णय त्यांना करता आला नाही. वि.प. यांना संशय आहे की, त.क. च्या पत्नीने आत्महत्या केली होती. त.क. यांनी दस्ताऐवज देणे आवश्यक आहे व आवश्यक दस्ताऐवज प्राप्त झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला गेला असता, असे वि.प.यांनी उत्तरात नमूद केले आहे. वि.प. यांनी पुढे नमूद केले की, त्यांच्याकडे प्राप्त दस्ताऐवजांच्या आधारवर त्यांनी रुपये 17603.20/- चा धनादेश दिला. वि.प. यांनी त.क. यांचे इतर सर्व म्हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. सदर तक्रार मंचासमक्ष युक्तिवादाकरिता आली असता, उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
7 त.क. यांनी सदर प्रकरणा सोबत खालील दस्ताऐवज दाखल केले. बिमा पॉलिसी, वि.प. यांना पाठविली नोटीस, सदर नोटीसची पोचपावती, वि.प. यांनी त.क. यांना पाठविलेल्या धनादेश कन्फर्मेशन पत्र, मर्ग खबर, मर्ग समरी, मृत्युपूर्व बयान, पोस्ट मार्टम अहवाल इत्यादी दस्ताऐवज दाखल केले.
तक्रारकर्ता यांची पत्नी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमाकृत होती व तिचा विमा पॉलिसीचा क्रं. 18505494 हा होता. सदर विमा पॉलिसी दि. 4.2.2011 रोजी काढली असून विमा कालावधी 15 वर्षाचा होता ही बाब त.क. यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते.सदर विमा पॉलिसी ही विरुध्द पक्ष क्रं. 1 द्वारा निर्गमीत केली असून वि.प. 2 हे त्याचे मुख्य कार्यालय असल्यामुळे तक्रारकर्त्याची पत्नी सौ. प्रतिभा महेंद्र मेश्राम ही वि.प. यांची विमाधारक होती. तसेच त.क. हा तिचा पती असून विमा प्रपत्रात त्याचे नांव नॉमिनी (Nominee) म्हणून आहे. त्यामुळे त.क. हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
8 विरुध्द पक्ष यांनी आपल्या लेखी उत्तरात आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे सर्व दस्ताऐवज दिलेले नाही. सदर बाब दर्शविण्याकरिता वि.प. यांनी पान.क्रं. 98 वर दस्ताऐवजांची मागणी केल्याचे दिसते. सदर मागणी मध्ये क्लेम फॉर्म ए व फायनल पोलिस रिपोर्टची मागणी केलयाचे दिसून येते. परंतु सदर पत्र त.क. यांना पाठविल्या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. या उलट त.क. यांनी वि.प. यांना नोटीस पाठविली व सदर नोटीस सोबत विमा प्रपत्राची प्रत, एफ.आय.आर.ची प्रत, पोस्ट मार्टम रिपोर्ट व मृत्युपूर्व बयाना सलग्नीत होते ही बाब नमूद आहे. तसेच सदर नोटीस वि.प. यांना प्राप्त झाल्याबाबतची पावती प्रकरणात दाखल आहे.
मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, नोटीस प्राप्त होऊन ही वि.प. यांनी त्याबाबत कोणतेच उत्तर त.क. यांना दिले नाही व तसा कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर त्याबाबत आक्षेप घेणे न्यायसंगत नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, त.क. यांनी वि.प.यांना आवश्यक दस्ताऐवज दिले होते.
9 सदर प्रकरणातील दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्युपूर्व बयानामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, मुलीकरिता(पोरीसाठी) गॅसवरती दूध गरम करीत असतांना भडका उडाल्याने ती जळाली . सदर मृत्युपूर्व बयानावर नायब तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी नागपूर यांची सही असून मृतक सौ. प्रतिभा महेन्द्र मेश्राम हिचा अंगठा आहे. सदर मृत्युपूर्व बयान हा ग्राहय मानन्यास मंचास कोणतीही अडचण वाटत नाही. कारण सदर बयान हा न्याय प्रक्रियेचे पालन करुन घेतलेले दिसते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्यु हा जळून झाला ही बाब स्पष्ट होते.
10 याउलट विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्यु आत्महत्या आहे, याबाबत जी शंका व्यक्त केली ती शंका कां व्यक्त केली याबाबत कोणताही पुरावा अथवा कथन केले नाही.त्यामुळे विरुध्द पक्ष यांचे सदर म्हणणे ग्राहय धरता येत नाही.
11 सदर प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने 2013 (1) SCALE, EXPORT CREDIT GUARANTEE CORPN. OF INDIA LTD. VS. M/S. GARG SONS INTERNATIONAL यात दिलेल्या न्यायनिवाडयाची प्रत दाखल केली. या निवाडयामध्ये अटी व शर्तीचे इन्टरप्रिटेशन करण्याबाबतच्या नियमावरती सर्वोच्च न्यायालयाने आपले मत दिलेले आहे. सदर प्रकरणात विमा प्रपत्रातील अटी व शर्तीचे इन्टरप्रिटेशन करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सदर प्रकरणामध्ये विमा प्रपत्रातील अटी व शर्तीनुसार अपघात झाला असतांना विमा दावा देय राहील असे स्पष्ट तरतूद आहे.त्यामुळे सदर न्यायनिवाडा या प्रकरणातील तथ्याशी सुसंगत नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
12 सदर प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 17603/-चा धनादेश दि. 20.09.2011 रोजी पाठविला ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. सदर धनादेश विरुध्द पक्ष यांनी कां पाठविला ? याबाबतचा कोणताही खुलासा वि.प. यांनी केला नाही. तसेच धनादेशाची रक्कमेबाबत सुध्दा एवढीच रक्कम कां? देण्यात आली, याबाबतचा सुध्दा वि.प.यांनी खुलासा केला नाही. त्यामुळे मंचाचे स्पष्ट मत आहे की, त.क. हा विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/-मधून त्याला पूर्वी प्राप्त झालेली रक्कम रुपये 17603/- वगळता रुपये 1,82,397/- मिळण्यास पात्र ठरतो. सदर रक्कम आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसात विरुध्द पक्ष यांनी अदा न केल्यास सदर रक्कम 10% दराने व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत देय राहील.
13 त.क. यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये2,00,000/-ची मागणी केली. ही मागणी अवाजवी असल्यामुळे न्यायिक दृष्टया त.क. हा शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.20,000/- मिळण्यास पात्र ठरतो. तसेच तो न्यायिक खर्च म्हणून रुपये 1,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या त.क. यांना रुपये 1,82,397/- आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 10% दराने व्याजसह रक्कम अदा होईस्तव देय राहील.
3) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- द्यावे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- द्यावा.
वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आंत करावे.
6) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवुन
जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.