जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 267/2010. तक्रार दाखल दिनांक: 17/05/2010. आदेश दिनांक : 07/09/2010. अगतराव नारायण बाबर, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. पुळूज, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुष्पम प्लाझा, तळमजला, 135, ताडीवाला रोड, पुणे - 411 001. (समन्स/नोटीस रिजनल क्लेम मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या होस्टर्न जातीच्या गाईचा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.20,000/- चा विमा उतरवला आहे. गाईचा विमा पॉलिसी क्रमांक 1702-06-3012-000001 असून गाईचा टॅग क्रमांक 15882 असा आहे. तक्रारदार यांच्या गाईस सर्पदंश होऊन दि.19/10/2009 रोजी गाय मृत्यू पावली आहे. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करण्यात आले. तसेच विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीने 'टॅग नॉट इन्टॅक्ट' कारण देऊन विमा क्लेम नाकारल्याचे कळविले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम रु.20,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दाखल केलेला टॅग तुटलेल्या स्थितीत असून त्यामुळे पॉलिसीच्या अट क्र.3 चा भंग होतो. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नाकारला असून तक्रारदार यांच्या तक्रारीस कारण घडलेले नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमा कंपनीचे दि.7/12/2009 चे पत्र पाहता, विमा कंपनीने प्रामुख्याने गाईचा टॅग सुस्थितीत नसल्याच्या कारणावरुन विमा रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्याचे दिसून येते आणि त्यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदर कथनास पुष्ठी दिलेली आहे. 5. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याबाबत कोणताही विवाद नाही. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म, पोस्टमार्टेम रिपोर्ट, वेटर्नरी सर्टिफिकेट, पंचनामा, विमा पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांची टॅग क्रमांक 15882 असलेली विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द होते. अशा परिस्थितीत, केवळ टॅग सुस्थितीत नाही, या कारणास्तव विमा क्लेम नाकारुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. 6. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्ट आहे. विमा कंपनीने ज्या अट क्र.3 चा भंग झाल्याचे नमूद करुन क्लेम नाकारला आहे, सदर अट विमा पॉलिसीचा एक भाग असल्याबाबत कोणतेही कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल केलेले नाहीत. वास्तविक पाहता, प्रत्येक पशुची ओळख पटविण्याकरिता पशुच्या कानामध्ये बिल्ला बसविला जातो आणि तोच त्यामागील स्पष्ट उद्देश आहे. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावलेली असताना व तक्रारदार यांनी त्या गाईचा बिल्ला दाखल केलेला असताना केवळ तो सुस्थितीत नाही, या एकमेव कारणास्तव विमा क्लेम नाकारता येणार नाही. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेमध्ये त्रुटी केली आहे आणि तक्रारदार विमा रक्कम क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून व्याजासह मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- दि.7/12/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/5910)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |