तक्रारदार : वकील श्री.बी.एन. अग्रवाल यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : --
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-
तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश
1. तक्रारदार ही कंपनी कायदा 1956 खाली नोंदविलेली कंपनी असून सा.वाले हे विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना वेगवेगळया मिटरप्रमाणे विद्युत पुरवठा केला होता. परंतु त्यांतील तिन विद्युत मिटरचा विद्युत पुरवठा सा.वाले यांनी अचानक बंद करुन टाकला. तक्रारदारांनी विद्युत पुरवठा पुर्वत सुरु करणेकामी केलेली विनंती सा.वाले यांनी नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. दाखल सुनावणीकामी तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदार ही कंपनी असून त्यांचे इमारतीमध्ये असलेले कार्यालय व भाडयाने दिलेल्या खोल्या मधील विद्युतमीटर बद्दलची प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले तिनही विद्युत मिटरची देयके असे दर्शवितात की, त्या विद्युत मिटर मधून विद्युत पुरवठा हा वाणीज्य व्यवसायाकामी पुरविला जात होता. कारण तिनही देयकावर कर्मशियल असे स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे.
3. त्यानंतर तक्रारदारांनी तक्रारीमध्ये बदल करणेकामी एक अर्ज दिला व त्यामध्ये असे कथन केले की, एक विद्युत मिटर उदवाहकाचे होते, दुसरे विद्युत मिटर हे संचालकांच्या बैठकी ज्या खोलीमध्ये होतात त्यामध्ये बसविण्यात आलेले होते. तर तिसरे मिटर हे पंखे व दिवे वापरणेकामी बसविण्यात आले होते. परंतु त्या खोलीमध्ये हाताने विणकाम करण्याचे काम केले जात होते. तक्रारदारांचे वकीलांनी असे कथन केलें की, तिसरे मिटर हे भाडयाने दिलेल्या खोलीमध्ये होते ज्यामध्ये भाडेकरु जागेचा वापर वरील प्रमाणे करीत असत. तक्रारदारांनी दाखल केलेंल्या त्या अर्जामध्ये असे नमुद केलेले आहे की, तक्रारदार कंपनी ही महापालिकेला करापोटी 3 लाखाचे वर रक्कम अदा करते. अर्जामध्ये असे कथन करण्यात आले आहे की, सा.वाले यांचेकडून विद्युत पुरवठा कंपनीचे स्वयंरोजगारासाठी व उपजिविकेचे साधन म्हणून घेण्यात आलेला होता.
4. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार ही कंपनी असून त्यांच्या ताळेबंदाची प्रत असे दर्शविते की, त्यांचे वार्षिक उत्पन्न 2006,2007,2008 या वर्षामध्ये 10 लाखाचे वर होते. तक्रारदार कंपनी ही एकल व्यवसायीक कंपनी नसून ती संचालकांनी चालविलेली कंपनी आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (डी) मध्ये वापरण्यात आलेले शब्द प्रयोग Self employment याची व्यप्ती तक्रारदार ज्या प्रमाणे करतात त्या प्रमाणे केली जाऊ शकत नाही. तक्रारदार कंपनी ज्या पध्दतीने विद्युत पुरवठा घेत होती व त्याचा वापर करीत होती ती अशी दर्शविते की, तक्रारदार कंपनी स्वतःचे उपजिविकेसाठी त्या विद्युत मिटरचा वापर करीत नव्हते. मुळातच Self employment व Earning livelihood हे शब्दप्रयोग एकल व्यवसायीक कंपनी किंवा व्यक्ती यांना लागू होतील. तक्रारदार कंपनी करीता ते लागू होणार नाही.
5. वरील चर्चेनुरुप असा निष्कर्ष नोंदविण्यात येतो की, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. सबब पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही, व ती रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.