निकालपत्र :- (दि. 12/05/2011) (सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या.) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू झालेली पोहोच कामात दाखल आहेत. सामनेवाला क्र.1 व 3 यांनी सदर मंचामार्फत पाठविलेली नोटीस स्विकारली नसलेने तसा शेरा मारुन लखोटे परत आलेले आहेत. सदरचे लखोटे प्रस्तुत कामी दाखल आहेत. तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सर्व सामनेवाला सदर मंचापुढे उपस्थित झाले नाहीत. लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब हे मंच त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीचे टेलिफोन कनेक्शनचे डिपॉझीटची रक्कम न दिलेने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :-अ) तक्रारदार हे रुकडी ता.हातकणंगले येथे कायमपणे राहतात. सामनेवाला क्र.1 ही कंपनी टेलिफोनची सेवा देण्याचा व्यवसाय करते. सामेनवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे कोल्हापूर येथील कार्यालय म्हणून कार्य करते. सामनेवाला क्र.3 हे प्रतिनीधी म्हणून कार्य करतो. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 चे सामनेवाला क्र.3 मार्फत टेलिफोन कनेक्शन घेतले होते. सदर फोनचा नं.(0230)3095453 होता. तो नं.(0230) 3295453 असा बदलून देणेत आला. सदर फोनचा टर्मिनल नं.आर.एल.सी.एफ.डब्ल्यु. 2001995626 होता. त्यासोबत अँटीना व चार्जर ही सामनेवाला यांनी पुरवीला. सदर टेलिफोन कनेक्शनसाठी तक्रारदाराकडून रक्कम रु.1,000/- डिपॉझीट म्हणून घेतले. त्याची सामनेवाला क्र.1 यांनी रिसीट नं. एसपी-00009030दि.05/5/2005 ने तक्रारदाराला दिली. सदर टेलिफोनचा घरगुतीसाठी तक्रारदार करत होते. सुरुवातीस सामनेवाला कंपनीने बिनशर्त कनेक्शन दिले. परंतु काही दिवसांनी सामनेवाला यांनी महिन्यास ठराविक रिचार्ज करणेचे बंधन घातले. तसेच त्याचा मुदतीत वापर न झाल्यास शिल्लक रिचार्ज बुडीत होणार असे सांगितले. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु केली. त्यामुळे तक्रारदाराची बरीच रिचार्ज रक्कम बुडू लागली व त्यांना नाहक तोटयास सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारदाराने टेलिफोन कनेक्शन बंद करणेचे ठरवले व तसे सामनेवाला क्र.3 यांना सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.3 यांनी सदर टेलिफोन टर्मिनल अॅंटीना व चार्जर अशा वस्तु दि;23/07/2008 रोजी जमा करुन घेतल्या व त्याची पावती क्र.441 तक्रारदारास दिली. 3 ते 4 महिन्यात सामनेवाला क्र.2 चे कार्यालयात डिपॉझीटपोटी जमा केलेली रक्कम मिळेल असे सांगितले. परंतु सामनेवाला क्र.2 यांचेकडे तक्रारदार डिपॉझीटची रक्कम मागणेस 25 ते 30 फे-या मारुनसुध्दा त्यांनी आज या, उदया या तुमची रक्कम महिन्याने मिळेल, दोन महिन्याने मिळेल अशी आश्वासने दिली. परंतु डिपॉझीटची रक्कम दिली नाही. याबाबत सामनेवाला क्र.3 शी संपर्क साधला असता तेही भेटण्यास टाळाटाळ करतात, मोबाईल नंबर बदलतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. तक्रारदारास प्रत्येक भेटीच्या वेळेस रु.50/- इतका खर्च येतो. तसेच तक्रारदारास शारिरीक, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरीक असतानासुध्दा त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने हेतुपुरस्सररित्या त्रास देत आहेत. ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी सर्व सामनेवाला यांना दि.27/12/2010 रोजी ए.पी.नाडगे या वकीलांमार्फत रजि.ए.डी.पोष्टाने नोटीस पाठवली. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी सदर नोटीस स्विकारली नाही. सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी नोटीस स्विकारली आहे. परंतु त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. किंवा तक्रारदाराची डिपॉझीटची रक्कमही परत केलेली नाही. सामनेवाला यांचा तक्रारदाराची डिपॉझीटची रक्कम हडप करणेचा उद्देश दिसून येतो. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराला सदोष सेवा देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर व्हावी व तक्रारदाराची डिपॉझीटची रक्कम रु.1,000/-,त्यावरील दोन वर्षाचे व्याज रु.250/-,प्रवास खर्चाची रक्कम रु.1,500/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, नोटीस खर्च रु.250/- असे एकूण रक्कम रु.53,000/- सामनेवालाकडून व्याजासह वसुल होऊन मिळावेत तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेली डिपॉझीटची पावती क्र.एसपी00009030, सामनेवाला क्र.3 यांचेकडे टेलिफोन कनेक्शन जमा केल्यानंतर त्यांनी दिलेली पावती क्र.441, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीसची स्थळपत, सदर नोटीस सामनेवाला यांना पाठविलेची पोष्टाची पावती क्र.1014, 1015, 1016, सामनेवाला क्र. 2 व 3यांना नोटीस पोहोचलेची रजि. ए;डी.पोहोच पावती, सामनेवाला क्र.1 यांनी नोटीस न स्विकारलेने परत आलेला लखोटा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र. 1 ते 3 हे प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. (05) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे,रिजॉइन्डर इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात 1. तक्रारीचा विलंब माफ करता येईल का? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- होय. 3. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने दि.14/02/2011 रोजी विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावर मे. मंचाने प्रस्तुत अर्ज अंतिम चौकशीवेळी निर्णित करणेत येईल असा आदेश पारीत केला आहे. दि.23/07/2008 रोजी तक्रारदाराचे PCO फोनचे टर्मिनेशन सामनेवाला यांनी केले आहे. सदर दिवशी तक्रारीस कारण घडले आहे. दि.23/07/2010 चे आत तक्रार दाखल केलेली नाही. प्रस्तुत तक्रार दि.14/02/2011 रोजी दाखल केलेला आहे. सबब अंदाजे 6 महिनेचा विलंब झालेला आहे. सदरचा विलंब हा सामनेवालांनी डिपॉझीटची रक्कम परत देतो अशा दिलेल्या हमीपोटी झालेला आहे. सबब प्रस्तुत विलंब माफ करणेस योग्य आहे. सबब तक्रारीस झालेला विलंब माफ करणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सर्व सामनेवाला यांना या मंचामार्फत नोटीस पाठवली असता सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू झालेची पोच पावती प्रस्तुत कामी दाखल केली आहे. परंतु सामनेवाला क्र. 1 यांनी नोटीस न स्विकारलेने रिफ्युज शे-यानिशी लखोटा परत आलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांनीही सदर इंटिमेशन देऊनही नोटीस न स्विकारलेने त्यांचाही लखोटा सदर शे-यानिशी परत आलेला आहे. सदर लखोटे प्रस्तुत कामी दाखल आहेत. सदर सर्व सामनेवाला हे प्रस्तुत कामी मे. मंचासमोर हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही व युक्तीवादही केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्राप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी रिसीट नं.एसपी-00009030 प्रमाणे दि.05/5/2005 रोजी रक्कम रु.1,000/-भरुन PCOफोनचे कनेक्शन घेतले होते. सदर फोनचा नं.(0230)3095453 होता. तो नं.(0230) 3295453 असा बदलून देणेत आला.सदर फोनचा टर्मिनल नं. आर.एल.सी.एफ.डब्ल्यु. 2001995626 होता. सदर कनेक्शन दि.23/07/2008 रोजी टर्मिनेट केले आहे. नियमाप्रमाणे सामनेवालांनी कनेक्शन टर्मिनेट केलेस तक्रारदारास त्याची स्विकारलेली डिपॉझीटची रक्कम परत करणे क्रमप्राप्त आहे. तरीही सामनेवालांनी सदर रक्कम परत केली नाही. डिपॉझीटची रक्कम रु.1,000/- मिळावेत म्हणून तक्रारदाराने सामनेवालांकडे बरेच हेलपाटे घातले. सरतेशेवटी दि. 27/12/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेली आहे. त्यास सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाही. तसेच तक्रारदाराने युक्तीवादाच्या वेळेस अशाच प्रकारचे तक्रारीमध्ये सामनेवालांनी त्यांच्या डिपॉझीटच्या रक्कमा अदा केलेल्या आहेत. मात्र मला रक्कम न दिलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे असे प्रतिपादन केले आहे. सबब डिपॉझीट रक्कम तक्रारदारास परत न करुन सामनेवालांनी सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदारास डिपॉझीट रक्कम रु.1,000/- व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास डिपॉझीटची रक्कम रु.1,000/- टेलिफोन कनेक्शन टर्मिनेट केले तारखेपासून म्हणजे दि.23/07/2008 पासून द.सा.द.शे. 6 टक्कके व्याजासह अदा करावी. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) त्वरीत अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |