निकालपत्र :- (दि.10/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर सामनेवालांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गतचा न्याययोग्य मृत्यू दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे टोप ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथील रहिवाशी असून नमुद गावी त्यांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सामनेवाला विमा कंपनी असून विमा व्यवसाय करते. ब) तक्रारदार यांचे वडीलांचा मुख्य व्यवसाय शेतीच होता व त्यांचे नांवे नमुद गावी गट नं.1605, 1613, 1513, 1599, 1138 व 1609 यासह शेतजमीनी होत्या. तक्रारदाराचे वडीलांचा विमा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत उतरविलेला आहे. त्याचा हप्ता शासनाने सामनेवाला कंपनीस अदा केला आहे. क) तक्रारदाराचे वडील मयत शामराव आबा पाटील हे दि.18/03/2007 रोजी आपल्या शेतातील मक्याची कणसे विक्री करुन सायकलवरुन परत येत असता अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तक्रारदाराचे नातेवाईक व मित्र यांनी तक्रारदाराचे वडीलांस सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे उपचारास नेले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तक्रारदाराचे वडील मयत झालेचे जाहीर करुन त्यांचा मृत्यूनंतरचा पंचनामा व शवविच्छेदन केले व तसा दाखला दिलेला आहे. नमुद अपघाताची शिरोली एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे नोंद होऊन अपघाताचा तपास पूर्ण केला आहे. पोलीसांनी नमुद अपघाताच्या तपासाअंती अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने अपघाती मृत्यू झालेचे निष्पन्न झालेचे नमुद केले आहे.तसेच सदरचे वाहन आढळून आलेले नाही.तदनंतर तक्रारदाराने आवश्यक त्या कागदपत्रांसह सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1कडे क्लेम मागणी केली होती. मात्र सामनेवालांनी क्लेम मंजूर होईल अशी ग्वाही देत होते. नमुद क्लेमबाबत सामनेवालांनी काहीही कळवले नसलेने तक्रारदाराने स्वत: व वकीलांमार्फत दि.13/08/2009 रोजी नोटीस पाठवली. सदर नोटीसीबाबत आजतागायत काहीही कळवलेले नाही. तसेच क्लेमची रक्कमही दिलेली नाही.क्लेमबाबत विनाविलंब सेवा पुरविण्याची जबाबदारी सामनेवालांची होती व आहे. सदरची सेवा सामनेवालाने न पुरवून सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे गरीब शेतकरी असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता व आहे. वडीलांचे अपघाती निधनानंतर तक्रारदाराचे मनावर आघात झाला होता. तक्रारदारावर त्याचे सर्व कुटूंबाची जबाबदारी आहे. सदर क्लेम न मिळालेस त्यांचे कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर व्हावी व अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ खबरी जबाब, वर्दी जबाब, मरणोत्तर पंचनामा, पोलीस अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, नमुद शेतजमिनीची 7/12 उतारे, सामनेवालांना पाठविलेली नोटीस, नोटीसीची पावती व त्यांची पोहोच इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत.
(4) सामनेवालाने दाखल केलेल्या म्हणणेनुसार तक्रार अर्ज व त्यातील चुकीची व वस्तुस्थितीस सोडून आहेत ती सामनेवाला यांना मान्य नाहीत. तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. नमुद तक्रार अर्जामध्ये सामनेवाला विमा कंपनीने तथाकथीत क्लेम नाकारलेबाबत कोणताही उल्लेख दिसून येत नाही. तसेच क्लेम नाकारलेचेही दिसून येत नाही. यावरुन जोपर्यंत सामेनवाला कंपनी जोपर्यंत क्लेम नाकारत नाही तोपर्यंत तक्रार अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण नाही. सामेनवाला कंपनीने अदयापपर्यत क्लेम नाकारला नलसेने प्रस्तुतच्या अर्जास कारण घडलेले नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. सबब नामंजूर करावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.
सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे वडील मयत शामराव पाटील यांचा मृत्यू अज्ञात वाहनाने ठोकर देऊन झाला असेल तर नुकसान भरपाईबाबतचा क्लेम प्रस्तुत मंचात चालणेस पात्र नाही;तर तो वाहन कायदयातील तरतुदीनुसार दाखल होणे आवश्यक होता व आहे. याबाबतची माहिती तक्रारदाराने आपल्या अर्जात दिलेली नाही.तसेच नमुद नुकसानभरपाई मागणीकरता पॉलीसी कालावधीतच क्लेम करणे आवश्यक आहे व सदरचा क्लेम मुदतीनंतर दाखल केलेला आहे. सबब प्रस्तुतचा क्लेम नामंजूर केलेला आहे व तो बरोबर व कायदेशीर आहे. सबब प्रस्तुतचा अर्ज चालणेस पात्र नाही व तो खर्चासह नामंजूर करावा अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची सत्यप्रत दाखल केली आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार सदर मंचास चालणेस पात्र आहे का?--- होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे का? --- होय. 3. तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत का ? --- होय. 4. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे वडील शामराव आबा पाटील यांचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता तसेच प्रस्तुतचा विमा हा महाराष्ट्र शासनांतर्गतशेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली उतरविला होता हे सामनेवालांनी मान्य केलेले आहे. मात्र प्रस्तुतचा वाद हा अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे क्लेम मोटर वाहन कायदयातील तरतुदीप्रमाणे दाखल होणे आवश्यक होते व आहे सबब सदरची तक्रार मंचात चालणेस पात्र नाही असे प्रतिपादन केलेले आहे याचा विचार करता नमुद योजनेअंतर्गत येणा-या विमा दाव्याबाबत विमा कंपनीने केलेल्या सेवात्रुटीबाबतचे अनेक निर्णय ब-याच प्रकरणात पारीत केलेले आहेत.प्रस्तुत अपघातातील विमा रक्कम ही नमुद योजनेअतंर्गत विमा पॉलीसीबाबत असलेने मोटर वाहन कायदयाच्या तरतुदीचा संबंध येथे येत नाही. सबब प्रस्तुतची तक्रार चालवणेचे अधिकार क्षेत्र या मंचास येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवालांनी मयत शामराव आबा पाटील यांची विमा पॉलीसी मान्य केलेली आहे. तक्रारदाराचे वडील शेतातील कणसे विक्री करणेसाठी गेले होते व येताना एम.आय.डी.सी.कडून टोप गावी सायकलवरुन येत असताना हायवे रोडवर शिये फाटा येथे शिरोली ते वाठार येथे जाणा-या अज्ञात वाहनाची ठोकर बसून त्यांचे डोक्यास व डाव्या पायास गंभीर दुखापत होऊन जागीच मयत झालेचे खबरी जबाब, वर्दी जबाब, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला यावरुन निर्विवाद आहे. मरणोत्तर पंचनाम्यामध्ये डोके फुटून मेंदू व मांस बाहेर आले आहे व डोक्यावरील चमडे निघालेली आहे, उजवा हात कोपरात वाकून पोटावर आहे. डावा हात कोप-यातून वाकलेला उजवा पाय गुडघ्यात वाकलेला, डावा पाय गुडघ्यात वाकून घोटयावर हाड बाहेर आलेचे नमुद केलेले आहे. डोक्यास गंभीर दुखापत झालेमुळे शामरावा आबा पाटील मयत झालेचे त्यांचे मृत्यूचा कारणाचा दाखला व शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होते. त्यांचे नांवे शेतजमिनी असल्याबाबतचा गट नं.1509, 1613, 1513, 1138, 1599,1609, इत्यादी शेतजमिनीच्या 7/12 उता-यावरुन नमुद विमा धारक शेतकरी होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. दि.13/08/2009 रोजी तक्रारदाराने वकील मोहिते यांचेमार्फत सामनेवाला यांना पाठविलेल्या नोटीसीमध्ये-नमुद कागदपत्रांसह तहसिलदार हातकणंगले यांचेमार्फत नुकसानमागणीचा अर्ज केलेला होता.तसेच सदर क्लेमसोबत योग्य ती कागदपत्रे पाठवून दिलेली होती व दि.08/07/2009 रोजी विचारणा करणारे पत्र पाठवलेले होते. त्यावेळी सामनेवाला क्र.1 चे अधिकारी श्री जोशी यांनी क्लेम फॉर्म गहाळ झालेबाबत तोंडी उत्तर दिले. त्यावेळी सामनेवाला क्र.2 यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सामनेवाला क्र;1 कडे जावक क्र.346 दि.25/12/2008 रोजी क्लेम फॉर्म व सर्व कागद पाठवलेचे सांगितले.तदनंतर सामनेवाला क्र.1 यांना याची माहिती दिली असता पुन्हा क्लेम फॉर्म व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे दि.24/07/2008 रोजी पाळंदे कुरिअर यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 यांचे मागणीनुसार क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती पाठवल्या आहेत. नमुद नोटीस दि.13/08/2009 ची असून ती सामनेवालां यांना दि.17/08/2009 रोजी मिळालेली आहे. सदर नोटीसला सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाही. याचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांना कागदपत्रे पाठवूनही आजतागायत क्लेम अर्ज मंजूर करुन त्याची विमा रक्कम दिलेली नाही. सदर वस्तुस्थिती निर्विवाद आहे तसेच सामनेवाला आपल्या म्हणणेमध्ये एका बाजूस सदर क्लेमबाबत अदयापही कंपनीने क्लेम नाकारला नसलेने सदर तक्रारीस कारणच घडलेले नाही असे म्हणतात तर दुस-या बाजूस मुदतीत क्लेम दाखल केला नसलेने क्लेम नामंजूर केला आहे असे प्रतिपादन करतात. शासनाच्या नमुद परिपत्रक क्लॉज 9 प्रमाणे विमा प्रस्तावा ब्रोकर/ विमा सल्लागार कंपनीमार्फत विहीत केलेल्या सर्व कागदपत्रांसह प्राप्त झालेपासून सामनेवाला क्र.1 कंपनीने एक महिन्याच्या कालावधीत दाव्याची रक्कम अदा करणे बंधनकारक राहील असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. नमुद नोटीसीतील मजकूराप्रमाणे सामनेवाला क्र.2 कबाल इन्शुरन्स यांनी योग्य त्या कागदपत्रांसह क्लेम पाठवून दिलेला आहे. तदनंतरही तक्रारदाराने दि.24/07/2008 रोजी पुन्हा कागदपत्रे पाठवूनही सामनेवालांनी क्लेम मंजूर अथवा नामंजूर बाबत तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल होईपर्यंत काहीही कळवलेले नाही ही त्यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 हे ब्रोकर व सल्लागार कंपनी असलेने विमा रक्कम देणेबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब आदेशीत रक्कम देणेची जबाबदारी सामनेवाला क्र;1 यांची असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- मुद्दा क्र. 1 व2 मधील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता नमुद योजनेअंतर्गत पॉलीसीच्या नियमाप्रमाणे विमाधारकाचा अपघाती मृत्यू झालेमुळे प्रस्तुतचा क्लेम मंजूर होणेस पात्र आहे. मयत शामराव आबा पाटील यांचे सरळ वारस बेनीफिशरी या नात्याने पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत कारण सामनेवालांच्या वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस नमुद क्लेम अदा करणेबाबत सामनेवालांवर जबाबदारी आलेस तक्रारदार हे एकमेव सरळ वारस असतील असे नाही अन्य वारस असलेस नमुद क्लेम रक्कम कोणास अदा करावी याबाबत वाद उत्पन्न होऊ शकतो. सबब सदरचा वाद टाळणेसाठी विमाधारक मयत शामराव आबा पाटील यांचे वारसाबाबत वारसा दाखला दिलेस क्लेम देणेस अडचण येणार नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता असा वादउत्पन्न होऊ नये म्हणून प्रस्तुत तक्रारदारांनी मयत शामराव आबा पाटील यांचे अस्तित्वात असलेल्या सरळ वारसांचा वारस दाखला सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेनंतर प्रस्तुत विमा रक्कम व्याजासह सामनेवाला विमा कंपनीने अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास वेळेत क्लेम मंजूर अथवा नामंजूर हे सामनेवालांनी त्याला कळू शकले नसलेने विमा रक्कम मिळू शकली नसलेने तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेने तक्रारदार तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने, तक्रारदाराने त्यांना वारसा दाखला दिल्यानंतर पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,,000/-(रु.एक लाख फक्त), दि.24/07/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने अदा करावेत.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |