(घोषित दि. 22.02.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती अनिल बनारसीदास जिंदल हे स्कोडा फॅबीया कार क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 चे मालक होते. तिच्या पतीने सदर कारचा गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 12.01.2009 ते 11.01.2010 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता. तिच्या पतीचे निधन झालेले असुन विमा कालावधीमध्ये तिच्या पतीच्या कारचा अपघात झाला आणि अपघातामध्ये कारचे प्रचंड नुकसान झाले. म्हणून तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनीने तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर पतीच्या नावावर असलेले वाहन पतीच्या निधनानंतर तिन महिन्याच्या आत तिच्या स्वत:च्या नावावर हस्तांतरीत केले नाही असे चुकीचे कारण देऊन तिचा विमा दावा फेटाळला. वास्तविक तिच्या पतीच्या निधनानंतर पतीचे वारस म्हणून पतीचे नावावर असलेल्या वाहनाच्या नुकसानीबद्दल विमा रक्कम मिळण्यास ती पात्र आहे. विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, विमा कंपनीकडून विम्याची रक्कम रुपये 6,02,000/- मानसिक त्रास, तक्रारीचा खर्च आणि इतर खर्च नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले.त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार स्वत: त्यांची ग्राहक नाही. तक्रारदाराचे पती अनिल जिंदल यांनी त्यांचे वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 चा विमा उतरविलेला होता. तक्रारदाराने सदर वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 चे अपघातामध्ये नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला होता. परंतू तक्रारदाराने तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर नियमानुसार तिन महिन्याच्या आत पतीच्या नावावर असलेले वाहन तिच्या नावावर हस्तांतरीत केले नाही. अपघात झाला त्यावेळी वाहनाची नोंद मयत अनिल जिंदल यांच्या नावाने होती. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला असुन, तिला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.व्ही.एस.करंडे आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड. पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने तिच्या पतीच्या नावाने असलेली कार क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 चा अपघातामध्ये नुकसान झाले म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता. तो विमा दावा विमा कंपनीने दिनांक 08.04.2010 रोजी फेटाळला आहे. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, वाहनाच्या मालकाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांनी वाहनाचे हस्तांतरण तिन महिन्याच्या आत करुन घेणे आवश्यक आहे. त्यानुसार तक्रारदाराने तिच्या पतीच्या नावावर असलेले वाहन तिच्या पतीच्या निधनानंतर तिन महिन्याच्या आत स्वत:च्या नावावर करुन घेतलेले नाही. त्यामुळे वाहनाच्या विम्याबाबत तक्रारदाराचा कोणताही अधिकार उरलेला नव्हता. म्हणून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदाराचे पती अनिल बनारसीदास जिंदल यांचे दिनांक 22.03.2009 रोजी निधन झालेले आहे. तक्रारदाराने त्याबाबतचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 ची नोंदणी तक्रारदाराचे पती मयत अनिल जिंदल यांच्या नावाने होती. वाहन धारक मयत अनिल जिंदल यांचे दिनांक 22.03.2009 रोजी निधन झाल्यानंतर तक्रारदाराने वाहनाची नोंद वारस म्हणून स्वत: च्या नावाने करुन घेण्याबाबत सेंट्रल मोटार व्हेइकल रुल्स 1989 मधील नियम 56 नुसार तिन महिन्याच्या आत करुन घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वाहनाचा अपघात दिनांक 29.12.2009 रोजी झाल्याचे घटनास्थळ पंचनाम्यावरुन दिसुन येते. अपघात झाला त्यावेळी देखील वाहनाची नोंद मयत अनिल जिंदल यांच्याच नावाने होती. विमा कंपनीचा करार मयत अनिल जिंदल यांच्या सोबत करण्यात आलेला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो करार आपोआप रद्द झालेला आहे. तक्रारदाराने जर तिचे पती अनिल जिंदल यांच्या मृत्यूनंतर तिन महिन्याच्या आत वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 ची नोंद स्वत:च्या नावाने करुन घेतली असती आणि वाहनांचे हस्तांतरण तिच्या नावाने झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत विमा कंपनीकडे वाहनाच्या हस्तांतरणाबाबत सुचना दिली असती तर वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही – 0269 संदर्भात गैरअर्जदार विमा कंपनीकडे मयत अनिल जिंदल यांनी उतरविलेला विमा तक्रारदाराच्या नावाने हस्तांतरीत झाला असता आणि तक्रारदाराला वाहनाच्या विमा पॉलीसीचा लाभ मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असता. परंतू तक्रारदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर वाहनाचा अपघात होईपर्यंत वाहनाची नोंद स्वत:च्या नावे करुन घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराला वाहनाच्या विमा पॉलीसीचा लाभ मिळू शकत नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळला असुन, विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | |