निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी टाटा सुमो, स्पेशिओ गोल्ड ही गाडी खरेदी केली होती व त्याची पॉलिसी जाबदेणारांकडून घेतली होता. सदरची पॉलिसी ही कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी होती
व तिचा कालावधी दि. 16/4/2010 ते 15/4/2011 असा होता आणि रक्कम रु. 3,18,938/- इतकी सम अॅशुअर्ड होती. दि. 14/8/2010 रोजी पुणे-सोलापूर रोडवरील कासुर्डे टोल नाक्याजवळून चोरीला गेली. गाडीच्या ड्रायव्हर श्री निलेश जाधव याने त्याच दिवशी लोणीकंद पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. त्यानंतर ही तक्रार यवत पोलिस स्टेशन येथे ट्रान्सफर झाली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या गाडीमध्ये सर्व मुळ कागदपत्रे होती, ती चोरीला गेल्यामुळे तक्रारदारांनी ड्युप्लिकेट कागदपत्रे काढली. चोरीला गेलेले गाडी सापडली नाही, म्हणून त्यांनी ऑगस्ट 2010 मध्ये जाबदेणारांकडे क्लेम दाखल केला. त्यानंतर दि. 25/12/2010 रोजी तक्रारदारांना जाबदेणारांचे पत्र मिळाले, त्यामध्ये जाबदेणारांनी, ड्रायव्हर सदरची गाडी Hire or reward बेसिसवर चालवित होते, म्हणून क्लेम नाकारण्यात येतो असे नमुद केले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तरी जाबदेणारांनी त्यांचा क्लेम नामंजूर केला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 3,18,938/- द.सा.द.शे. 12% व्याजदराने व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे व मा. राष्ट्रीय आयोगाचा निवाडा दाखल केला आहे.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले परंतु त्यांचा लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध नो-से आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांची गाडी
दि. 14/8/2010 रोजी कासुर्डे येथून चोरीला गेली, म्हणून त्यांच्या ड्रायव्हरने लोणीकंद पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. त्यामध्ये “दि. 14/8/2010 रोजी पहाटे 5.15 ते 6.15 वा चे दरम्यान पुणे दरम्यान पुणे सोलापूर रोडने बाजूकडे जात असताना कासुर्डी फाटा येथील टोलनाक्याचे पुढील बाजूस गाडी अनोळखी सहा चोरट्यांनी अडवून त्यामध्ये बसवून, गळ्याला चाकु लावून गाडीतुन मागेल सिटवर ओढून घेवून तोंड दाबून डोळ्याला रुमाल बांधून खिशातील रोख रक्कम रु. 20,000/-, लेदरचे पाकीटमधील ड्रायव्हिंग लायसेन्स व तीन हजार रुपये व मोबाईल, असे जबरीने काढून लोणेकंद जवळील माळरानावर हातपाय बांधून सोडून देवून गाडी घेऊन गेले” असे नमुद केले आहे. तक्रारदार या गाडीची सम अॅशुअर्ड रक्कम रु. 3,18,938/- जाबदेणारांकडून मागतात. जाबदेणारांनी तक्रारदारांचा क्लेम दि. 25/12/2010 रोजी, कागदपत्रांच्या आधारे अपघाताच्या वेळी ड्रायव्हर सदरची गाडी कमर्शिअली वापरत होते, म्हणून नामंजूर केला आहे. वास्तविक पाहता, तक्रारदारांच्या गाडीचा अपघात झालेला नव्हता, तर त्यांची गाडी चोरीला गेलेली होती. तक्रारदारांचा ड्रायव्हर सदरची गाडी कमर्शिअली वापरत होते याकरीता कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही, तसेच त्यांनी लेखी जबाबही दाखल केला नाही. त्यामुळे जाबदेणारांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला, असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी एप्रिल 2007 मध्ये गाडी खरेदी केली हे टॅक्स इन्व्हाईसवरुन दिसून येते. म्हणून मंच जाबदेणारांना असा आदेश देते की, त्यांनी दोन वर्षाचे डेप्रिसिएशन वजा करुन तक्रारदारास त्यांच्या क्लेमची रक्कम द्यावी.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारांना त्यांच्या गाडीचे दोन वर्षाचे
डेप्रिसिएशन वजा करुन उर्वरीत क्लेमची रक्कम
द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 14/8/2010 पासून
ते रक्कम अदा करेपर्यंत व रक्कम रु. 1000/-
तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून चार आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.