जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २४/०९/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/०४/२०१४
श्री. महेंद्र दिनकरभाई गुरव, उ.व.३०,
धंदा – व्यवसाय,
राहणार – अे/४, श्रीरंग गेट, अहमदाबाद,
तालुका व जिल्हा – अहमदाबाद. ..…........ तक्रारदार
विरुध्द
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
पुष्पम प्लाझा, तळमजला, १३५/ब,
ताडीवाला रोड, पुणे, तो.जि.
पुणे – ४११००१. ............. सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवाला तर्फे – अॅड.श्री.डी.एन. पिंगळे)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री. एस.एस. जोशी)
१. सामनेवाले यांच्याकडून वाहनाचा विमा दावा मिळावा यासाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२ अन्वये सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी नवीन तवेरा वाहन विकत घेतले होते. त्याचा चेसीस क्रमांक GJ-01-KH-0175 असा आहे. या वाहनाचा विमा त्यांनी सामनेवाले यांच्याकडून उतरविला होता. त्याचा कालावधी दि.०४/०२/२०११ ते ०३/०२/२०१२ असा होता. दि.१६/११/२०११ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला मौजे खेडे, ता.जि.धुळे या शिवारात समोरून येणा-या टाटा सुमोने जोरदार धडक दिली. त्यात तक्रारदार यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. हे वाहन नाशिक येथील जितेंद्र व्हील्स प्रा.लि. यांच्याकडून दुरूस्त करण्यात आले. त्याचा खर्च सुमारे रूपये ४,००,०००/- एवढा आला. ही रक्कम देण्यास सामनेवाले टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सुमारे रूपये १,००,०००/- चे मानसिक व शारीरिक नुकसान झाले आहे. वरील दोन्ही रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळावेत, अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीसोबत अपघाताची खबर, घटनास्थळ पंचनामा, वाहन दुरूस्तीचे बिल, जितेंद्र व्हील्स यांच्या पावत्या या कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. या खुलाशात सामनेवाले यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी, लबाडीची आहे. विमा पॉलीसी हा एक करार असून तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. सदरील तक्रार ही कंपनीच्या अकार्यक्षमतेबददल असून ती बेकायदेशीर आहे. कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी सदर तक्रारीस लागू होत नाही. तक्रारदार हा अहमदाबाद येथील राहणारा असून पॉलीसी त्याच भागातील असल्याने सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. सदर वाहनाची प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी असून त्यात वाहनाचा वापर फक्त घरगुती व वैयक्तिक वापरासाठी करता येतो. सदर प्रकरणात फिर्याद, पंचनामा पाहता सदरचे वाहन हे प्रवासी वाहतुकीकरीता वापरले आहे व त्यात क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत होत्या. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवालेंची नाही, असे खुलाशात म्हटले आहे. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
५. सामनेवाले यांनी आपल्या खुलाशासोबत वाहनाचा सर्व्हेक्षण अहवाल दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा आणि त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी सर्वात महत्वाचा मुददा उपस्थित होतो, तो म्हणजे सदरच्या तक्रारीवर न्याय निवाडा करण्याचा या मंचास अधिकार आहे का ? आणि सविस्तर विचाराअंती या प्रश्नाचे उत्तर आम्हाला नाही असेच मिळते.
७. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत तक्रारदार यांचा पत्ता अे/४, श्रीरंग गेट, अहमदाबाद, तालुका व जिल्हा अहमदाबाद असा दिला आहे. तर सामनेवाला यांचा पत्ता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, पुष्पम प्लाझा, तळमजला, १३५/ब, ताडीवाला रोड, पुणे, ता.जि. पुणे – ४११००१ असा दिला आहे.
ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल होणारी तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ११ मधील तरतुदीनुसार दाखल केली जाते. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम ११(२) मध्ये जिल्हा मंचाची अधिकारिता स्पष्ट केली आहे. या कलमातील उपकलमे (अ), (ब) व (क) पुढील प्रमाणे आहेत.
(अ) विरूध्द पक्ष किंवा ते एकापेक्षा अधिक असल्यास विरूध्दपक्षांपैकी प्रत्येक व्यक्ती फिर्याद दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहात असेल २[किंवा व्यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल] किंवा लाभासाठी व्यक्तिशः काम करीत असेल, किंवा
(ब) विरुध्द पक्ष एकापेक्षा अधिक असल्यास त्यापैकी कोणीही, फिर्याद दाखल करण्याच्यावेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहात असेल, २[किंवा व्यवसाय करीत असेल किंवा शाखा कार्यालय असेल] किंवा लाभासाठी व्यक्तिशः काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्या राहात नसीतल १[किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल] किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्वे लाभासाठी व्यक्तिशः काम करीत नसतील अशा विरूध्द पक्षानी फिर्याद दाखल करण्यास मूक संमती दिली असेल; किंवा
(क) वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागशः घडले असेल;
अशा जिल्हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्यात येईल.
वरील तरतुदींमधे तक्रारदार हे बसत नाहीत, असे मंचाचे मत बनले आहे.
८. दि.१६/११/२०११ रोजी धुळे तालुक्यातील खेडे गावाच्या शिवारात तक्रारदार यांच्या वाहनाला अपघात झाला. त्याचा आधार घेवून तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे. तथापि या मंचात तक्रार दाखल करण्यासाठी अपघाताच्या घटनेचा आधार घेता येणार नाही, असे आमचे मत आहे. अपघाताची घटना ही ‘कॉज ऑफ अॅक्शन’ ठरत नाही, म्हणुनच अपघाताची घटना धुळे हददीत घडली असेल तरी मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होत नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.
९. वाहनाच्या विमा दाव्याची रक्कम देण्यास सामनेवाले टाळाटाळ करीत आहेत, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी विमा दावा देण्याचे नाकारले आहे, असे त्यांनी नमूद केलेले नाही किंवा विमा दावा नाकारल्याचे कोणतेही पत्र, दस्तऐवज दाखल केलेला नाही. यावरून तक्रार दाखल करण्यास काही कारण घडले हेही स्पष्ट होत नाही.
१०. वरील मुददयांचा विचार करता, ज्या विषयी न्यायनिवाडा करण्याचे या मंचास अधिकारक्षेत्र नाही व ज्या तक्रारीसाठी कारणच घडलेले नाही त्या तक्रारीविषयी सामनेवाले यांना कोणतेही आदेश करणे योग्य होणार नाही, असे आम्हाला वाटते. याच कारणामुळे आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दि.२३/०४/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.