जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –142/2011 तक्रार दाखल तारीख –12/09/2011
श्रीमती मंदाकीनीबाई भ्र.अर्जून मुळे
वय 33 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.राजेवाडी ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं. राज अपार्टमेंट, सिडको,औरंगाबाद. .सामनेवाला
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.पावसे.
सामनेवाला क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती अर्जून मूळे यांचा मृत्यू दि.07.10.2008 रोजी संर्पदंशाने झाला. ते व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचा प्रस्ताव अर्ज तालूका कृषी अधिकारी यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे दाखल केला. सामनेवाला क्र.1 कडे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सर्व कागदपत्रे संकलीत करुन सामनेवाला क्र.1 व2 कडे पाठविण्यात आला. परंतु त्यांनी विमा रक्कम आजपर्यत मंजूर केली नाही. त्यांनी सेवेत त्रूटी केल्याने तक्रारदारांना आर्थिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- ची मागणी केली आहे.
विनंती की, तक्रारदारास रक्कम रु.1,00,000/- 10 टक्के व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत. सामनेवाला क्र.2 यांनी विमा दावा सामनेवाला क्र.1 कडे पाठवून त्वरीत निर्णय दयावा असे आदेश व्हावेत, मानसिक, आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चापोटी रु.5,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत. सोबत विलंबाचा अर्ज व शपथपत्र दाखल आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.22.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात श्री.अर्जून मूळे रा.राजेवाडी ता.माजलगांव यांचा अपघात दि.7.10.2009 रोजी झाला. त्यांचा दावा दि.2.4.2008 रोजी अपूर्ण कागदपत्र उदा. क्लेम रिपोर्ट, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल अपूर्ण काग्रदपत्रासह मिळाला. त्याबाबत दि.2.2.2010 रोजी आणि स्मरणपत्र दि.2.3.2010 रोजी दिले. सदरचा दावा हा रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी कडे दि.21.7.2010 रोजी अपूर्ण दावा म्हणून परत शे-याने पाठविला. तक्रारदारांना विमा कपनीने दि.23.6.2010 रोजी वरील प्रमाणे अपूर्ण कागदपत्राच्या मागणी बाबत पत्र दिले. तक्रारदार यांनी कागदपत्राची पूर्तता न केल्याने विमा कंपनीने दि.24.11.2010 रोजी दावा बंद केला.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.3.1.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सदरचा दावा हा विलंबाने सामनेवालाकडे पाठविला आहे. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दिले असल्याचे रेकार्ड वरुन दिसत नाही. आक्षेपित अपघाताला एक वर्षाचे कालावधीपेक्षा जास्त कालावधी झाला त्यात कागदपत्रही अपूर्ण आहेत ती वेळेत मिळाली नाहीत म्हणून तक्रार मूदतबाहय आहे. तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचा खुलासा,शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती श्री. अंकूश मुळे यांचा मृत्यू संर्पदंशाने दि.07.10.2008 रोजी झाला आहे. त्या बाबत पोलिस स्टेशनला माहीती देण्यात आलेली आहे. पोलिसांनी शवाचा पंचनामा केलेला आहे. उपचार करणा-या डॉक्टरांनी मृत्यूचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आलेले नाही. या बाबत धर्मराज कारभारी मुळे मयताचा भाऊ यांनी पोलिस कॉंस्टेबल
श्री. बी.एम. सयद यांना लिहून दिलेले आहे. ताबा पावती दि.7.10.2008 रोजीची लिहून दिलेली आहे. सदर प्रकरणात मयताचे शवविच्छेदन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल नाही. तसेच रासायनिक प्रयोगशाळेचा अहवालाचा प्रश्नच येत नाही. सामनेवाला यांनी सदरची दोन कागदपत्राचे कागदावरुन दावा नाकारला आहे. जी कागदपत्रे अस्तित्वात नाही ती कागदपत्रे तक्रारदार देऊ शकत नाही. या संदर्भात तक्रारीतील कागदपत्रे दि.31.10.2008 रोजीचे श्री. बी.एम.सयद बक्कल नंबर 347, सिडको औरंगाबाद यांचे पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन दिद्रूड ता.माजलगांव यांनी दिलेले पत्र पाहता उपचार करणा-या डॉक्टरांनी मयताचे कारण साप चावल्याने सेप्टीक कंडिशन मध्ये मरण आले बाबतचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात शवविच्छेदन करण्यात आलेले नाही.
यात तक्रारदाराचा कोणताही दोष दिसत नाही. तसेच परिपत्रकानुसार वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र, नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार सदरचे प्रमाणपत्र असल्याने त्यात मृत्यूचे कारण नमूद असल्याने व सदरचे कागदपत्र हे सामनेवालाकडे पाठविले असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने नाकारला असे म्हणता येणार नाही.
या संदर्भात तक्रारदारांनी विलंबाचा अर्ज दाखल केलेला आहे. या बाबत विचार करता दि.7.10.2008 रोजी अर्जून मूळे चा मृत्यू झालेला आहे. दि.12.09.2011 रोजी तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला क्र.2 ने दावा दि.24.11.2010 रोजी नाकारलेला आहे. एकूण दिनांकाचा विचार घेता व या बाबतचा तक्रारदाराच्या विलंबाच्या अर्जा बाबत विचार करता जरी मृत्यू 2008 साली झाला तरी कागदपत्राअभावी विमा कंपनीने दावा दि.24.11.2010 रोजी दाखल केलेला आहे. तक्रार दि.11.08.2011 रोजी दाखल झालेला आहे. म्हणजे दावा नाकारल्यापासून मूदतीत दाखल झालेला आहे. सदरची तांत्रिक बाब तक्रारदाराने विलंब अर्जात नमूद केलेली नाही व योग्य व सबळ कारणे विलंब अर्जात नमूद केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे आहे व त्या बाबत हरकत आहे, परंतु विलंबाची तांत्रिक बाबीचा विचार करता मूळात दि.24.11.2010 रोजी दावा नाकारल्यानंतर तक्रारदारांना दोन वर्षाचे आंत तक्रार दाखल करता येते. त्यामुळे सदरची हरकत याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील विवेचनाप्रमाणे जे कागदपत्र नाहीच त्या कागदपत्राची मागणी करुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा तांत्रिक बाबीवर नाकारल्याचे दिसते. सदरचा दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रु.3,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक
महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत न
दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार दाखल
दि.11.08.2011 पासून पूर्ण रक्कम पदरीपडेपर्यत सामनेवाला क्र.2
जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.3000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड