(मंचाचे निर्णयान्वये, अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,प्रभारी)
(पारीत दिनांक : 26 नोव्हेंबर 2009)
1. अर्जदाराने, सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदाराने दिनांक 10/10/2005 रोजी शेतीचे उपयोगाकरीता वर्मा ट्रॅक्टर साकोली यांचेकडून भारतीय स्टेट बँकेमार्फत कर्ज घेवून आयशर कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतला व त्याचा पंजिकरण आर.टी.ओ. गडचिरोली यांचेकडून करण्यात आला, त्याचा क्र. एम.एच.33-9810 असा आहे. अर्जदाराने ट्रॅक्टरचा विमा गैरअर्जदाराकडून काढला असून
.. 2 .. ग्रा.त.क्र.10/2009.
त्याचा पॉलीसी क्र. 1705382343100023 असा असून विमा कालावधी 19/12/2007 ते 18/12/2008 असा आहे. दिनांक 28/12/2007 रोजी मौजा गोढनगांव येथे ट्रॅक्टरवर थ्रेशर मशीन लावून धानाचे चुरणे सुरु असतांना अचानक आग लागून थ्रेशर मशिन व ट्रॅक्टर जळला. त्याचा रिपोर्ट कुरखेडा पोलीस स्टेशन येथे व गैरअर्जदाराच्या कार्यालयाला करण्यात आला.
3. गैरअर्जदाराकडून श्री पोद्दार यांना सर्व्हेअर नियुक्त करण्यात आले. त्यांनी मोक्यावर येवून जळालेला ट्रॅक्टर व मशिनचे फोटो घेतले व ट्रॅक्टर दुरुस्त करण्याची सुचना दिली. त्यानुसार, अर्जदाराने आयशर कंपनीचा अधिकृत विक्रेता वर्मा ट्रॅक्टर,साकोली यांचेकडे ट्रॅक्टर दुरुस्तीला टाकला. वर्मा ट्रॅक्टर यांनी दिनांक 17/5/2008 रोजी रुपये 1,73,369/- चा मोबदला घेवून ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिला. गैरअर्जदार यांनी, श्री ए.एन. पोलके यांना दूसरा सर्व्हेअर नियुक्त केले, त्यांनी दुरुस्ती डिलरकडे जावून ट्रॅक्टरची तपासणी करुन त्याचा रिपोर्ट विमा कंपनीकडे सादर केला. श्री पोद्दार यांनी अंतिम सर्व्हे करुन तसा रिपोर्ट कंपनीकडे सादर केला. सदर रिपोर्टची प्रत अर्जदारास दिली नाही व त्याबद्दल माहितीही दिली नाही. सर्व्हेअर हे विमा कंपनीने नियुक्ती केलेले असतात व विमा कंपनीकडून सर्व्हेअरला सतत काम मिळत असते, त्याअनुषंगाने रक्कम सुध्दा मिळत असते. यामुळे, साहजीकच सर्व्हेअरचा झुकाव विमा कंपनीकडे राहतो आणि म्हणूनच आकारणी करतांना विमा धारकाला आपली बाजू मांडण्याची संधी देणे योग्य व आवश्यक आहे. अर्जदाराने ट्रॅक्टर अपघातानंतर घटनेची सूचना गैरअर्जदारास दिल्यानंतर सर्व्हेअर कडून ट्रॅक्टरला झालेल्या नुकसानीची खातरजमा करुन घेतली. ट्रॅक्टर दुरुस्त झाल्यानंतर क्लेम फार्म, घटनास्थळ पंचनामा, दुरुस्तीचे खर्चाचे मुळ बिल व पॉलीसीची झेरॉक्स गैरअर्जदाराकडे दिनांक 17/5/2008 रोजी दाखल केली. अर्जदाराने वारंवार विमा क्लेमसाठी पाठपुरावा केल्यानंतर गैरअर्जदाराकडून कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे दिनांक 18/8/2008 रोजी अर्जदाराने पंजिबध्द डाकेने अर्ज पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावरही गैरअर्जदाराने काहीच कार्यवाही केलेली नसल्यामुळे, अर्जदाराने आपले वकील अभय कुल्लरवार यांचेकडून दिनांक 2/6/2009 रोजी नोटीस पाठविला. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊनही कोणतीही दखल घेतली नाही. गैरअर्जदाराने नियमानुसार वेळोवेळी वरीष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार ग्राहकांचा विमा क्लेम जास्तीत जास्त 90 दिवसांचे आंत निकाली काढावयास हवा, परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा क्लेम निकाली काढला नाही व कोणतीही रक्कम दिली नाही, ही गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या सेवेतील न्युनता असून, अनुचित व्यापार पध्दत आहे. अर्जदाराने तक्रारीत विमा क्लेम रुपये 1,73,769/- व त्यावर दिनांक 28/12/2007 पासून रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 % दराने द्यावे. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 50,000/- देण्यात यावे आणि केसचा खर्च रुपये 5,000/- गैरअर्जदाराविरुध्द देण्याचा आदेश पारीत करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे.
.. 3 .. ग्रा.त.क्र.10/2009.
4. अर्जदाराने, तक्रारीसोबत निशाणी 2 नुसार एकुण 13 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले, ज्यात ट्रॅक्टर खरेदीचा बिल, कर्ज मंजुरीचा आदेश, विमा पॉलीसीची प्रत, दुरुस्तीचे बिल, नोटीसच्या पोचपावत्या इत्यादी दाखल केलेल्या आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार हजर होऊन निशाणी 11 नुसार लेखी बयाण दाखल केला आहे.
5. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात ट्रॅक्टर विमाकृत असल्याचे मान्य करुन पॉलीसी क्र. 17053823431000023 असा असून विमा कालावधी दिनांक 19/12/2007 ते 18/12/2008 पर्यंत असल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने, मौजा गोढनगांव येथे ट्रॅक्टर वापर केल्याचे नमुद केला आहे. परंतु, कोणाच्या शेतात दिनांक 28/12/2007 ला वापर केला याचा उल्लेख केलेला नाही. यावरुन, अर्जदाराने स्वतःचे शेतात वापर केला नाही हे दिसते. ट्रॅक्टरचा दुरुपयोग करुन पॉलीसीच्या अटी व वैधानीक तरतुदीचा दुरुपयोग केला आहे. अर्जदाराची तक्रार ही अवैध ट्रॅक्टर वापराचे बाबत असून, केलेली मागणी ही अयोग्य व खोटी असल्यामुळे अमान्य केली आहे.
6. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणातील विशेष कथनात असे नमुद केले आहे की, अर्जदाराने पोलीसचे कागदपञ F.I.R., स्पॉट पंचनामा दाखल केला नाही. तसेच, रुपये 1,73,364/- चे बिल सही करुन दाखल केलेले नाही. ट्रॅक्टर चल वाहन असून त्याची नोंदणी अधिकारी यांचेकडून अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे. सदर ट्रॅक्टरवर दूसरी मशीन चालविण्याची नोंद नाही. या प्रकरणात ट्रॅक्टरचा वापर करुन थ्रेशर मशिन चालविले आहे. त्याचा गैरवापर बेकायदेशिरपणे केला असल्यामुळे, कायदा तोडणा-याला कायद्याचे संरक्षण नाही.
7. अर्जदाराचा ट्रॅक्टर हा कृषी करीता असून, स्वतःचे शेतावर उपयोगाकरीता असल्याचे गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे. परंतु, अर्जदाराने सदर ट्रॅक्टरचा वापर हा व्यवसायीक कामाकरीता करुन गैरवापर केलेला आहे. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवा देण्यात ञृटी केलेली नसून, अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार ही अयोग्य, खोटी, बेकायदेशिर असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी.
8. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणासोबत 3 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. ज्यामध्ये, ट्रॅक्टर नोंदणीचे प्रमाणपञ, इन्श्युरन्स पॉलीसी, घटनास्थळ पंचनाम्याची प्रत दाखल केले आहे.
9. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठ्यर्थ निशाणी 13 नुसार रिजाईन्डर, शपथपञ दाखल केले. गैरअर्जदारास रिजाईन्डर शपथपञ दाखल करण्याची संधी देवूनही शपथपञ दाखल केला नाही. त्यामुळे, शपथपञाशिवाय तक्रार पुढे चालविण्यात यावी, असा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला. गैरअर्जदाराने
.. 4 .. ग्रा.त.क्र.10/2009.
निशाणी 19 नुसार क्लेम फार्मची झेरॉक्स, पोलके यांचा सर्व्हे रिपोर्ट, बिल चेक रिपोर्ट दाखल केला आहे.
10. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन, अर्जदाराने दाखल केलेले शपथपञ आणि निशाणी 20 नुसार दाखल केलेला लेखी युक्तीवाद आणि गैरअर्जदाराचे वकीलानी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
11. अर्जदाराचे नावाने परिवाहन अधिकारी, गडचिरोली यांचेकडून नोंदणीकृत असलेला आयशर कंपनीचा ट्रॅक्टर एम.एच.-33-9810 चा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडून काढण्यात आला याबद्दल वाद नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील वादाचा विषय असा आहे की, विमा कालावधीत ट्रॅक्टर जळाल्यामुळे झालेली नुकसान गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरनी सर्व्हे करुन सुध्दा दुरुस्तीला लागलेल्या खर्चाची रक्कम दिली नाही असा आहे. अर्जदाराने बँकेकडून कर्जावर घेतलेला ट्रॅक्टर हा शेती उपयोगाकरीता घेतला असल्यामुळे आर.टी.ओ., गडचिरोली यांचेकडून टॅक्स मध्ये सुट देण्याचे गैरअर्जदाराने लेखी बयाणासोबत दाखल केलेल्या रजिस्ट्रेशन नोंदणी प्रमाणपञ दिसून येते, त्याची प्रत निशाणी 12 च्या यादीनुसार गैरअर्जदाराने दाखल केली आहे. गैरअर्जदाराच्या वकीलानी युक्तीवादात असे सांगीतले की, ट्रॅक्टरवर थ्रेशर मशिन चालविण्यात आले असल्यामुळे अर्जदार यांनी कायद्याचा भंग केल्याने कुठलीही रक्कम मिळण्यास पाञ नाही. गैरअर्जदाराचे हे म्हणणे दाखल रेकॉर्डवर ग्राह्य धरण्यास पाञ आहे.
12. गैरअर्जदाराचे वकीलानी असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदाराने घेतलेला ट्रॅक्टर हा शेती उपयोगीता करीता असतांना, त्याचा वापर व्यावसायीक कामाकरीता केला असल्याने, अर्जदाराने कायद्याचा भंग केला असल्या कारणावरुन कुठलीही रक्कम मिळण्यास पाञ नाही. ‘‘कायद्याचा भंग करणा-याला कायद्याचे संरक्षण देता येत नाही.’’ अर्जदाराने तक्रारीमध्ये ट्रॅक्टर जळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मागणी केलेली आहे. अर्जदाराचा ट्रॅक्टर दिनांक 28/12/2007 ला धान मळणी करीत असतांना जळाला, त्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यात आला, असे तक्रारीत नमुद करुन सुध्दा त्याबद्दलची कुठलाही दस्ताऐवज तक्रारीत दाखल केला नाही. ज्या कारणावरुन वादास कारण घडले (Cause of action) त्या संदर्भातील दस्ताऐवज दाखल करण्याची अर्जदाराची जबाबदारी असतांना, अर्जदाराने ते दस्ताऐवज दाखल केले नाही, आणि ट्रॅक्टरचे खरेदी बिलाबद्दल वाद नसतांना, बिलाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. यावरुन, अर्जदाराने स्वच्छ हाताने (Cline hand) तक्रार दाखल केलेली नाही, असा निष्कर्ष निघतो. अर्जदाराने रिजाईन्डर शपथपञ व लेखी युक्तीवादात असे म्हटले आहे
.. 5 .. ग्रा.त.क्र.10/2009.
की, घटनास्थळ पंचनामा व पोलीसात दिलेल्या तक्ररीची मुळ प्रत गैरअर्जदाराला विमा क्लेमसोबत सादर केली त्याची प्रत आपलेकडे ठेवली नाही, त्यामुळे दाखल करु शकत नाही. अर्जदाराचे हे म्हणणे संयुक्तीक, स्विकारणीय नाही. वास्तविक, पोलीस स्टेशन कडून त्याबद्दलचे दस्ताऐवज केंव्हाही मिळू शकतात. त्यामुळे, अर्जदाराने केलेले कथन न्यायसंगत नाही. तर, अर्जदाराने महत्वाच्या बाबी लपवून तक्रार दाखल केली असल्याचे निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
13. गैरअर्जदाराने शपथपञावर दाखल केलेल्या लेखी बयाणासोबत घटनास्थळ पंचनाम्याची झेरॉक्स प्रत दाखल केले आहे. सदर घटनास्थळ पंचनाम्याचे अवलोकन केले असता, अपघाताचे दिवशी अर्जदाराचा ट्रॅक्टर हा मौजा गोढनगांव येथील संगीता नेगाजी कुटो याचे शेतात ट्रॅक्टर किरायाने दिली होती, त्याची धानाची मळणी चालू असतांना अपघात घडला, यावरुन अर्जदाराने सदर ट्रॅक्टरचा वापर व्यावसायीक कामाकरीता केला असल्याची बाब सिध्द होतो. जेंव्हा की, ट्रॅक्टर आर.टी.ओ. कडून शेतीचे उपयोगाकरीता वापर करण्याचा परवाना मिळवून रोड टॅक्स पासून सुट मिळवून घेतली. तसेच, सदर घटनास्थळ पंचनाम्यात असे नमुद केले आहे की, संगीता कुटो हीचे कडील शेतात धान मळणी करता प्रती पोता 25/- रुपये प्रमाणे ठरविले. या संदर्भात अर्जदाराने आपले शपथपञात लेखी युक्तीवादात असे म्हटले की, मळणी यंञावर काम करणा-या मजुराच्या मजुरीचे आहे. अर्जदाराने दिलेले स्पष्टीकरण तर्कसंगत नाही. गैरअर्जदार यांनी आक्षेप घेतल्यानंतर वरील सपष्टीकरण दिले आहे आणि लेखी युक्तीवादात परिच्छेद 10 मध्ये असे नमुद केले आहे की, ‘ सदर ट्रॅक्टर किरायाने दिला नव्हता व नाही.’ या कथनावरुन गैरअर्जदाराने घेतलेल्या आक्षेपाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ग्राह्य धरण्यास पाञ नाही. वास्तविक, मळणी यंञ कुणाचे होते किंवा मळणी यंञासोबत ट्रॅक्टर किरायाने दिला होता, याचा पुरावा रेकॉर्डवर नाही. थ्रेशर मशिनचा किराया प्रती पोता 25/- रुपये देण्याचे ठरले होते. तर ती मजुराची मजुरी म्हणून देण्यात ठरले नव्हते, असे घटनास्थळ पंचनाम्यावरुन दिसून येत नाही. वास्तविक, ही बाब उघड होईल याच हेतूने अर्जदाराचे तक्रारीत पोलीस रेकॉर्ड दाखल केला नसावा. अर्जदाराने ट्रॅक्टरբքचा दुरुपयोग केला, त्यामुळे स्वतःचे चुकीकरीता, दूस-याकडून नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही.
14. अर्जदाराने, लेखी युक्तीवादात गैरअर्जदाराकडून नियुक्त केलेल्या सर्व्हेअरच्या संदर्भात आक्षेपार्थ कथन लेखी युक्तीवादाचे पॅरिच्छेद 6 मध्ये केले आहे. गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरनी योग्यप्रकारे सर्व्हे केला नाही. अर्जदाराने त्याबद्दल त्याचे वरीष्ठ अधिका-याकडे तक्रार केल्याबद्दलचा कुठलाही पुरावा रेकॉर्डवर दाखल केला नाही. त्यामुळे, सर्व्हेअरनी विमा कंपनीचे बाजुने झुकाव देवून सर्व्हे केला, हे अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
.. 6 .. ग्रा.त.क्र.10/2009.
15. अर्जदाराने लेखी युक्तीवादात असे म्हटले आहे की, गैरअर्जदार यांनी मोघम आरोप केला आहे. अर्जदाराने आपले रिजाईन्डर मध्ये त्याचे खंडन केले आहे. परंतु, त्याबद्दलचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. जेंव्हा की, गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात आक्षेप घेतले, ते असत्य असल्याचे असल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. यावरुनही अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही.
16. अर्जदाराने, ट्रॅक्टर हा स्वतःच्या शेती उपयोगाकरीता घेतला असल्याचे म्हटले आहे, परंतु अपघाताचे वेळी ट्रॅक्टर हे मौजा गोढनगांव येथे होते. जेंव्हा की, अर्जदाराची शेती कुरखेडा पासून 21 कि.मी. अंतरावर चोप येथे आहे. अर्जदाराने त्याबद्दल 7/12 चा उतारा सुध्दा दाखल केला नाही. त्यामुळे, अर्जदार हा स्वच्छ हाताने आलेला नाही, त्यामुळे अर्जदाराची तक्रार स्विकारण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
17. अर्जदाराने तक्रारीत दुरुस्तीचे पक्के बील अ-6 व अ-7 वर दाखल आहेत असे म्हटले आहे, हीच बाब लेखी युक्तीवादातील परिच्छेद 5 मध्ये असे म्हटले आहे की, ‘‘अर्जदाराने ट्रॅक्टर दुरुस्तीचे पक्के बील विद्यमान कोर्टात दाखल केले आहे.’’ हे अर्जदाराचे कथन पूर्णपणे खोटे आहे. सदर रेकॉर्डचे अवलोकन केले असता अ-6 व अ-7 वर झेरॉक्स बील दाखल आहे आणि ते ही अवाचणीय, अस्पष्ट आहेत. यावरुन, सुध्दा तक्रार उपलब्ध रेकॉर्डवरुन मंजूर करण्यास पाञ नाही. अर्जदाराने तक्रार ञास देण्याकरीता खोटी (Vexatious complaint) दाखल केले आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
18. वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत आले असल्यामुळे तक्रारीत खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षानी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षाना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 26/11/2009.