(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.32,280/- मिळावेत, या रकमेवर दि.09/09/2010 पासून 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.2000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.20 लगत लेखी म्हणणे, पान क्र.22 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.एस.ए.चोरडीया व सामनेवाला यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी तोंडी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांच्या मालकिची गाडी क्र.एमएच-15-एएस-947 या वाहनाचा विमा दि.25/09/2009 ते दि.24/09/2010 या कालावधीसाठी सामनेवाला यांचेकडून घेतलेला होता ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये मान्य केलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.4 लगत विमा सर्टीफिकेट हजर केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, व पान क्र.4 चे विमा सर्टीफीकेट याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सदर तक्रारीतील संबंधीत चालक श्री.भरत साळवे यांने सामनेवाला यांना माहिती दिली की, सदरच्या अपघाताचेवेळी तो विमीत वाहन चालवित नव्हता व त्यांने सांगितले की अपघात घडला त्या दिवशी तो शहराच्या बाहेर गेला होता. तो दि.06/09/2010 ते 16/09/2010 बाहेर गावी होता. तक्रारदाराने सामनेवाला पासून खरी परिस्थिती लपवून ठेवली आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. सदरची पॉलिसी ही mis-representation of facts असल्यामुळे क्लेमबाबत नुकसान भरपाई देण्याबाबतचे सामनेवाला कंपनीचे कोणतेही उत्तरदायित्व नाही. तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
परंतु अर्जदार यांनी पान क्र.5 लगत फिर्यादीची प्रत, पान क्र.6 लगत फायनल रिपोर्ट दाखल केलेला आहे. पान क्र.6 चे पोलिसांचेकडील फायनल रिपोर्टमध्ये अपघाताचे वेळी श्री.भारत देवधर साळवे हेच वाहन चालवित होते असा स्पष्ट उल्लेख आहे. अपघाताचे वेळी भारत साळवे वाहन चालवित नव्हते हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. पान क्र.6 चे पोलिसांचेकडील फायनल रिपोर्ट फॉर्मचा विचार होता सामनेवाला यांनी चुकिचे व अयोग्य कारण देवून अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारलेला आहे हे स्पष्ट होत आहे.
सामनेवाला यांनी या कामी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र या व्यतिरीक्त अन्य कोणतेही कागदपत्रे सर्व्हे अहवाल दाखल केलेला नाही. या उलट अर्जदार यांनी पान क्र.7 लगत सामनेवाला यांचा सर्व्हे अहवाल दाखल केलेला आहे. या सर्व्हे अहवालानुसार अपघातग्रस्त वाहनाचे रु.32,280/- इतक्या रुपयांचे नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. पान क्र.7 चे अहवालानुसार अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.32,280/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.32,280/- इतकी रक्कम अर्जदार यांना योग्य त्या वेळी मिळालेली नाही यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थिक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.32,280/- या रकमेवर पान क्र.7 चे सर्वे अहवालाची तारीख दि.19/01/2011 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.20/03/2011 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इंन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल.
2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी.
सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.32,280/- द्यावेत व आर्थिक नुकसान भरपाई
म्हणून या मंजूर रकमेवरती दि.20/03/2011 पासून संपुर्ण रक्कम
फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.