::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 15/07/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याच्या मालकीचे महिंद्रा मॅक्स मिनीडोअर क्र.एम एच- 34, एबी 7649 चे वाहन त्याने विमा प्रिमियम रू.19185/- भरून विरूध्द पक्ष यांचेकडे दि.10/1/2015 ते दिनांक 09/1/2016 या कालावधीकरीता विमाकृत केले. तक्रारदाराचे सदर वाहन दिनांक 23/05/2015 रोजी रात्री 11.30 वाजता मुल कडून चंद्रपूर येथे जात असतांना मुल-चंद्रपूर रोडवर उभ्या असलेल्या नादुरूस्त ट़क क्र.एमएच 34, एबी 2228 वर आदळल्याने अपघात होवून त्याचा समोरील भाग क्षतीग्रस्त झाला. सदर वाहन दुरूस्त करण्यासाठी कंपनीकडून प्राप्त विवरणानुसार अंदाजे रू.2,31,566/- इतका खर्च अपेक्षीत होता. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून अपघातग्रस्त वाहनाच्या दुरूस्ती खर्चाबाबत माहिती दिली परंतु विरूध्द पक्ष यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही व दुरूस्तीकरीता येणा-या खर्चाची तरतूदही केली नाही. तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहनाचा विमा उतरविला असल्यामुळे सदर वाहनाच्या दुरूस्तीकरीता लागणा-या खर्चाची जबाबदारी ही विरूध्द पक्षाची आहे. परंतु विरूध्द पक्षाने सदर खर्चाची तरतूद केली नाही व तक्रारकर्त्यांस दिलेल्या सेवेत न्युनता केलेली आहे. सबब तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचेविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यांत मागणी केली आहे की विरूध्द पक्षाकडून विमाकृत वाहनाच्या दुरूस्तीचा खर्च रू.3,05,216/- अर्जदारांस मिळण्याचे तसेच दाखल केल्याचे तारखेपासून तक्रार निकाली निघेपर्यंत सदर अपघातग्रस्त वाहन ठेवण्यासाठी येणारे दररोजचे शुल्क रू.150/- याप्रमाणे येणारी रक्कम विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांस देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी नि.क्र.13 वर आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन नाकबूल केले आहे व आपल्या विशेष कथनात विरूध्द पक्षाने नमूद केले की, सदर वाहन हे तक्रारकर्त्याने व्यवसायाकरीता घेतले असून तक्रारकर्त्याला सदर वाहनाच्या दुरूस्तीच्या खर्चाकरीता मंचात दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार नाही. तसेच आजपर्यंत तक्रारकर्त्याने सदर वाहन अपघातात क्षतीग्रस्त झाल्याबाबत विरूद्ध् पक्षाला माहिती दिलेली नाही, आणी आवश्यक दस्तावेजांसह विरूध्द पक्षाकडे विमादावादेखील सादर केलेला नाही. तक्रारकर्त्याला सदर वाहन दुरूस्तीकरीता रू.2,31,566/- इतका खर्च येईल हे दर्शविण्यासाठी त्याने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विमाकृत वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्याबाबत 15 दिवसांचे आत विमाकंपनीला सुचना देणे आवश्यक असते. तसेच विमादावा दाखल करावा लागतो व यानंतर विमा कंपनीने नियुक्त केलेला सर्व्हेयर गाडीच्या नुकसानाबाबत अहवाल तयार करतो. परंतु तक्रारकर्त्याने अशी कोणतीही माहिती विरूध्द पक्ष यांना दिली नाही. शिवाय अपघाताचे वेळेस वाहन चालक यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना तसेच वाहनाचे परमीट व फिटनेस प्रमाणपत्र नसल्यामुळे विमा कंपनी तक्रारकर्त्याला कोणतीही नुकसान भरपाई देण्यांस जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे विमादावा दाखलच केलेला नसल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, दस्ताऐवज, शपथपत्र आणी उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? : होय
2) प्रस्तूत तक्रार दाखल करण्यासाठी कारण घडले आहे काय ? ः नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. तक्रारदाराच्या मालकीचे वाहन क्र.एम एच- 34, एबी 7649 हे तक्रारदाराने रू.19185/- विमा प्रिमियम भरून विरूध्द पक्ष यांचेकडे दि.10/1/2015 ते दिनांक 9/1/2016 या कालावधीकरीता विमाकृत केले आहे. याबाबत पॉलिसी कव्हरनोट दस्तावेज नि.क्र.4 वर दस्त क्र. 1 वर दाखल आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारदाराच्या मालकीचे वाहन क्र.एम एच- 34, एबी 7649 हे दिनांक 23/05/2015 रोजी मुल कडून चंद्रपूर येथे जात असतांना मुल-चंद्रपूर रोडवर उभ्या असलेल्या नादुरूस्त ट़क क्र.एमएच 34, एबी 2228 वर आदळल्याने अपघात होवून क्षतीग्रस्त झाले हे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या प्रथम सुचना रिपोर्ट या दस्तावेजावरून निदर्शनांस येते. परंतु तक्रारकर्त्याने सदर अपघाताबाबत पॉलिसी नियमानुसार विरूध्द पक्ष यांना सुचना दिली होती तसेच क्षतीग्रस्त वाहनाच्या दुरूस्तीच्या खर्चाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष विमा कंपनीला आवश्यक दस्तावेजांसह विमा दावा सादर केला होता हे दर्शविणारा कोणताही दस्तावेज वा पुरावा तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे विमादावा दाखल केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष विमा कंपनीविरूध्द तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही व त्यामुळे या मुद्दयावर प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.230/2015 ही खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 15/07/2017