न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीची हयुंडाई कार क्र. एम.एच.12-एल.जे.-6150 असून सदर वाहनाचा विमा त्यांनी वि.प. कंपनीकडे पॉलिसी नं. 9914918231110096431 ने उतरविला होता. पॉलिसीचा कालावधी दि. 30/11/2018 ते 29/11/2019 असा होता. ता. 15/09/2019 रोजी तक्रारदार हे गोव्याहून कोल्हापूरकडे येत असताना समोरुन एक पिकअप माल वाहतूक करणारे वाहन आले व त्या वाहनाची कारला ठोकर होवू नये म्हणून तक्रारदारांनी आपली कार डाव्या बाजूला घेतली असता सदरची कार बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्यामध्ये कारचे संपूर्ण नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदारांनी सदरची कार नेमाडे यांचे गॅरेजला आणून सोडली. तक्रारदाराचे वडील हे आजारी असल्याने दि. 30/08/2019 पासून ते 17/09/2019 पर्यंत ते दवाखान्यात अॅडमिट होते. त्यामुळे अपघातानंतर तक्रारदार हे आपल्या गावी वडीलांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे तक्रारदारांनी दि. 20/09/2019 रोजी वि.प. यांना इंटीमेशन दिली व त्याप्रमाणे विमा कंपनीने सर्व्हे करुन घेतला तसेच तक्रारदाराकडून क्लेम फॉर्म भरुन घेतला. त्यानंतर वि.प. यांनी दि. 2511/2019 चे पत्राने, तक्रारदाराने त्यांचे कारमध्ये एल.पी.जी./सी.एन.जी. किट बसवून घेतले व त्याची नोंद रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला केली नाही अगर विमा कंपनीला कळविली नाही असे कारण देवून तक्रारदाचा विमादावा वि.प. यांनी नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,92,500/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 3 कडे अनुक्रमे त्रुटीपत्र, पॉलिसी, आर.सी. वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व सोबत वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे दाखल केले आहेत.
4. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही वि.प. हे याकामी हजर न झालेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तदनंतर वि.प.तर्फे वकील हजर झाले. नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करुन वि.प. यांचेतर्फे वकीलांचे वकीलपत्र दाखल करुन घेण्यात आले. तथापि वि.प.तर्फे या कामी लेखी म्हणणे तसेच पुरावा दाखल करण्यात आलेला नाही.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे मालकीची हयुंडाई कार क्र. एम.एच.12-एल.जे.-6150 असून सदर वाहनाचा विमा त्यांनी वि.प. कंपनीकडे पॉलिसी नं. 9914918231110096431 ने उतरविला होता. पॉलिसीचा कालावधी दि. 30/11/2018 ते 29/11/2019 असा होता. सदरची पॉलिसी तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे. वि.प. यांनी याकामी लेखी म्हणणे व पुरावा दाखल केलेला नाही व सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात, वि.प. यांनी दि. 2511/2019 चे पत्राने, तक्रारदाराने त्यांचे कारमध्ये एल.पी.जी./सी.एन.जी. किट बसवून घेतले व त्याची नोंद रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला केली नाही अगर सदरची बाब विमा कंपनीला कळविली नाही असे कारण देवून तक्रारदाचा विमादावा वि.प. यांनी नाकारला आहे असे कथन केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी वि.प. यांचे दि. 25/11/2019 चे पत्र याकामी दाखल केले आहे. वि.प. यांचे सदरचे पत्राचे अवलोकन करता, तक्रारदारांनी त्यांचे कारमध्ये परवानगीशिवाय एल.पी.जी. कीट बसविल्याने तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अट क्र.8 चा भंग केला आहे असे वि.प. यांनी नमूद केले आहे. तक्रारदाराने त्यांचे पुरावा शपथपत्रात, ता. 15/09/2019 रोजी तक्रारदार हे गोव्याहून कोल्हापूरकडे येत असताना समोरुन एक पिकअप माल वाहतूक करणारे वाहन आले व त्या वाहनाची कारला ठोकर होवू नये म्हणून तक्रारदारांनी आपली कार डाव्या बाजूला घेतली असता सदरची कार बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्यामध्ये कारचे संपूर्ण नुकसान झाले असे शपथेवर कथन केले आहे. सदरचे तक्रारदाराचे शपथेवरील कथन विचारात घेता, तक्रारदाराचे कारचा अपघात हा वाहनात विनापरवाना एल.पी.जी. कीट बसविल्यामुळे झाला अशी वस्तुस्थिती दिसून येत नाही. वि.प. यांनी याकामी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही तसेच कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. वि.प. यांचेविरुध्द याकामी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प. यांनी तक्रारदाराचे वाहनास झालेला अपघात हा विनापरवाना एल.पी.जी. कीट बसविल्यामुळे झाला ही बाब योग्य तो पुरावा दाखल करुन शाबीत केलेली नाही. तक्रारदाराचे वाहनास झालेला अपघात व वाहनामध्ये बसविलेले एल.पी.जी. कीट यांचा यामध्ये दुरान्वयेही कोणताही संबंध (Nexus) दिसून येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. यांनी चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सदरकामी विमा पॉलिसीचे अवलोकन करता वादातील वाहनाची आय.डी.व्ही. ही रु. 2,92,500/- इतकी असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांचा विचार करता तक्रारदार हे नॉन स्टँडर्ड बेसीसवर वाहनाचे आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.2,19,375/- मिळणेस पात्र आहेत.
9. याकामी तक्रारदाराने दाखल केलेल्या खालील मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचा आधार या आयोगाने घेतला आहे.
- IV (2019) ACC 757 (SC)
- II (2010) CPJ 9 Supreme Court.
Insurance – Non-standard settlement – terms of policy violated – repudiation of claim in toto injustified – settlement of claim on non-standard basis directed.
सबब, तक्रारदार हे नॉन स्टँडर्ड बेसीसवर वाहनाचे आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु. 2,19,375/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 2,19,375/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.