नि.२२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३०९/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २५/११/२००८
तक्रार दाखल तारीख : ०३/१२/२००८
निकाल तारीख : ३०/०९/२०११
--------------------------------------------------------------
श्री चंद्रकांत भगवान पाटील,
वय ३५ वर्षे, धंदा – शेती,
रा.कुरळप, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
आर.डी.विचारे कॉम्प्लेक्स गेमस्टोन,
शॉप नं.७१ ते ७४, एस.टी.स्टॅंडजवळ,
कोल्हापूर, जि. कोल्हापूर .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.व्ही.बी.कुलकर्णी
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री बी.बी.खेमलापुरे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या पशु विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करतो व त्यासाठी त्याने गायी व म्हैशी सांभाळल्या आहेत. तक्रारदाराने त्याच्या गायीचा रक्कम रु.२०,०००/- चा विमा जाबदार यांचेकडे दि.१३/३/२००७ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्याकडून विमा पॉलिसी ही देण्यात आली नाही. तक्रारदार यांची विमा उतरवलेली गाय आजारी पडून दि.२९/८/२००७ रोजी मयत झाली. तक्रारदार यांचे गायीचे जाबदार यांचे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. तथापि सदर डॉक्टर यांनी वारंवार मागणी करुनही पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांना विमा दाव्याबाबत पूर्तता करण्यास विलंब झाला. जाबदार यांचेकडून क्लेमफॉर्म मिळताच तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा दि.६/१०/२००७ रोजीच्या पत्राने विम्याबाबत माहिती देण्यास उशिर केला म्हणून नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने ९ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.१८ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालिवण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. तक्रारदार यांनी कानाचा बिल्ला कानाच्या तुकडयासह पाठविला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.२१ च्या यादीने एक कागद दाखल केला आहे.
४. जाबदार यांनी नि.१९ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी याकामी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तक्रारदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी याकामी आपल्या गायीच्या विम्याबाबत पॉलिसीची प्रत हजर केली नाही. तक्रारदार याने आपणास पॉलिसी मिळाली नाही असे नमूद केले आहे. परंतु जाबदार यांचेकडून सदर पॉलिसी मंचासमोर येणेसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सदरच्या पॉलिसीचा कालावधी किती होता, पॉलिसीचा क्रमांक किती होता, पॉलिसी किती रकमेची होती, याबाबत कोणतीच माहिती मंचासमोर येत नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारल्याचे पत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर पत्रावरुन तक्रारदार यांनी पॉलिसी उतरविली होती एवढीच बाब समोर येते. परंतु सदरचे पॉलिसीचा कालावधी, त्यावर असणा-या टॅग नंबर या सर्व बाबी प्रस्तुत विमादाव्याबाबत नुकसान भरपाई ठरविताना महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे या विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेणे अपूर्ण कागदपत्रांमुळे अशक्य झाले आहे. जाबदार यांनी काही कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु सदर कागदपत्रे ही पॉलिसीमधील अटी व शर्ती ठरविण्यासाठी पुरेशी नाहीत. तक्रारदार यांच्याकडे पॉलिसी नसेल तर त्यांनी ती जाबदार यांनी दाखल करावी याबाबत आदेश घेता आला असता. परंतु तक्रारदार अथवा तक्रारदार यांचे विधिज्ञ युक्तिवादादरम्यान गैरहजर राहिले. त्यामुळे पॉलिसीसारखा महत्वपूर्ण पुरावा मंचासमोर येवू शकला नाही. अपूर्ण कागदपत्राच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे केवळ अशक्य असल्याने तक्रारदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणे क्रमप्राप्त ठरते या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
५. जाबदार यांनी मुदतीबाबत आक्षेप घेतला आहे. परंतु तक्रारदार यांचा विमा दावा दि.६/०१/२००७ रोजी नाकारला असे तक्रारदार यांनी आपले तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे व सदरचे पत्र नि.५/१ वर दाखल केले आहे. सदर पत्रावरुन तक्रारदार यांचा विमा दावा दि.६/१०/२००७ रोजी नाकारला ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दि.२५/११/२००८ रोजी दाखल केला आहे, यावरुन तक्रारदार याने मुदतीत तक्रारअर्ज दाखल केला आहे ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे जाबदार यांनी मुदतीबाबत घेतलेल्या आक्षेपामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. ३०/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११