निकालपत्र :- (दि.20/07/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की - तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी आपली म्हैस सामनेवाला विमा कंपनीकडे इन्शुअर करुन घेतली होती. सदर पॉलीसीचा नं.1706/06/3012/000001/1488 असा होता. तक्रारदाराची सदर म्हैस दि.24/09/2007 रोजी आजारी पडून मयत झाली. त्यानंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा क्लेम दाखल केला व रु.16,000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. परंतु सामनेवाला विमा कंपनीने दि.15/01/2010 रोजी तक्रारदाराला पत्र पाठवून विमा क्लेम नाकारल्याचे कळवले. अनवधानाने सदरचे पत्र तक्रारदाराकडून गहाळ झाले. तक्रारदाराने क्लेम फॉर्म सोबत सर्व कागदपत्र म्हणजे पोस्ट मार्टेम रिपोर्ट, डॉक्टरांचे सर्टीफिकेट इत्यादी सर्व कागदपत्रे दिली होती तरीही चुकीचे कारण दाखवून तक्रारदाराचा न्याय्य योग्य क्लेम बेजबाबदारपणे नामंजूर केला आहे व ही सामनेवालाची गंभीर सेवात्रुटी आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावून आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु.16,000/- दि.24/09/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याजासहीत मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॉलीसी पेपर, व्हेटर्नरी सर्टीफिकेट, पोस्ट मार्टेम रिपोट्र, ग्रामपंचायत पंचनामा, ग्रामपंचायत दाखला, दुध संस्था दाखला, ट्रिटमेंट सर्टीफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे.परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराने सदर क्लेम उशिरा दाखल केल्यामुळे सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. सामनेवालाची ही कृती कायदयास व वस्तुस्थितीस धरुन व अत्यंत बरोबर आहे. त्यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची कुठलीही सेवात्रुटी नाही.त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही केवळ रचनात्मक व लुबाडण्याच्या हेतुने केली आहे. त्यामुळे सदर तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी सामनेवाला विमा कंपनीने सदर मंचास विंनती केली आहे. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रही तपासले. तक्रारदाराची विमा पॉलीसी सामनेवालाने मान्य केली आहे.त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे; (6) तक्रारदाराने दि;24/09/2007 रोजी त्यांची म्हैस मेल्यावर सामनेवालांकडे विमा क्लेम दाखल केला. त्यासोबत सर्व कागदपत्रे दाखल केली. सदर कागदपत्रे विलंबाने दाखल केली असे सामनेवाला विमा कंपनीचे कथन आहे. पंरतु हया कथनाला क्लेम पेपर्स व इतर कागदपत्र दाखल करण्यास नेमका किती विलंब झाला किंवा आवश्यक ती कुठली कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली नाहीत इत्यादी कुठलाही तपशील सामनेवालाने दिला नाही किंवा सदर बाब सामनेवालाने शाबीतही केली नाही. तक्रारदाराने त्यांच्या तक्रारीसोबत पॉलीसी डॉक्युमेंट, व्हेटर्निटी सर्टीफिकेट, पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतीचा पंचनामा व दाखला, दुध संस्थेचा दाखला, डॉक्टरांच्या ट्रीटमेंट इत्यादी सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रे क्लेमसोबत मिळाली नसल्याबद्दल सामनेवालाने तक्रारदाराशी कुठलाही पत्रव्यवहार केल्याचेही सामनेवालाने सिध्द केले नाही. जनावराच्या वर्णनाबद्दल, टॅग नंबर बद्दल किंवा मृत्यूबद्दल सामनेवालाने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे कुठलेही सबळ कारण असल्याचे सिध्द न करता सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करणे ही निश्चितच सामनेवाला कंपनीची गंभीर सेवा त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा क्लेमची नुकसानभरपाई रक्कम रु.16,000/- दि.15/01/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |