Maharashtra

Wardha

CC/81/2013

ANIL BHAIYYAJI SARAF - Complainant(s)

Versus

RELIANCE GENERAL INSURANCE CO.LTD. THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV.ATUL S. SONGADE

23 Feb 2015

ORDER

निकालपत्र

(पारित दिनांक 23.02.2015)

मा. अध्‍यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्‍या आदेशान्‍वये

 

     त.क.ने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार वि.प.च्‍या विरुध्‍द दाखल केलेली आहे.

  1.      तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा की, तक्रारकर्त्‍याने   दि.25.01.2012 रोजी महिंद्र कंपनीची झायलो चार चाकी वाहन ज्‍याचा नोंदणी क्रं. एम.एच.32/सी-6651 उन्‍नती मोटर्स वर्धा यांच्‍याकडून खरेदी केली. सदर वाहनाचा वि.प.कंपनीकडे दि. 25.01.2012 ते 24.01.2013 या कालावधीकरिता विम्‍याची रक्‍कम भरुन पॉलिसी क्रं. 1705712311008996 ही विमा पॉलिसी घेतलेली आहे.
  2.      त.क. ने पुढे असे कथन केले आहे की, दि. 25.10.2012 रोजी त.क. च्‍या बहिनीचे पती व मित्र साडेतीन शक्‍तीपीठाचे देवदर्शनाकरिता जात असल्‍यामुळे त.क.ने अपघातातील वाहन त्‍यांना व मित्रानां प्रेमाखातर जाण्‍याकरिता दिले. सदर वाहनावर संदिप शेषराव लहाने हे ड्रायव्‍हर होते. परंतु ऐन वेळेवर त.क.चे जावयाचे जाणे न जमल्‍यामुळे  त.क.चे मित्र संजय महादेव वैरागडे व इतर अपघातग्रस्‍त वाहन घेऊन देवदर्शनाकरिता गेले. कळंब, माहूर येथील देवदर्शन करुन पुढे ते तुळजापूर येथे मुक्‍कामाकरिता थांबले व दुस-या दिवशी पंढरपूर येथे गेले व पुढे कोल्‍हापूरचे देवीचे दर्शन घेऊन अहमदनगर येथे सातार दौड मार्गे दि. 27.10.2012 ला रात्री निघाले असता त्‍याच दिवशी रात्री 1.30 ते 1.45 वाजताच्‍या सुमारास विसापुर गावाजवळ रस्‍त्‍यावर मोठ मोठे दगड पडलेले असल्‍यामुळे व ते ड्रायव्‍हर संदिपच्‍या लक्षात न आल्‍याने सदर गाडीचे चाक उजव्‍या बाजुने दगडावरुन गेले व डावे बाजुला गाडी पलटली. त्‍या अपघातात ड्रायव्‍हरसह सर्वांना मार लागला व गाडीचे नुकसान झाले व वाहन पुढे हलविण्‍यासारखे नव्‍हते. त्‍यामुळे वाहन चालकाने महिंद्र कंपनीचे टोल फ्री नंबर वर फोन करुन अपघाताबद्दल सूचना दिली. तसेच पोलिस स्‍टेशन बेलवंडी, जि. अहमदनगर यांच्‍याशी संपर्क केला व जखमीनां दवाखान्‍यात नेले. परंतु उपचारा दरम्‍यान  सुधाकर घायवट यांचा मृत्‍यु झाला.
  3.      त.क.ने पुढे असे कथन केले आहे की,महिंद्रा कंपनीचे टोल फ्री नंबर वर सूचना दिल्‍यानंतर त्‍यांचे तर्फे मदत गाडी (Toe-Van) आली. परंतु पोलिस विभागा तर्फे कार्यवाही पूर्ण व्‍हावयाची असल्‍यामुळे गाडी इतरत्र हलविता आली नाही. तसेच वि.प. कंपनीला सुध्‍दा अपघाताची सूचना केली. त्‍यानंतर महिंद्रा कंपनी तर्फे सदर गाडी दुरुस्‍तीकरिता त्‍या भागातील सब लोक मोटर्स अहमदनगर या कंपनीचे गॅरेजमध्‍ये वाहन पाठविले. त्‍यांनी वाहनाचे अवलोकन करुन गाडी दुरुस्‍तीकरिता रु.6,75,022.61 पै. खर्च असल्‍याचे सांगितले. त्‍याप्रमाणे त.क.ने वि.प. कंपनीला याबाबत सूचना केली. वि.प. कंपनी तर्फे त्‍यांचे अधिकारी येवून व संपूर्ण सखोल चौकशी केली. परंतु गाडी भाडयाने दिली होती हे खोटे कारण पुढे करुन त.क.च्‍या वाहनाची  नुकसान भरपाईची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत आहे. त्‍यामुळे त.क.ने दि. 25.03.2013 रोजी वि.प. कंपनीला नोटीस पाठविली. परंतु वि.प. कंपनीने दि.11.03.2013 रोजी पत्र पाठवून अपघाताच्‍या वेळेस वाहन भाडयाने दिले होते व अपघाताची सूचना उशिरा दिली हे खोटे कारण पुढे करुन त.क.चा विमा दावा नामंजूर केला आहे.
  4.      त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, वि.प. कंपनीने आश्‍वासन देऊन ही वाहनाचे नुकसान झाल्‍याबाबत नुकसान भरपाई देण्‍यास नाकारल्‍यामुळे त.क.ला स्‍वतःचे वाहन दुरुस्‍तकरता आले नाही. त्‍यामुळे वाहन सतत 3 महिने सब लोक गॅरेज अहमदनगर येथे पडून होती. विम्‍याची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे सदर वाहन त.क.ने 2 दिवस सतत मदत वाहनाला बांधून नागपूर येथे आणले व भारत गॅरेज यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता टाकले. वाहन दुरुस्‍तीकरिता त.क.ला रुपये 3,14,348.58 पै. खर्च द्यावे लागले व गाडी अहमदनगर ते नागपूर येथे आणण्‍यास रु.40,000/- खर्च करावे लागले.
  5.      वि.प. च्‍या निष्‍काळजीपणामुळे व खोटया कारणावरुन त.क.ला स्‍वतःची गाडी दुरुस्‍त करुन उपभोग घेता आला नाही. त्‍यामुळे त.क.ला  मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त.क. यांनी पुन्‍हा दि.15.04.2013 रोजी वि.प. कंपनीला औरंगाबाद येथील कार्यालयास पत्र पाठविले व त.क. च्‍या गाडीच्‍या विम्‍याची रक्‍कम द्यावे म्‍हणून कळविले. परंतु वि.प. कंपनीने नुकसान भरपाई विम्‍याची रक्‍कम दिलेली नाही. म्‍हणून त.क. ने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन अपघातग्रस्‍त वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु.3,14,348.58 पै. व अहमदनगर ते नागपूर येथे आणण्‍यासाठी आलेला खर्च 40,000/-रुपये. तसेच त.क. ने सदर वाहन बँक ऑफ इंडिया , शाखा-हिंगणी यांचेकडून कर्ज घेऊन विकत घेतले होते. याकरिता प्रतिमाह 12,000/-रुपये हप्‍ता भरावा लागला, त्‍याचे रु.2,52,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल 25,000/-रुपये व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
  6.      वि.प. कंपनीने त्‍याचा लेखी जबाब  नि.क्र.15 वर दाखल केला असुन तक्रार अर्जास सक्‍त विरोध केला आहे. अपघातातील वाहनाचे वि.प. कंपनीकडे दि. 25.01.2012 ते 24.01.2013 या कालावधीकरिता विमा पॉलिसी काढली होती हे मान्‍य केले असून इतर सर्व आक्षेप अमान्‍य केले आहे.  वि.प.चे म्‍हणणे असे की, त.क. यांनी त्‍याचे वाहन महिंद्रा झायलो क्र.एम.एच.32/सी-6651 हे त्‍याचे मित्र संजय वैरागडे आणि इतर यांना देवदर्शनाकरिता भाडे तत्‍वावर दिले होते व विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केले. तसेच सदर वाहनाच्‍या ड्रायव्‍हरकडे वाहन चालविण्‍याचा अधिकृत परवाना अभिलेखावर दाखल केलेला नाही. सदर गाडी अधिकृत परवान्‍याशिवाय ड्रायव्‍हर चालवित असल्‍यामुळे, विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन झाल्‍यामुळे वि.प. कंपनी त.क.ला गाडीची नुकसान भरपाई देण्‍यास बांधिल नाही. तसेच त.क. ने दाखल केलेले भारत गॅरेजचे सर्व्‍हीस कोटेशन हे चुकिचे व दिशाभूल करणारे असल्‍यामुळे तसेच राजा बॉडी अॅन्‍ड क्रेन सर्विस यांचे दाखल केलेले बिल हे चुकिचे व बनावट आहे. तसेच वि.प.ने असे कथन केले आहे की, त.क. हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही व प्रस्‍तुत तक्रार मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  7.      त.क.ने त्‍यांच्‍या कथनाच्‍या पुष्‍ठयर्थ स्‍वतःचे श्‍पथपत्र नि.क्र.24 वर दाखल केले असून साक्षीदार इम्रान अमान खान यांचे शपथपत्र नि.क्रं. 25 वर दाखल केले आहे. तसेच त.क. ने  नि.क्र.2 प्रमाणे एकूण 18 कागदपत्रे व वर्णन यादी नि.क्रं. 27 प्रमाणे एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहे. नि.क्रं. 34 प्रमाणे 2 कागदपत्रे दाखल केलेली आहे.
  8.      वि.प. कंपनीने कुठलाही तोंडी पुरावा दाखल केलेला नसून वि.प.ने नि.क्रं. 28 प्रमाणे पुरसीस देऊन शपथपत्रावर पुरावा द्यावयाचा नाही असे नमूद केलेले आहे. वि.प.ने वर्णन यादी नि.क्रं. 23 प्रमाणे सर्व्‍हेअर रिपोर्ट व इन्‍व्‍हीस्‍टीगेशन रिपोर्ट दाखल केला आहे.
  9.      त.क. व वि.प. यांचे अधिवक्‍ता यांचा तोंडी युक्तिवाद  ऐकण्‍यात आला.
  10.      वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्‍पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्‍यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.

 

अ.क्रं

            मुद्दे

उत्‍तर

1

विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे अपघातात झालेल्‍या नुकसानीचा विमा पॉलिसीप्रमाणे नुकसान भरपाई न देऊन  दोषपूर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?

होय

2

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास  पात्र आहे काय ?

अंशतः

3

अंतिम आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर.

                                                            : कारणमिमांसा :-

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 चे उत्‍तर -    त.क.चे वाहन पंजीकृत क्रं. एम.एच.32/सी-6651 याचा विरुध्‍द पक्ष कंपनीकडे दिनांक 25.01.2012 ते 24.01.2013 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 1705712311004996 प्रमाणे विमा काढलेला होता हे वादातीत नाही. तसेच सदर वाहनाचा दि. 27/10/2012 रोजी रात्री 1.30 ते 1.45 वाजताच्‍या दरम्‍यान विसापुर गावाजवळ, अहमदनगर ते सातारा दौड रोडवर अपघात झाला हे सुध्‍दा वादातीत नाही. अपघाताच्‍या वेळेस सदर वाहन संदिप शेषराव लहाने हे चालवित होते व संजय महादेव वैरागडे, पुरुषोत्‍तम शंकरराव सावरकर, सुधाकर घायवट, विविक महाकाळकर व दिपक चिंतामण साने हे त्‍या वाहनात प्रवास करीत होते हे सुध्‍दा वादातीत नाही. तसेच वरील लोकांनी सदर वाहन देवदर्शनाकरिता त.क.कडून घेऊन गेले होते हे सुध्‍दा वादीत नाही. तसेच सदर अपघातात वाहनाचे बरेच नुकसान झाले व त्‍यात प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले व त्‍यातील एक प्रवासी मयत झाला हे सुध्‍दा वादीत नाही. त.क. ने दाखल केलेल्‍या पोलिस पेपरवरुन सुध्‍दा हे निदर्श्‍नास येते की, सदर वाहनाचा अपघात होऊन सुधाकर घायवट यांचा मृत्‍यु झाला. त्‍याप्रमाणे वाहन चालकाच्‍या विरुध्‍द पोलिस स्‍टेशन बेलवडी, जि. अहमदनगर येथे गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.
  2.      त.क. ची तक्रार अशी आहे की, अपघातानंतर सदर वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले होते व घटना स्‍थळावरुन वाहन हलविण्‍यासारखे नव्‍हते, म्‍हणून महिंद्रा कंपनीचे अहमदनगर येथील टोल फ्री नंबर वरुन फोन करुन अपघाताबद्दल कळविण्‍यात आले व पोलिस कारवाईनंतर सदर वाहन गॅरेजमध्‍ये नेण्‍यात आले व कंपनीच्‍या गॅरेज मधून सदर वाहन दुरुस्‍तीकरिता रु.6,75,022.61 पै. चे सर्व्‍हीस कोटेशन देण्‍यात आले व त.क.ने ते वि.प. कंपनीला कळविले. परंतु वि.प. कंपनीने सर्व्‍हेअर नेमून सदर वाहन भाडे तत्‍वावर त.क.ने त्‍याच्‍या मित्राला दिले व विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केल्‍यामुळे वि.प. कंपनी नुकसानभरपाई देण्‍यास बांधील नाही , म्‍हणून त.क.चा विमा दावा नामंजूर केलेला आहे.
  3.      त.क. ने पुढे असे कथन केले आहे की, वि.प. कंपनीने वाहन दुरुस्‍ती संबंधी कुठलीही कार्यवाही न केल्‍यामुळे त.क.ने सदर वाहन नागपूर येथे  40,000/-रुपये खर्च करुन आणले व त्‍याची दुरुस्‍तीकरुन घेतली. त्‍याकरिता त्‍याला रु.3,13,348.58 पै. एवढी रक्‍कम खर्च करावी लागली. परंतु वि.प. विमा कपंनीने ती मंजूर केली नाही. वि.प. ने त.क. चा विमा दावा फक्‍त वाहन भाडे तत्‍वावर दिल्‍यामुळे व 33 दिवस उशिराने विमा कंपनीला अपघाता विषयी कळविल्‍यामुळे नाकारला आहे. त्‍यामुळे अपघाताच्‍या वेळेस खरोखरच त.क. ने त्‍याच्‍या मित्रांना देवदर्शनाकरिता त्‍याचे वाहन भाडयाने देऊन विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग केला आहे काय हे पाहणे आवश्‍यक आहे.
  4.      त.क.च्‍या तक्रारीचे, शपथ्‍ापत्राचे व पोलिस पेपरचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क. ने त्‍याचे वाहन त्‍याचे जावई म्‍हणजेच बहिनीचा नवरा व त्‍याचे मित्र यांना सतत सुट्टया असल्‍यामुळे देवदर्शनाकरिता जायचे होते, म्‍हणून प्रेमाखातर वाहन दिले होते, त्‍यांना भाडे तत्‍वावर ते वाहन दिले नवहते. अपघातानंतर सदरील वाहनातील प्रवासी दिपक चिंतामन साने यांनी दि. 27.10.2012 रोजी पोलिसांसमोर फिर्याद दिली, त्‍यात त्‍याने असून नमूद केले आहे की, त्‍यांनी त्‍याचे मित्र त.क.याचे वाहन साडेतीनपीठाचे देवदर्शनाकरिता जायचे असल्‍यामुळे ठरविले होते. परंतु त्‍यांनी भाडे तत्‍वावर सदर वाहन घेतले होते असे कुठेही नमूद केलेले नाही. त्‍यावेळेस सर्व प्रवासी जखमी होते. जर त्‍यांनी खरोखरच त.क. चे वाहन भाडे तत्‍वावर घेतले असते तर त्‍यांनी पोलिसांसमोरील जबाबात तसे नमूद केले असते. तसेच त्‍या वाहनात त.क.चे बहीण जावई प्रवास करणार होते. परंतु त्‍यांनी ऐन वेळेवर ते रद्द केले. त्‍यामुळे सदर वाहन त.क.ने भाडे तत्‍वावर देऊन विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केले असे म्‍हणता येणार नाही.
  5.      वि.प. कंपनीने फक्‍त त्‍यांनी नमूद केलेल्‍या सर्व्‍हेअरच्‍या अहवालावरुनच त.क.ने त्‍याचे अपघातातील वाहन त्‍याच्‍या मित्राला भाडे तत्‍वावर दिले होते, म्‍हणून त.क. चा विमा दावा नाकारलेला आहे. वि.प.कंपनीने इन्‍व्‍हीस्‍टीगेशनचा अहवाल वर्णन यादी नि.क्रं. 23 प्रमाणे दाखल केलेला आहे. दि. 27.01.2013 रोजी ए.पी.असोसिएटसने जो इन्‍व्‍हीस्‍टीगेशन रिपोर्ट वि.प.कंपनीकडे दाखल केला, त्‍याचे अवलोकन केले असता त्‍यांनी अपघाताच्‍या वेळेस प्रवास करणारे प्रवासी दिपक चिंतामण  साने, विवेक यादवराव महाकाळकर, पुरुषोत्‍तम शंकरराव सावरकर, संजय महादेव वैरागडे यांचा जबाब घेतला व त्‍याच्‍यावरुनच ते या निष्‍कर्षाप्रत आले की, सदर वाहन हे अपघाताच्‍या वेळेस भाडे तत्‍वावर देण्‍यात आले होते. परंतु इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्टचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, वरील प्रवाशांनी त्‍यांच्‍या जबाबात कुठेही असे नमूद केलेले नाही की, त्‍यांनी सदरील वाहन भाडे तत्‍वावर त.क. कडून घेतले  होते.  या उलट असे दिसून  येते की, त्‍यांना देवदर्शनाकरिता जायचे असल्‍यामुळे त्‍यांनी त्‍याचे मित्र त.क. यांचे वाहन  फक्‍त डिझलचा व ड्रायव्‍हरचा खर्च करुन घेऊन गेले होते त्‍यामुळे इन्‍व्‍हीस्‍टीगेटर हे कोणत्‍या कारणावरुन या निष्‍कर्षा प्रत आले की, ते वाहन भाडे तत्‍वावर त्‍यावेळेस देण्‍यात आले होते हयाचा बोध होत नाही. त्‍यामुळे ए.पी. अॅन्‍ड असोसिएटसने जो अहवाल दाखल केला तो स्विकारण्‍या योग्‍य नाही. तसेच त्‍याप्रमाणे वि.प. कंपनीने कुळकर्णी लक्ष्‍मीकांत शंकरराव यांच्‍याकडून सुध्‍दा सदरील वाहनाची तपासणी करुन घेतली. त्‍यांनी त्‍यांच्‍या अहवालात असे कुठेही नमूद केलेले नाही की, सदर वाहन अपघाताच्‍या वेळेस भाडे तत्‍वावर वापरण्‍यात आले होते. त्‍यामुळे दुस-यांदा जेव्‍हा इन्‍व्‍हेस्‍टीगेटर  नेमण्‍यात आला त्‍या आधारावर जो त.क. चा विमा दावा नाकारण्‍यात आला तो असमर्थनीय आहे.  
  6.      तसेच वि.प. कंपनीने 33 दिवस उशिरा माहिती दिल्‍यामुळे सुध्‍दा विमा दावा नामंजूर केला आहे. परंतु पहिल्‍या सर्व्‍हेअर अहवालाचे अवलोकन केले असता तो दि. 29.11.2012 ला क्‍लेम दाखल केल्‍याचे दिसून येते व सर्व्‍हे दि.01.12.2012 ला केल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे त.क. ने उशिरा वि.प. कंपनीला कळविले असे म्‍हणता येणार नाही. कारण अपघातानंतर सदर वाहन हे महिंद्रा कंपनीचे गॅरेजमध्‍ये ठेवण्‍यात आले होते व ते जवळ-जवळ 2 ते 3 महिने तेथे होते व त्‍या काळात श्री. कुळकर्णी यांनी सदर वाहनाचे दि. 01.12.2012 रोजी तपासणी केलेली आहे. त्‍यामुळे हे कारण सुध्‍दा विमा दावा नाकारण्‍यास योग्‍य वाटत नाही. तसेच पॉलिसीमध्‍ये उशिरा कळविल्‍यामुळे विमा दावा नामंजूर करता येते अशी  कुठेही अट घातलेली नाही. त्‍यामुळे वि.प. कंपनीने जो विमा दावा नाकारला तो चुकिच्‍या कारणावरुन नाकारलेला आहे व चुकिच्‍या कारणावरुन विमा दावा नाकारणे ही निश्चितच वि.प.ची दोषपूर्ण सेवा दर्शविते व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे दिसते, या निष्‍कर्षा प्रत मंच येते.

 

  1.      त.क.च्‍या वाहनाच्‍या नुकसान भरपाई संबंधी विचार करायचा झाल्‍यास त.क.चे वाहन अपघातानंतर ताबडतोब महिंद्रा अॅन्‍ड महिंद्रा कंपनीचे अधिकृत डिलर सब लोक गॅरेज, अहमदनगर येथे नेण्‍यात आले व सदर डीलरने वाहनाची तपासणी करुन त्‍याला लागत असलेल्‍या पार्टची किंमत काढून व सर्व खर्च असा धरुन सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरिता रु.6,75,022.61 पै.चे कोटेशन दिलेले आहे. ते कोटेशन वि.प. कंपनीचे सर्व्‍हे रिपोर्ट सोबत मंचासमोर दाखल करण्‍यात आले आहे. परंतु वि.प. कंपनीने सदर कोटेशन प्रमाणे वाहन दुरुस्‍ती न केल्‍यामुळे त.क.ने सदर वाहन नागपूर येथे आणले व त्‍याकरिता त.क.ला 40,000/-रुपये खर्च करावा लागला.

 

  1.      त.क. ने नागपूर येथे भारत गॅरेज यांच्‍याकडे वाहन दुरुस्‍तीकरिता जमा केले. त्‍यांनी सुध्‍दा संपूर्ण वाहनाची तपासणी करुन त्‍यास लागणा-या खर्चाचे कोटेशन दिले व वाहन दुरुस्‍तीसाठी रु.3,14,348.58 पै. खर्च लागला. त.क. ने त्‍याच्‍या कथनाच्‍या पृष्‍ठयर्थ इम्रान अमान खान यांचे शपथपत्र नि.क्रं. 25 वर दाखल केलेले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या शपथपत्रात त्‍यांचे स्‍वतःचे मालकीचे नागपूर येथे भारत गॅरेज नांवाचे दुकान असून ते त्‍याचे प्रोप्रायटर आहे व त.क.चे अपघातातील वाहन त्‍यांच्‍या गॅरेजमध्‍ये दुरुस्‍तीकरिता आणले तेव्‍हा ते पूर्णपणे नादुरुस्‍त होते व त्‍याला दुरुस्‍तीकरिता रु.3,14,348.58 पै. खर्च येणार होता व त्‍याप्रमाणे त्‍यांनी कोटेशन दिले व अपघातग्रस्‍त वाहन दुरुस्‍त केले. त्‍याकरिता त.क.ने रुपये 3,14,348.58 पै. दिले, त्‍यानी त्‍याचे बिल त.क.ला दिले असे नमूद केले आहे. सदर बिल सुध्‍दा रेकॉर्डवर दाखल करण्‍यात आले आहे. बिलाचे अवलोकन केले असता त.क.ने त्‍याचे वाहन दुरुस्‍तीकरिता रु.3,14,348.58 पै. भारत गॅरेजचे मालक इम्रान अमान खान यांना दिल्‍याचे दिसून येते. त.क.ने कंपनीच्‍या गॅरेजच्‍या दिलेल्‍या कोटेशन पेक्षा जवळजवळ अर्ध्‍या किंमतीत सदर वाहनाची दुरुस्‍ती करुन घेतली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने जास्‍त खर्च लावल्‍याचा वाईट हेतू कुठेही दिसून येत नाही. म्‍हणून तक्रारकर्ता  रु.3,14,348.58पै.विरुध्‍द पक्षाकडून मिळण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत मंच येते.

 

  1.      तसेच वि.प. कंपनीने अहमदनगर येथील गॅरेजमध्‍ये वाहन दुरुस्‍तीकरिता त्‍याला परवानगी न दिल्‍यामुळे व त्‍याचा खर्च न दिल्‍यामुळे त.क. ने सदर वाहन अहमदनगर येथून नागपूर येथे आणावे लागले. याकरिता त.क.ला 40,000/-रुपये खर्च करावे लागले, त्‍याची पावती वर्णन यादी नि.क्रं. 27 प्रमाणे दाखल केलेली आहे. त्‍याचे अवलोकन केले असता असून दिसून येते की, राजा बॉडी अॅन्‍ड क्रेन सर्विस यांनी सदर वाहन अहमदनगर ते नागपूर येथे आणले व त्‍यासाठी 40,000/-रुपये घेतले असून त्‍याचे बिल त.क.ला  दिले. त्‍यामुळे त.क. रुपये 40,000/- विरुध्‍द पक्षाकडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

  1.      त.क.ने त्‍याचे शपथपत्र व तक्रार अर्जात असे कथन केले आहे की, त्‍यानी सदर वाहन हे बॅंक ऑफ इंडिया, शाखा हिंगणी यांचेकडून कर्ज घेऊन विकत घेतले आहे व वाहन वापरात नसतांना सुध्‍दा प्रतिमाह 12,000/-रुपये कर्ज हप्‍ता परतफेड करावा लागला आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍यावर व्‍याजाचे भुर्दंड पडले आहे व गाडी वापरात नसतांना रु.2,52,000/- कर्ज भरलेले आहे ते सुध्‍दा वि.प.कडून मिळण्‍यास हक्‍कदार आहे. परंतु त.क. ने सदरील वाहन घरघुती वापराकरिता घेतले होते, व्‍यवसायाकरिता नाही. अपघातात वाहनाचे नुकसान झाल्‍यामुळे दुरुस्‍तीच्‍या काळात त्‍याचा वापर करता आला नाही, म्‍हणून त्‍याचे नुकसान झाले असे म्‍हणता येणार नाही. कर्ज परतफेड हे त.क.ला करणे आवश्‍यक आहे व ती त्‍यांनी केलेली आहे. त.क. यांनी सदर वाहन हे घरघुती वापराकरिता घेतलेले होते, त्‍यामुळे वि.प. कंपनी ही त.क.ने घेतलेल्‍या बॅंक कर्ज परतफेडची रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरत नाही.  

 

  1.      त.क.ने वि.प. कंपनीकडून वाहनाच्‍या नुकसान भरपाईची रक्‍कमेची मागणी केलेली होती परंतु वि.प.ने ती चुकिच्‍या आधारावर नामंजूर केली . त्‍यामुळे त.क.ला वाहन दुरुस्‍त करता  आले नाही व सदर वाहनाचा उपभोग घेता आला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याला वाहनाच्‍या नुकसानभरपाईची रक्‍कम मिळविण्‍याकरिता मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे निश्चितच तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. त्‍याचे स्‍वरुप पाहता तक्रारकर्त्‍याला शारीरिक,  मानसिक त्रासाबद्दल 5,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्‍हणून 2,000/- रुपये मंजूर करणे योग्‍य राहील असे मंचाचे मत आहे.  म्‍हणून वरील मुद्दयाचे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येत आहे.  त्‍यानुसार मंच खालील प्रमाणे आदेश   पारित करीत आहे.

आदेश

1)     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरिता   लागलेल्‍या खर्चाची रक्‍कम रुपये 3,14,348.58 पै. तक्रार दाखल तारखेपासून    म्‍हणजेच दिनांक 19.09.2013 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम त.क. च्‍या   हातातपडेपर्यंत द.सा.द.शे. 6 % दराने व्‍याजसह द्यावे.

3)   विरुध्‍द पक्षाने, तक्रारकर्त्‍याला अपघातग्रस्‍त वाहन अमदनगर ते नागपूर येथे    आणण्‍यासाठी लागलेला खर्च रु. 40,000/- द्यावे.

4)   विरुध्‍द पक्षाने, तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून 2000/-रुपये   द्यावे.

5)   मा. सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून जाव्‍यात.

6)   निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव  व उचित  कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.