नि.क्र. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – सौ सुरेखा अ. बिचकर
तक्रार अर्ज क्र. १९०४/२००९
--------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १७/६/२००९
तक्रार दाखल तारीख : ३०/६/२००९
निकाल तारीख : २१/०२/२०१२
------------------------------------------
१. श्रीमती गिताबाई संदिपान होनमाने
वय वर्षे – ५५, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.मापटे मळा, आटपाडी ता.आटपाडी,
जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
२१०, साई इन्फोटेक, आर.बी.मेहता मार्ग,
पटेल चौक, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७७
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. एम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे :+ìb÷. श्री ए.बी.खेमलापुरे
जाबदारक्र.२ : एकतर्फा
जाबदार क्र. ३ :स्वत:
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती संदीपान होनमाने हे शेतकरी होते व त्यांना दि.९/८/२००७ रोजी विहीरीत खुदाईचे काम करीत असताना पडून डोक्यास मार लागल्याने मयत झाले. तक्रारदार या त्यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी, मापटेमळा यांचेकडे सप्टेंबर २००७ मध्ये प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार आटपाडी यांचेकडे पाठविला. तहसिलदार आटपाडी यांनी सदरचा प्रस्ताव योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमाप्रस्तावाबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.१५ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे पती शेतकरी असल्याची बाब नाकारली आहे तसेच पॉलिसीबाबतचा व अपघाताबाबतचा मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला असल्याबाबत पुरावा दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालणेस पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही. तक्रारअर्ज मुदतीत नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा प्रस्तुतचा अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
४. जाबदार क्र.३ यांनी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.३ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे पती हे शेतकरी होते. तक्रारदार यांचेकडून एप्रिल २००८ मध्ये विमाप्रस्ताव दाखल करण्यात आला. सदरचा प्रस्ताव जाबदार यांना दि.२३/४/२००८ रोजी प्राप्त झाला. सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब सदर जाबदार यांचेविरुध्द कोणताही आदेश करण्यात येवू नये असे जाबदार यांनी नमूद केले आहे.
५. जाबदार क्र.२ यांचेवर नोटीशीची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत. सबब त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करणेत आला.
६. तक्रारदार यांनी याकामी नि.१७ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.१९ च्या यादीने कागद दाखल केले आहेत. जाबदार क्र.१ यांनी नि.२१ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२२ ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे. तसेच नि.२३ च्या यादीने ४ कागद दाखल केले आहेत. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
७. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. प्रस्तुत तक्रारअर्जातील तक्रारअर्ज व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारदारतर्फे नि.२३/२ वर विमा कराराची प्रत दाखल केली आहे. सदर करारावरुन सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
८. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार तर्फे नि.२३/२ वर दाखल करण्यात आलेल्या विमा करारावरुन सर्व शेतक-यांचे वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. सदर विमा करारामध्ये विम्याचा कालावधी दि.१५/७/२००६ ते १४/७/२००७ असा असल्याचे नमूद केले आहे. विम्याचा कालावधी हा दि.१४/७/२००७ पर्यंत आहे ही बाब विचारात घेता तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू दि.९/८/२००७ रोजी झाला असल्याचे नमूद कले आहे. यावरुन तक्रारदार यांच्या पती यांचा मृत्यू विमा कालावधीत झाला ही बाब स्पष्ट होत नाही. तक्रारदार यांच्या पती यांचा मृत्यू झाला त्यावेळी विमा पॉलिसी अस्तित्वात होती हे दर्शविण्यासाठी तक्रारदार यांनी अन्य कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट तक्रारदारतर्फे दाखल करण्यात आलेल्या पॉलिसीवरुन तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू विमा कालावधीत झाला नाही ही बाब स्पष्ट होते त्यामुळे तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. २१/०२/२०१२
(सुरेखा अ बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.